जी-20 प्रतिनिधींच्या स्वागतासाठी गोवा सज्ज

0
6

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; दाबोळी व मोप विमानतळावर विशेष स्वागत कक्ष

राज्यात उद्यापासून येणाऱ्या जी-20 प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी गोवा सरकार सज्ज झाले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले.
राज्यात 17 ते 19 एप्रिल दरम्यान होणाऱ्या बैठकीसाठी 20 हून अधिक देशांमधून येणाऱ्या जी-20 प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी मोप आणि दाबोळी विमानतळावर पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. तसेच खास सजवलेल्या बस आणि टॅक्सी प्रतिनिधींच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आल्या आहेत. प्रतिनिधींना आपली संस्कृती आणि पाककृती दाखविण्याची ही चांगली संधी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील नागरिकांनी स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक आकर्षित होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

मोप-पेडणे येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्लू टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी पिवळ्या-काळ्या टॅक्सीच्या धर्तीवर खास आदेश जारी करण्याचा निर्देश देण्यात आला असून, एप्रिलच्या अखेरपर्यंत ब्लू टॅक्सी सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांंनी सरकारी अधिकारी आणि जीएमआर कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना
काल दिली.

मोप येथील विमानतळावर स्थानिक टॅक्सींना काऊंटर देण्याची मागणी केली जात आहे. या टॅक्सी सेवेसाठी ब्लू टॅक्सी असोसिएशन आणि जीएमआर यांच्यात एक करार केला जाणार आहे. त्यानंतर शंभर ते दोनशे टॅक्सींना परवाना दिला जाऊ शकतो, असेही
त्यांनी सांगितले.