Home बातम्या नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा

नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा

0

नेपाळमधील राजकीय स्थिती कमालीची तणावपूर्ण; सोशल मीडिया साईट्सवरील बंदी उठवली

भारताचा शेजारी देश नेपाळमधील राजकीय स्थिती कमालीची तणावपूर्ण बनली आहे. वाढता भ्रष्टाचार, तसेच सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातल्याचा निषेध म्हणून ‘जेन झी’तील तरुणाईने मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरून नेपाळ सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. प्रखर विरोधामुळे ही बंदी सरकारला उठवावी लागली. मात्र, त्यानंतरदेखील रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईचा असंतोष कमी झालेला नाही. या पार्श्वभूमीवर के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.

नेपाळ सरकारमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात होता. मात्र, आंदोलन हिंसक होत असल्याचे पाहून पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या निर्माण झालेल्या समस्येवर राजकीय मार्गांनी आणि शांततापूर्ण पद्धतीने तोडगा निघावा म्हणून मी पदाचा राजीनामा देत आहे, असे ओली यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याकडे ओली यांनी आपला राजीनामा सादर केला.
राजधानी काठमांडू आणि आसपासच्या भागात झालेला संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत.

सोमवारी आंदोलक व पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीमध्ये 20 आंदोलकांचा मृत्यू झाला. त्याचे तीव्र पडसाद आंदोलकांमध्ये उमटले. परिणामी मंगळवारी सकाळपासूनच जमावबंदी असूनही आंदोलक आक्रमकपणे निदर्शने करत सरकारी मालमत्तांवर हल्ले करताना दिसून आले.
आंदोलनादरम्यान निदर्शकांनी काल संसद भवनाला आग लावली. त्यानंतर संसद भवन आग आणि धुराच्या विळख्यात सापडले होते. तसेच पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि गृहमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानांवर हल्ला आणि तोडफोड केली. याशिवाय, माजी पंतप्रधानांच्या घरावरही हल्ले झाले. अनेकांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.

या सर्व निदर्शनादरम्यान, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हेलिकॉप्टरची गर्दी पाहायला मिळाली. केपी शर्मा ओली, त्यांचे मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर अनेक नेत्यांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी नेले जात आहे. भैसेपती येथील नेपाळ सरकारच्या मंत्र्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानांमधून त्रिभुवन विमानतळासाठी सुमारे एक डझन हेलिकॉप्टर रवाना झाले.

सध्या विमानतळाच्या सुरक्षेसाठी नेपाळ लष्कराने मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले आहेत. नवीन पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतरच आंदोलकांचा राग शांत होण्याची शक्यता आहे. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांना पंतप्रधान करण्याची मागणी आंदोलक तरुण करत आहेत. या शर्यतीत त्यांचेच नाव सर्वात पुढे असल्यामुळे, लवकरच नावाची घोषणा होऊ शकते.

माजी पंतप्रधानांच्या पत्नीची हत्या
या आंदोलनादरम्यान, आजी-माजी पंतप्रधानांसह राष्ट्रपतींच्या घरात जाळपोळ करण्यात आली. नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या निवासस्थानावरही हल्ला केला. हल्लेखोरांनी घराची तोडफोड केली आणि आगही लावली होती. त्यावेळी आंदोलकांनी झलनाथ खनाल यांची पत्नी राजलक्ष्मी खनाल यांना बेदम मारहाण केली होती, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पंतप्रधानांचे निवासस्थान पेटवले
नेपाळमध्ये संतप्त झालेल्या आंदोलकांनी काल पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावून ते पेटवून दिलं. पंतप्रधानांबरोबरच सत्ताधारी गटातील इतरही काही महत्त्वाच्या नेत्यांच्या घरांना अशाच प्रकारे आग लावण्यात आली.

अर्थमंत्र्यांना मारहाण
नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांच्यावर आंदोलक हल्ला करताना दिसत आहेत. यावेळी आंदोलकांनी पौडेल यांचा रस्त्यावर पाठलाग करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.