सक्रिय रुग्णांचा आकडा 40 हजारांच्या पार

0
4

>> देशात नव्या जवळपास 8 हजार कोरोनाबाधितांची नोंद; तर 16 जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 7 हजार 830 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. ही आकडेवारी गेल्या 223 दिवसांतील सर्वाधिक आकडेवारी आहे. नव्या रुग्णसंख्येमुळे देशात आता सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 40 हजार 215 वर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 2 लाख 14 हजार 242 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 3.65 टक्के म्हणजेच 7,830 जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याशिवाय एका दिवसात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 2,154 ची वाढ झाली आहे. एका दिवसापूर्वी देशात 5,676 रुग्ण आढळले होते. तसेच गेल्या 24 तासांत 16 मृतांची नोंद करण्यात आली. दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला असून, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र, हरियाणा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. मृतांचा सर्वाधिक आकडा केरळमध्ये असून तिथे पाच जण दगावले. आतापर्यंत एकूण पाच लाख 31 हजार 16 लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत 220.66 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

223 दिवसांनंतर सर्वाधिक रुग्ण
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 7 हजार 946 रुग्ण सापडले होते. त्यानंतर तब्बल 223 दिवसांनी कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येचा आकडा जवळपास आठ हजारांच्या घरात पोहोचला आहे.

5 राज्यांत सापडत आहेत सर्वाधिक रुग्ण
नव्या रुग्णांपैकी 4,800 रुग्ण केवळ 5 राज्यांमध्ये आढळून आले. हे प्रमाण एकूण आकडेवारीच्या 61.3 टक्के एवढे आहे. केरळ येथे 1886 नवीन रुग्ण आढळले. सध्या येथे 14,506 सक्रिय रुग्ण आहेत. दिल्ली येथे 980 नवीन रुग्ण आढळले. महाराष्ट्रात 919, हरियाणात 595, तर हिमाचल प्रदेशमध्ये 420 नवीन रुग्ण आढळले.