लुंगी डान्स…!

0
299

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
‘‘पापा कहते हैं बडा नाम करेगा,
बेटा हमारा ऐसा काम करेगा..!’’
प्रत्येक बर्थ-डे पार्टीला हे गाणे हमखास वाजवले जाते. आपल्या मुलाने आपला नावलौकिक वाढवावा असे प्रत्येक आईवडिलांना वाटते. अगदी पहिल्या वाढदिवसापासून… प्रत्येक वर्षी केक कापताना… आपल्या मुलांची वाढ होत असल्याचे बघून ते समाधानी असतात व तसे वाटणे साहजिक आहे. आपल्या मुलांना वाढवण्यात ते काहीही करायला तयार असतात. खरेंच ही मुले पुढे आपल्या आईवडलांचे नाव गाजवणार असे वाटते तुम्हाला? हा प्रश्‍न कितीतरी दिवस माझ्या डोक्यात घर करून बसला होता.कालच आम्ही बर्थ-डे पार्टीला गेलो होतो. इव्हेंट मॅनने सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली होती. खेळ, गाणी, नाच… अक्षरशः धिंगाणा चालू होता. लहानग्याचा बर्थ-डे म्हटल्यावर हे सगळे आलेच. मी जर छोटा असतो तर मी घुमश्यान केले असते. दहा-पंधरा मुले नाचायला तयार होते. दहा-पंधरा मुले नाचायला तयार होती. ‘‘कुठले गाणे हवेय?..’’ उत्तर तोंडावर आले… व तेच मुलांच्या तोंडून बाहेर पडले, ‘‘लुंगी डांस.. लुंगी डान्स..!’’ व त्या गाण्यावर ती लहान पोरे कंबर हलवत नाचू लागली. मला सुचले ते त्यांनाही कां सुचले? हे गाणे व मुलांचा नात गेली सहा-आठ महिन्यांपासून मला नाचवतेय!
अहो आमच्या घरासमोर हॉल आहे.. तिथे डान्स क्लासेस चालवले जातात. आठवड्याचे दोन दिवस… संध्याकाळचे दोन तास… पैसे महिन्याचे फक्त पाचशे!
दोनदिवसांपासून हाच क्लास जवळच्या गावात पण चालू आहे. ‘‘म्हणजे गावातल्या मुलांनी नाचू नये?’’
पालक आपल्या पाल्यांना हॉलवर सोडतात व संपण्याअगोदर खाली थांबतात. कुणी चालत येतात तर कुणी दुचाकी वा चारचाकी घेऊन येतात. मुलांची वयोमर्यादा ६ ते १२ वर्षे. त्यात मुले व मुलीपण येतात. मुलींचा भरणा जास्त! अगदी कामवाल्या बाईची मुलेसुद्धा! खरे वाटत नाही..? पालकांच्या घोळक्यात मॅडमींबरोबर, कामवाली बाईपण थांबलेली असते. गाणी कोणती म्हणून सांगू… ‘‘लुंगी डान्स..!’’
तीच तीच थिरकती गाणी.. व पोरे नाचतात. क्लास संपेपर्यंत पालक खाली थांबलेले असतात. मग त्यांचे ते आपापसातले बोलणे ऐकायला मजा येते.
‘इथे क्लासला घातल्यापासून आमचा बंड्या किती छान नाचतो हो.. अगदी मोरासारखा! घरात तर ‘लुंगी डान्स’ करत हैदोस घालत असतो…’
‘माझी छकुली ‘शामली’ गं झकास नाचते. पूर्वी ती नाचायची व पडायची. आजकाल घरात ती नाचल्यावर स्वयंपाकघरातील भांडी पडतात. त्या दिवशी कित्येक वर्षांची, सासुबाईंची लोणच्याची बरणी पडली व फुटली. बरे झाले बाई, पूर्वीच तडा गेलेली ती बरणी सासूबाई बाहेर टाकायला देतच नव्हत्या. शामलीच्या ‘‘लुंगी डांस’’ने ती बरणीच फोडली. नाहीतरी ती बरणी स्वयंपाकघरात शोभतच नव्हती!…’
तर लुंगी डान्स आमच्या समोर आठवड्यातले दोन दिवस छानपैकी चाललेले होते. गाण्याचे स्वर कानात गुंजत होते, वर डोक्यात भलतेच विचार घोंघावत होते. मी म्हणतो- मुलींना नैसर्गिकपणे डांस हा येतोच. कारण मोठे झाल्यावर त्या आपल्या नवर्‍यांना आपल्या हातांच्या बोटांवर नाचवतात व नवरे था-थैय्या करत नाचत राहतात. फक्त मुलांना ते जमत नाही. तेव्हा पुढे-मागे मोठे झाल्यावर बायकोच्या तालावर नाचायला हवे ना… म्हणून मुलांनी डान्स शिकलाच पाहिजे!… ही काळाची गरज ओळखून काही पालक आपल्या मुलांना डान्सला पाठवू लागलेत.
पूर्वी कुठे शिकवणीला जात असत… पाढे शिकायला… पाटी गिरवायला मास्तरांकडे जायची. मास्तर मग अभ्यास केला नसला तर छडी घेऊन पाठ फोडून काढायचे. आज मास्तरांनी मुलांवर डोळे वटारले तर मास्तरांची बदली सत्तरीच्या डोंगराळ भागात.. जिथे पट्टेरी वाघ फिरतात..!
ऐक..ऐक..ऐकून व पाहून काहीही ‘‘ऑल वेल’’ असे वाटत नाही. वर आजकाल शिकायला हवे असेही नाही. आठवीपर्यंत सगळीकडे पास..! मग सगळेच साक्षर झाले म्हणायचे! पूर्वी मराठी शाळेच्या पहिल्या इयत्तेत ही मुले नापास होत असत. आता आठवी होईपर्यंत पास… व फक्त पास..! मग नववीला ४०% मुले फेल..! मग पुढच्या वर्षी त्यातली ९०% घरी…
शाळेत कधीही न परतणारी! बरे झाले बाई… माझी पोर आठवी पास!!
शाळेत, हायस्कुलात, कॉलेजात मुलांना काहीही उलट म्हणायचे नाही. नाहीतर प्रोफेसरवरच खटला…मुलांवर रॅगिंग केले म्हणून..! कालच आम्हा डॉक्टरांची बैठक होती. मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक म्हणाले, ‘‘आम्ही फक्त मुलांना शिकवायचे. जर मुलगा परीक्षेत नापास झाला तर आम्हाला प्रश्‍न विचारले जातात व मुलगा फेल झाल्याबद्दल प्रोफेसरांना ट्रेनिंगला पाठवतात. निष्कर्ष – प्राध्यापकांना मुलांना नीट शिकवता न आल्याने विद्यार्थी नापास झाला? आता भोगा फळे!!
अशाने पोरे माजणार नाहीत तर इतर कोण माजणार? लुंगी डान्सचा वर्ग संपला होता. मुले खाली उतरत होती. पालक आपल्या पाल्यांना घरी घेऊन चालले होते. त्यातल्या एका मुलीने हात उंचावला… मला टाटा.. केले. डॉक्टरमामा, बाय बाय… गुड नाइट.. स्वीट ड्रीम्स…! मी कपाळावर हात मारला. मला स्वीट ड्रीम्स म्हणणारी मुलगी खरेच स्मार्ट होती. फक्त पाच-सहा वर्षांची… लुंगी डांस शिकल्यावर पुढे तिच्या होणार्‍या नवर्‍याची खैरियत नाही. चांगलीच चंपी होणार म्हणायची!!
सहज उत्कंठा म्हणून मी त्या दिवशी हॉलवर गेलो. सगळे काही टापटीप चालू होते. लुंगी डान्स जोरात चालू होता. फरक एवढाच की कुणीही लुंगी नेसली नव्हती. वन..टू..थ्री..फोर.. करत, चांगल्या प्रकारे पदन्यास करत मुले नाचत होती. तालावर व ठेक्यावर कंबर-पाय हलवायला आले की झाले! डांस आला(?)
आजच्या आधुनिक जगात मला वाटते मुलींनी खालील गोष्टी शिकाव्यात. स्कूटर चालवणे, गाडी चालवणे, फाड्‌फाड् इंग्रजी बोलणे, कंबर (असलेली-नसलेली) हलवत, लचकत चालणे, बोलताना मध्ये मध्ये स्मित हास्य करत बोलणे… पोहणे… वगैरे! आता मुलांनी काय करायचे?… कौतुक करणे शिकावे… लग्नानंतर जन्मभर कौतुकच करावे लागणार ना? कुठल्याही प्रसंगात चेहर्‍यावरची सुरकुतीही हलवायची नाही. चेहरा नेहमी निर्विकार व मवाळ ठेवावा. आज्ञाधारक असावे. पैशाचे पाकीट वापरायला शिकावे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, सदैव बरोबर ठेवायला शिकावे. या सगळ्या गोष्टी मुलांनी शिकाव्यात.
डोळ्यासमोर क्षणचित्रे धावत जात होती. ती टाटा.. करणारी मुलगी मोठी झाली होती. मी म्हटल्याप्रमाणे चांगला श्रीमंत नवराही गटवला होता. पण तो डांस क्लासला लहानपणी गेला नव्हता. त्याला नाचता येत नव्हते. तो आडव्यातिडव्या उड्या मारत नाचत होता.
अरे नाच ना! लुंगी डांस…लुंगी डांस! ‘‘पापा कहते है’’चे गाणे ‘‘लुंगी डांस…’’च्या आवाजाने कुठल्या कुठे विरून गेले होते…!
खाडकन् वर्तमानपत्रात प्रवेश करता झालो! मुलांचा डांस जोरात चालू होता. ट्रेनरचा आवाज गुंजत होता. वन..टू..थ्री..फोर… लुंगी डांस… लुंगी डांस!!!