सचिन वाझे यांना १० दिवसांची कोठडी

0
90

>> अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकेप्रकरणी एनआयएकडून चौकशी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ जीपमध्ये स्फोटकांप्रकरणी अटक करण्यात आलेले मुंबईचे साहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. वाझे यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती. १० दिवसांची कोठडी मिळवल्यामुळे आता वाझे यांची चौकशी करण्याचा एनआयएचा मार्ग मोकळा झाला आहे. अटक केल्यानंतर सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर सुमारे १२ तास कसून चौकशी करण्यात आली. कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी ११.३०च्या सुमारास गेले होते.

चौकशीनंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी काल रविवारी त्यांना सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या वकिलांनी वाझे यांना १४ दिवसांची एनआयए कोठडी द्यावी अशी मागणी केली. न्यायालयाने मात्र त्यांना २५ मार्चपर्यंत कोठडी ठोठावली आहे. अँटिलिया स्फोटके प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. एनआयएने ताब्यात घेतलेली पांढरी इनोव्हा कारही शनिवारी रात्री मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात उभी होती. तेथूनच ही कार ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारने स्फोटके भरलेल्या स्कॉर्पिओचा पाठलाग केला होता. ही कार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या दोन अधिकार्‍यांसह दोन चालकांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्यांमध्ये वाझे यांचे विश्वासू मानले जाणारे पोलीस निरीक्षक रियाज काझी यांचाही समावेश आहे.