राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मते; बी. सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव; शुक्रवारी शपथविधीची शक्यता
देशाच्या उपराष्ट्रपतिपदासाठी काल झालेल्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला. ते देशाचे 15वे उपराष्ट्रपती असतील. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मते मिळाली, तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 300 मते मिळाली. त्यामुळे राधाकृष्णन हे 152 मतांच्या फरकाने विजयी झाले. राधाकृष्णन हे शुक्रवार दि. 12 सप्टेंबर रोजी भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे.
जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंत होता. त्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागली.
भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. त्यासाठी सकाळी 10 वाजता मतदान सुरू झाले आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालले. त्यात एकूण 98 टक्के मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन राम मेघवाल आणि किरेन रिजिजू यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी मतदान केले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही निवडणुकीत मतदान केले.
दरम्यान, या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती (4 राज्यसभा खासदार), बिजू जनता दल (7 राज्यसभा खासदार) आणि शिरोमणी अकाली दल (1 लोकसभा आणि 2 राज्यसभा खासदार) यांनी मतदानात भाग घेतला नाही.
या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करण्यास पात्र होते. लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून एकूण 788 सदस्य आहेत. त्यापैकी 245 राज्यसभेचे आणि 543 लोकसभेचे आहेत. सध्या या सदस्यांची एकूण संख्या 781 आहे, कारण राज्यसभेत 6 आणि लोकसभेत 1 जागा रिक्त आहे. अशा परिस्थितीत निवडणूक जिंकण्यासाठी 391 मतांची आवश्यकता होती. त्यापेक्षा अधिक मते मिळवत सी. पी. राधाकृष्णन यांनी विजय मिळवला. राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सी. पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मते मिळाली, तर विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 300 मते मिळाली.
इंडिया आघाडीची 14 मते फुटली
या निवडणुकीत विरोधकांनी जेवढ्या खासदारांच्या समर्थनाचा दावा केला होता, तेवढी मतेही इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मिळू शकली नाहीत. त्यामुहे निवडणुकीत क्रॉस वोटिंगची चर्चा रंगली. काँग्रेसच्या एका महासचिवाने दावा केला होता की त्यांच्याकडे 315 मते आहेत, पण प्रत्यक्षात विरोधकांची जवळपास 14-15 मते एनडीएच्या बाजूने गेली. कागदोपत्री एनडीएला 427 खासदारांचा पाठिंबा होता. वायएसआरसीपीच्या 11 खासदारांनीही राधाकृष्णन यांच्या बाजूने मतदान केले. तसेच एनडीएच्या उमेदवाराला आणखी 14 जास्त मते मिळाली, त्यामुळे विरोधी पक्षातील खासदारांनी क्रॉस-वोटिंग केल्याची चर्चा रंगली.
नाईक, तानावडेंकडून मतदान
पणजी (न. प्र.) : नवी दिल्ली येथे काल झालेल्या उपराष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीत केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक आणि गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी भाग घेऊन मतदान केले.
सी. पी. राधाकृष्णन यांची राजकीय कारकीर्द
नाव : चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन
जन्म : 20 ऑक्टोबर 1957 (तिरुप्पूर, तामिळनाडू)
शिक्षण : बीबीए (व्यवसाय प्रशासन)
1974 : जनसंघात सहभागी, आरएसएस स्वयंसेवक म्हणूनही कार्य
1996 : भाजप तामिळनाडू सचिवपदी निवड
1998 : पहिल्यांदाच कोईम्बतूरमधून लोकसभेवर निवड
1999 : दुसऱ्यांदा कोईम्बतूरमधून विजयी
2004-07 : तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष
तीनवेळा पराभूत : 2004, 2012, 2019च्या लोकसभा निवडणुकीत पराभव
2023 : झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
2024 : महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
2025 : देशाचे उपराष्ट्रपती