सत्तेत आल्यास नोकरभरती घोटाळ्याची चौकशी

0
12

>> कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडून स्पष्ट; आयोग नेमणार

राज्यात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नोकरभरती घोटाळ्याची चौकशी केली जाईल, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी एका आयोगाची नेमणूक केली जाईल. त्यानंतर ही बेकायदा नोकरभरती रद्द करून पुन्हा नव्याने नोकरभरती प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप सरकारने सरकारी नोकर्‍यांचा लिलाव केल्याने राज्यातील युवा वर्ग भाजपवर नाराज असून, हा चिडलेला युवा वर्ग भाजपला मते देण्याच्या मनस्थितीत नाही, असे चोडणकर म्हणाले.

निवडणुका जवळ आल्या की, भाजपचे नेते गोव्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय सुरू करण्याची घोषणा करीत असतात. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी गोव्यात येऊन गेलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही तेच केले. भाजपचे नेते या प्रश्‍नावरून गोव्यातील जनतेची आणखी किती फसवणूक करणार आहे, असा सवालही चोडणकर यांनी उपस्थित केला.

खाणी सुरू करण्याबाबत भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांनी कित्येकदा आश्‍वासने देऊन गोमंतकीयांची फसवणूक केली आहे. खोटारडेपणा करण्याबाबत अमित शहा हे प्रसिद्ध आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर विदेशात असलेला सगळा काळा पैसा परत आणण्यात येईल आणि भारतातील सर्व नागरिकांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा होतील, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते; मात्र नंतर अमित शहा यांनी याबाबत खुलासा करताना तो एक ‘जुमला’ होता, असे म्हटले होते, याची आठवण चोडणकर यांनी यावेळी करून दिली. भाजपच्या अशा खोटारड्या नेत्यांवर यापुढे जनता विश्‍वास ठेवणार नसल्याचेही ते म्हणाले.

सत्तेवर असतानाही खाण उद्योग सुरू न केलेल्या भाजपला यंदा राज्यातील जनता धडा शिकवेल. सध्या केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे. मग त्यांच्या या डबल इंजिन सरकारला राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय सुरू करण्यास अपयश का आले?

  • गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस.