सण विजयादशमीचा!

0
171

आश्विन शुद्ध दशमीला ‘दसरा’ हे नाव दिले आहे. या तिथीला ‘विजयादशमी’ असेही म्हटले जाते. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो. म्हणून त्याला नवरात्रीच्या समाप्तीचा किंवा पारण्याचा दिवस असेही म्हणतात. काही कुटुंबातले नवरात्र नवमी तिथीस तर काही कुटुंबांचे दशमीच्या दिवशी विसर्जित केले जाते. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये केली जातात.
दसरा हा भारतातील सर्व राज्यांमध्ये मनवला जाणारा सार्वत्रिक सण आहे. हा सण विजयाचा, पराक्रमाचा द्योतक आहे. अर्जुनाने अज्ञातवासात असताना शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे काढून विराटाच्या गाई पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला होता, तोही याच दिवशी.
या दिवशी राजे व सामंत सरदार लोक आपापली शस्त्रे साफसूफ करून ती हारीने मांडतात व त्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे शेतकरी व कारागीर हे आपापली आऊते व हत्यारं यांची पूजा करतात. काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.
तसे पाहिले तर हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला दिसतो. प्रारंभी तो एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेल्या शेतातले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ किंवा सप्त धान्यांची पेरणी करतात व दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकूर उपटून देवाला वाहतात.
या गोष्टी या उत्सवाचे मूळ कृषीस्वरूप व्यक्त करणार्‍या आहेत. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषिविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहास काळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला.
दसर्‍याच्या दिवशी इष्टमित्रांना सोने वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून, सोन्यानाण्यांच्या रुपाने संपत्ती घरी आणत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळत असत. मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा दागिना त्या ओवाळण्याच्या तबकामध्ये घालत. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवून नंतर देवाला नि वाडवडिलांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेत. या घठनेची स्मृती म्हणून आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने आजही पाहायला मिळते.
दक्षिणेत म्हैसूर शहरातला दसरा इतिहासकाळापासून प्रसिद्ध आहे. आजही तो थाटामाटाने साजरा होतो. त्या दिवशी थाटात मिरवणूक निघते. या मिरवणुकीत नगरातले सर्व लोक भाग घेतात.
म्हैसूरचे महाराज हत्तीवरच्या अंबारीत आरूढ होतात. तो गजराज सोन्या-चांदीचे अलंकार आणि पुष्पमाला यांनी सजवलेला असतो. त्याच्या आगेमागेही अनेक हत्ती असतात. हत्तींच्या पुढे सांडणीस्वार नि घोडेस्वार असतात. महाराजांच्या मागे सैनिक, शरीररक्षक व अधिकारी चालतात. या मिरवणुकीला जंबू सवारी असे म्हणतात.
एका विशिष्ट मैदानात ही मिरवणूक आल्यानंतर महाराज तिथे शमी वृक्षाची पूजा करतात. मग केळ्यांचा घट किंवा नारळ यांच्यावर निशाणबाजी करतात. मिरवणुकीतून परत येताना महाराज हत्ती सोडून घोड्यावर स्वार होतात. त्या दिवशी रोषणाई होते. तिथली चामुंडा टेकडीही विद्युत दीपांनी झळकू लागते. म्हैसुरवासी जनतेच्या आनंदोत्सवाला जणू पौर्णिमेची भरती येते. भारताच्या विविध प्रांतातून लोक दसर्‍याची ही मिरवणूक व रोषणाई पाहण्यासाठी म्हैसूरला जातात.
चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसर्‍याच्या दिवशी त्याचा वध केला, अशी कथा आहे. हा महिषासुर वध म्हैसूरच्या परिसरातच झाला, अशी तिथल्या लोकांची श्रद्धा आहे.