अतिरेक्यांना थारा देणार्‍या देशावर कारवाई हवी

0
98

>> ‘बिमस्टॅक’मध्ये एकमत
>> पाकिस्तानला पुन्हा दणका
>> गोमंतकीयांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार

आतंकवाद हा मोठा धोका असून त्यामुळे शांती व स्थैर्याला बाधा पोचत असल्याने ङ्गक्त दहशतवाद्यांवर कारवाई करून चालणार नसून अतिरेक्यांना थारा देणार्‍यांवर देखील कारवाई झाली पाहिजे यावर बिमस्टॅकच्या चर्चेत एकमत झाले. यामुळे ब्रिक्सनंतर बिमस्टॅकनेही पाकिस्तानला इशारा देत मोठा दणका दिला आहे.
भारत, श्रीलंका, भूतान, बांगलादेश, म्यानमार, थायलंड व नेपाळ हे बिमस्टॅकचे सदस्य देश आहेत. दहशतवाद शांती व स्थैर्याला धोका आहे यावर काल बिमस्टॅक देशांच्या नेत्यांनी एकसुरात सहमती दर्शवली. आतंकवादाला सर्वांनी मिळून विरोध करायला हवा यावर नेत्यांनी यावेळी भर दिला. हल्लीच्या काळात बिमस्टॅक राष्ट्रांच्या प्रदेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला.
ज्या देशांकडून दहशतवादाला खतपाणी घातले जाते, अतिरेक्यांना आश्रय दिला जातो त्यांना आतंकवादासाठी जबाबदार धरायला हवे, असा सूर एकमताने व्यक्त करण्यात आला. दहशतवादाचा बिमोड करणे तसेच तो ङ्गैलावण्यापासून राखणे हे अत्यंत महत्त्वाचे काम असल्याचे मतही बिमस्टॅकच्या राष्ट्रप्रमुखांनी व्यक्त केले.
आतंकदवाबरोबरच गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी याविरुद्ध एकसंधपणे लढा देण्याचा निर्धार बिमस्टॅक शिखर परिषदेत काल व्यक्त करण्यात आला. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान विरोधात सगळ्या देशांना एकत्र येण्याची भूमिका मांडली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून गोमंतकीयांचे आभार
ब्रिक्स व बिमस्टॅक परिषदेचे आयोजन करणे एक आव्हान होते. आम्ही त्याचे संधीत रूपांतर केल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल सांगितले. ब्रिक्स यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गोमंतकीयांनी विशेषत: दक्षिण गोव्यातील जनतेने योगदान व सहकार्य दिल्याबद्दल पार्सेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ब्रिक्स परिषदेपूर्वी सरकारने पुरेशा साधनसुविधा विकसित करण्यात भर दिला. रस्त्यांची सुधारणा, रस्त्यांवर रोषणाई, राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांचा विकास, कोलवा जंक्शनचे सौंदर्यीकरण आदी विकासकामे केली. साधनसुविधा निर्माण करून संधीत रूपांतर केले. या सुविधांचा राज्याला भविष्यात फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषद आयोजित करून गोव्याला जागतिक नकाशावर नेल्याबद्दल सर्व जनतेचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहे.