पंजाबच्या भटिंडा लष्करी छावणीत गोळीबार; 4 जवानांचा जागीच मृत्यू

0
6

पंजाबच्या भटिंडा लष्करी छावणीत बुधवारी पहाटे गोळीबार झाला. या हल्ल्यात 4 जवानांचा जागीच मृत्यू झाल्याचे लष्कराने सांगितले. हे चौघेही 80 मीडियम रेजिमेंटचे जवान होते. पहाटे 4.35 च्या सुमारास अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये गोळीबार झाला. छावणी परिसरातीतील गोळीबारानंतर या ठिकाणी प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली.

सैन्याच्या दक्षिणी पश्चिमी कमांडने जारी केलेल्या माहितीनुसार, भटिंडा लष्करी छावणीत पहाटे 4.35 वाजता गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यामध्ये चार जवानांचा मृत्यू झाला. सैन्याने पंजाब पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला नाही. हा गोळीबार 80 मीडियम रेजिमेंट आर्टिलरी ऑफिसर्स मेसमध्ये झाला. काही दिवसांपूर्वी यूनिट गार्डच्या खोलीतून एक असॉल्ट रायफल गायब झाली होती. कदाचित त्याच रायफलने गोळीबार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या प्रकरणी एका नागरिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. गोळीबार जवानाने केला की नागरिकाने हे अजून स्पष्ट झालेले नाही.