जीवन संस्कार- 17
- प्रा. रमेश सप्रे
लोकनेत्यांची विधायक इच्छाशक्ती नि सर्वसामान्य लोकांची सर्वकल्याणकारी वृत्ती यांचा संगम झाला तर एक नवा समर्थ भारत उदयाला येईल यात संशय नाही. हा एक यज्ञच आहे. आपली एकतरी समिधा यात टाकायला काय हरकत आहे?
सण, सोहळा, समारंभ, कार्यक्रम, उत्सव अशा साजरा करावयाच्या गोष्टी या समाज-जीवनाचा एक भाग असतात. अगदी रानावनातील, दऱ्याडोंगरातील वनवासी, गिरिवासी लोकांच्या संस्कृतीतही सण साजरे करणे असतेच. त्यावेळची त्यांची लोकनृत्ये, वेशभूषा, सजावट इ. गोष्टी सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या असतात. लोकोत्सव, लोककला अशा कार्यक्रमांतून आजकाल या लोकसंस्कृतीचे दर्शन जगाला घडवले जाते. असो.
तुम्हाला वाटेल की श्रीरामनवमी, हनुमानजयंती, बुद्धजयंती हे काय सण आहेत? पण अशा महापुरुषांच्या जयंती तसेच साधुसंतांच्या पुण्यतिथी या सणांप्रमाणे साजऱ्या केल्या जातात. खरंतर त्यांचं स्वरूप उत्सवांसारखं असतं. त्यातून काही संस्कार निश्चितपणे आपल्यावर घडतात. आपण जाणीवपूर्वक असे संस्कार स्वतःवर घडवून घ्यायचे असतात. यावर जरा सहचिंतन करूया.
रामनवमी ः मंदिरातच नव्हे, अनेक सार्वजनिक ठिकाणीही हल्ली श्रीरामनवमी साजरी केली जाते. सर्वत्र श्रीरामाच्या प्रतिमा, मूर्ती यांची पूजा केली जाते. त्याठिकाणी भव्य सजावट केली जाते. सकाळी प्रभातफेरी, दुपारी श्रीरामजन्म, संध्याकाळी शोभायात्रा असा भरगच्च कार्यक्रम असतो. सारे भेद विसरून सर्वांनी एकत्र यावे, संघटित शक्तीचा आविष्कार दाखवून समाजसेवा, देशभक्ती यांचा संस्कार स्वतःवर घडवावा, हा मुख्य उद्देश अशा उत्सवांचा असतो.
अनेक ठिकाणी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. कल्पक वेशभूषेसाठी (फॅन्सीड्रेस कॉम्पिटिशन) श्रीरामचरित्रातील, रामायणातील विषय दिले जातात. त्यानिमित्ताने रामकथेचा अभ्यास होतो. कीर्तन-प्रवचनातून श्रीरामचरित्राचे विशेष पैलू सादर केले जातात. साऱ्या वातावरणात श्रीरामचरित्राची स्पंदने भरून राहतात नि ती स्पंदने सर्वांना भारून टाकतात. अनेकांच्या तोंडी ‘राम जन्मला गं सखी, राम जन्मला’, ‘स्वये श्रीरामप्रभु ऐकती, कुश लव रामायण गाती’ अशी गीतरामायणातील गोड गीते असतात.
या सादरीकरणातून आपल्यावर श्रीरामजीवनातून महत्त्वाचे संस्कार घडविले जातात.
श्रीरामाचा पराक्रम ः साध्या वानरसेनेकडून बलाढ्य रावणसेनेचा पराभव केला गेला. श्रीराम हा स्वतः ‘एकबाणी’ होता. एकाच लक्ष्यावर त्याला दोन बाण कधी मारावे लागले नाहीत.
श्रीरामाचा सत्यवचनी स्वभाव ः ‘प्राण जाय पर वचन न जाय’ हा केवढा मोठा संस्कार आहे? आजकाल अशा व्यक्ती भेटणं हा दुर्मीळ भाग्ययोग आहे.
वनवासाला निघण्यापूर्वी जेव्हा माता कैकयी रामाला विचारते- ‘ज्यांनी प्रत्यक्ष वर दिले ते तुझे पिताश्री आता माघार घेताहेत, मग तुझ्या शब्दांवर मी कसा विश्वास ठेवू? तू वनवासात चौदा वर्षं राहशील आणि माझ्या भरताला निर्वेध राज्य करू देशील याची खात्री काय?’ अशा परिस्थितीत श्रीरामाने काढलेले तेजस्वी उद्गार आपल्यावर संस्कार घडवतात. श्रीराम उद्गारतो, ‘रामो द्विर्नाभिसंधते। रामो द्विर्नाभिभाषते।’ म्हणजे ‘एकाच लक्ष्यावर राम दोन बाण मारत नाही (एकबाणी) आणि राम तोंडातून निघालेला शब्द कधी परत घेत नाही.’ हे ऐकून कैकयीचं समाधान झालं. आपण यातील रामाचं तेज, वज्रनिर्धार नि आत्मविश्वास हे गुण शिकण्यासारखे, अंगी बाणवण्यासारखे आहेत.
रामाचं एकपत्नीत्व ः अनेकजण तसे एकपत्नीच असतात. मग यात विशेष काय आहे? एकतर रामाच्या वंशात एकपत्नीत्वाचा आदर्श नव्हता. खुद्द त्याच्या पिताश्रींना- दशरथाला- तीनशे राण्या होत्या असा उल्लेख येतो. सीतात्याग प्रजानुरंजनासाठी म्हणजे प्रजेच्या इच्छेनुसार, प्रजाहितासाठी केल्यावर अयोध्येत अश्वमेध यज्ञ करायचे ठरले तेव्हा या यज्ञासाठी राजाने पत्नीसह बसणे अनिवार्य होते. त्यावेळी ज्ञानी मंडळींनी पुन्हा विवाह करण्याचा सल्ला दिला. पण रामाने विचारले, ‘याला पर्याय काय? कारण मी तर दुसरं लग्न करणारच नाही.’ तेव्हा सीतेची सुवर्णमूर्ती बनवण्याचा शास्त्रसंमत उपाय पुढे आला. तो स्वीकारून त्यानुसार सीतेच्या सोन्याच्या मूर्तीसह श्रीरामाने अश्वमेधाचे सारे विधी पार पाडले. यातून काही खास मूल्यांवर श्रद्धा नि पत्नी सीतेवर अन्याय होऊ नये ही दूरदृष्टी यांचे संस्कार मनावर ठसवता येतील.
यासंदर्भात पू. गोंदवलेकर महाराजांनी एका प्रवचनात रामाबद्दल काढलेले उद्गार फार मार्मिक आहेत. ‘राम दयाळू आहे- दयामूर्ती आहे. त्याचा क्रोधही दयामय आहे. रामाने मृत्यूलाही मारून रावणासारख्या असुराला एक प्रकारे मुक्त केले. रामाचा कोपही कल्याणकारक!’ म्हणून रामचरित्र गोड आहे, संस्कारांचा पुंज आहे.
रामाची प्रबोधशक्ती ः वालीला मारल्यानंतर त्यांनी प्रक्षुब्ध झालेल्या त्याच्या पत्नीला- तारेला- योग्य उपदेश करून तिचं समाधान केलं. तिच्या प्रत्येक प्रश्नाचं रामानं दिलेलं उत्तर आध्यात्मिकदृष्ट्या एक उदाहरण ठरावं. त्याचप्रमाणे रावणवधानंतर मंदोदरीचंही समाधान केलं. त्याचप्रमाणे श्रीरामाने पराक्रमाबरोबर चरित्र्याचं दर्शनही आपल्या जीवनात घडवलं. यामुळे श्रीराम हा प्रापंचिकांकरिता आदर्श आहे.श्रीरामाचा त्याग ः रामानं सीतेचा केलेला त्याग लोक लक्षात ठेवतात. त्या त्यागाची पार्श्वभूमी लक्षात घेत नाहीत. ‘ज्या कारणासाठी माझा त्याग केला, त्यामुळे झालेल्या वियोगामुळे विरहव्याकुळ झालेल्या रामाने प्रजेच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करू नये’ असा निरोप सीतेने लक्ष्मणाबरोबर रामासाठी पाठवला. यावरून बरंच काही लक्षात घेण्यासारखं आहे. पण श्रीरामाचा महान त्याग म्हणजे आपला काहीही अपराध नसताना श्रीरामाने युवराज्याभिषेकप्रसंगी केलेला राज्यत्याग. क्षणात घेतलेला हा निर्णय श्रीरामाने त्या क्षणापासूनच अमलात आणला.
शेवटी रावणसंहारानंतर लक्ष्मणाने सुचवले की, ‘बिभीषण श्रीलंकेची राजसंपदा तुमच्या पायावर अर्पण करील. सुग्रीवसुद्धा किष्किंधेचे राज्य आपणहून देईल. अशा परिस्थितीत उगीच अयोध्येत परतून भरताने लावलेली राज्याची घडी विस्कटायची कशाला?’ या व्यावहारिक सल्ल्यावर श्रीरामाने काढलेले तेजस्वी उद्गार आजही संस्कार घडवणारे आहेत. श्रीराम म्हणतो- ‘अपि स्वर्णमयी लंका’- लंका जरी सोन्याची असली तरी लंकेचा राजा होण्यापेक्षा मी अयोध्येत रंक किंवा दास होणे पसंत करीन. कारण ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि।’ असो.
श्रीरामनवमीच्या निमित्ताने दरवर्षी श्रीरामाच्या संस्कारसमृद्ध चरित्राचं वाचन, मनन नि अनुसरण याचा संकल्प करायचा असतो. तसे कार्यक्रमही समाजमाध्यमं, मंदिरामंदिरांतून असतात. पण आपण कोरडेच राहतो. याला काय म्हणावं?
श्रीहनुमानजयंती ः हल्ली वर्गणी जमवून हनुमानाच्याच नव्हे तर इतर मंदिरांतही श्रीहनुमानाचा जन्म साजरा केला जातो. ‘जय हनुमान’ यासारख्या भव्य दूरदर्शन मालिका, हनुमानावर ॲनिमेशन चित्रपट तयार करून त्याला अभूतपूर्व प्रसिद्धी नि यश मिळवून देणं अशा गोष्टींमुळे हनुमान हा जगातल्या आबालवृद्ध मंडळींचा सुपरहिरो बनलाय. हीमॅन, सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन यांसारख्या चित्रफितीतून मानवजातीचं रक्षण करणाऱ्या महानायकांपेक्षाही हनुमान लोकप्रिय झालाय. निरनिराळ्या माध्यमांतून हनुमानाचं चरित्र आपल्यासमोर येतंय. हे साऱ्या जगासाठी प्रेरक आहे. या चरित्रातून घडवून घ्यावयाचे संस्कार असे-
हनुमंताचा जो श्लोक सर्वांना परिचित आहे तो जसा त्याच्या चरित्राचं नि चारित्र्याचं वर्णन करणारा आहे, तसाच त्याच्या आत्मचरित्रपरही आहे.
श्लोक – मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥
या श्लोकातील प्रत्येक शब्द हनुमंताचं गुणवर्णन करणारा आहे आणि त्यापासून प्रेरणा घेऊन महापराक्रम, दृढनिश्चय, इंद्रियांवर नियंत्रण, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, तसेच नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व यांचा मेरुमणी असलेला हनुमान सतत स्वतःचा परिचय करून देताना ‘श्रीरामदूत’ असाच करतो. ही निगर्वी नम्रता म्हणजे हनुमान! आजच्या युवावर्गाला हनुमानाचं चरित्र नुसतं प्रभावी (अमेझिंग किंवा ऑसम्) न वाटता प्रेरक (इन्स्पायरिंग) वाटायला हवं. हनुमानजयंती साजरी करण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे.
बुद्धजयंती ः सध्याच्या काळातील अवतारी पुरुष भगवान गौतमबुद्ध हाच आहे. ‘युद्ध नको तर बुद्ध हवा’ ही केवळ घोषणा नाही तर ती जीवनशैली बनली पाहिजे. बुद्धपौर्णिमा हा मानवजातीच्या दृष्टीनं महान, पवित्र दिवस आहे. पण नुसता साजरा करण्यासाठी नव्हे तर त्यातून स्वतःवर संस्कार घडवण्यासाठी बुद्धाचे संस्कार म्हणजे अहिंसा- शांती- करुणा- प्रेम- समता असे साऱ्या विश्वाला एका सूत्रात गुंफणारे आहेत. यांचं महत्त्व नि विश्वशांतीसाठी प्रभाव वाढतोच आहे. अधिकाधिक लोक जगभर या जीवनप्रणालीचा स्वीकार करत आहेत. खरोखर बुद्धाची नुसती प्रतिमा किंवा मूर्ती काही क्षण स्थिर दृष्टीनं पाहत जरी राहिले तरी त्याच्या शिकवणुकीचे संस्कार मनावर घडतात. यासाठी आपण संस्कारक्षम नि संवेदनक्षम हवं. खरं पाहिलं तर सारं आपल्यावरच आहे.
अर्धोन्मिलित दृष्टी (अर्धवट उघडे डोळे असलेली ध्यानमुद्रा), चेहऱ्यावरील प्रसन्न, शांत हास्य, एकूणच बुद्धाचं व्यक्तिमत्त्व पाहताक्षणी संस्कार घडवणारं आहे. ‘बुद्धं शरणं गच्छामि’ हा सर्व मानवजातीसाठी जीवनसंस्कार आहे हे निश्चित.
भारतीय समाजजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या सणात असे महापुरुषांचे जन्मदिन कशाला? – असं वाटणं साहजिक आहे. पण खरंतर अशा जयंती-पुण्यतिथी उत्सवांचं साजरीकरणं केवळ इव्हेंटसारखं कर्कश्श, गदारोळी, पैशांची उधळपट्टी करणारं, सर्वप्रकारचं प्रदूषण करणारं न होता, याउलट जर केलं गेलं तर समाजमनावर संस्कार घडण्यासाठी यांच्यासारखं प्रभावी माध्यम नाही. लो. टिळकांसारख्या दूरदृष्टी असलेल्या लोकनेत्यानं उगीच का गणेशोत्सवाबरोबर शिवजयंतीचाही सार्वजनिक उत्सव साजरा करण्याची प्रेरणा समाजाला दिली?
पण चांगल्या गोष्टींचंही भ्रष्टीकरण केल्या जाणाऱ्या आजच्या काळात हे जमणे अशक्य नसले तरी अवघड आहे. लोकनेत्यांची विधायक इच्छाशक्ती नि सर्वसामान्य लोकांची सर्वकल्याणकारी वृत्ती यांचा संगम झाला तर एक नवा समर्थ भारत उदयाला येईल यात संशय नाही. हा एक यज्ञच आहे. आपली एकतरी समिधा यात टाकायला काय हरकत आहे?