संस्कार तिथींचे- अष्टमी ते द्वादशी

0
4

जीवनसंस्कार- 14

  • प्रा. रमेश सप्रे

आपण भारतीयांनीही आपल्या मातृसंस्कृतीचा असा विचार नि डोळस स्वीकार करायला हवा, तर आणि तरच भारतीय जीवनप्रणाली विश्वविजयी बनेल. नि मुख्य म्हणजे, यासाठी कोणत्याही हिंसक शस्त्रास्त्राची गरज पडणार नाही.

कोणत्याही देवकार्याची किंवा धर्मकार्याची सुरुवात ‘सर्वेषाम्‌‍ अविरोधेन ब्रह्मकर्म समारभे’ म्हणजे कुणालाही विरोध न करता (प्रेमभावनेनं) हे ब्रह्मकर्म (देवकार्य) आरंभ करत आहे. या संकल्पात इतर अनेक गोष्टींमध्ये त्या दिवसाच्या तिथीचाही समावेश असतो. या तिथींचा संदेश, संकेत नि संस्कार यावर आपण सहचिंतन करत आहोत.

प्रथम अष्टमी. प्रत्येक महिन्यात दोन अष्टमी असतात- शुक्ल (शुद्ध) आणि कृष्ण (वद्य). अष्टमी ही पंधरवड्यातील मधली तिथी आहे. जणू आधीच्या नि नंतरच्या सात तिथींचा तोल ती सांभाळते. दोन्ही पक्षांत अष्टमीचा चंद्र सारखाच असतो. ही तिथी दोघा शक्तींना दिलीय. शुद्ध अष्टमी परंपरेनं दुर्गेला (दुर्गाष्टमी), तर वद्य अष्टमी काळाला (कालाष्टमी) दिलीय.

कोणत्याही वस्तूची शक्ती त्या वस्तूच्या आत असते. वायरमधील शक्ती. बाहेरील वेष्टनाच्या आतील तांब्याच्या तारेच्या आत विद्युतशक्ती असते जी सर्व कार्यं करते. गाडीच्या टँकमधील पेट्रोल वा डिझेलच्या आत गाडी चालवणारी शक्ती असते. इतकेच कशाला, आपल्या सर्व इंद्रियांची शक्ती मेंदूतील केंद्रात असते. म्हणून सर्व तिथींच्या मध्ये दुर्गाशक्तीला स्थान दिलंय. क्लेश, संकटं दूर घालवणारी ती दुर्गादेवी. नवरात्र हा मुख्यतः दुर्गेचा उत्सव असतो. ‘दुर्गे दुर्गतिनाशिनी’ ही त्या उत्सवाची प्रार्थना असते.

यापेक्षा वद्य अष्टमीचा संस्कार विशेष आहे. एका कथेनुसार दक्षाचा (शंकराच्या सासऱ्याचा, सतीच्या पिताश्रींचा) यज्ञ नष्ट करण्याची आज्ञा शिवशंकरानं आपल्या वीरभद्र, वेताळ भैरव आदी गणांना दिली. कारण आपल्या पतीचा अपमान केला गेल्यामुळे सतीनं (शंकराच्या प्रिय पत्नीनं) आत्मदहन केलं होतं.
त्या यज्ञाचा समूळ संहार केल्यावर त्या श्रमानं वेताळाला लागलेली भूक काहीही खाल्लं तरी शमेना म्हणून महाकाल शंकरानं वद्य पक्षातील अष्टमी त्याला खायला दिली. दर महिन्यातील वद्य अष्टमी ही ‘कालाष्टमी’ म्हणून ओळखली जाते. दरवेळी ही तिथी आपल्याला सांगते, ‘आयुष्यातील आणखी एक महिना कमी झालाय. आयुष्याची काकडी काळ कचाकचा खातोय.’ हा मासिक संस्कार खूप महत्त्वाचा आहे. आपली मनबुद्धी मात्र यासाठी संवेदनक्षम असायला पाहिजे. असो.

नवमी तिथी ः समर्थ रामदासांनी ‘दासबोधा’त नवविधा भक्तीचे वर्णन करताना ‘नववी भक्ती आत्मनिवेदन’ असं म्हटलंय. आत्मनिवेदन करताना ‘मी’चं खरं स्वरूप चिंतन करून समजून घेणं नि नंतर या ‘मी’चा (‘मी’पणाचा) नैवेद्य (निवेदन) सद्गुरूंना किंवा परमेश्वराला दाखवणं. एका अर्थी ही पूर्ण, बिनशर्त (टोटल, अन्‌‍कंडिशनल, सरंडर) शरणागती आहे, जी आध्यात्मिक उपासनेत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वामनावतारातील विष्णू भगवानांनी बळीराजाने आपले मस्तक पुढे करून (आत्मनिवेदन) तिसरं पाऊल मस्तकावर ठेवण्याची प्रार्थना केली ती मान्य केली. एका अर्थी आत्मनिवेदन म्हणजे ‘मी’पणानं (अहंकार) संपणं.
समर्थांनी आपल्या महासमाधीसाठी नवमी तिथीच निवडली होती. ‘माघ वद्य नवमी। जाणे आहे परंधामी। ऐसा निश्चय अंतर्यामी। केला असे।’ हे उद्गार काढूनच समर्थ थांबले नाहीत तर तो दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसे प्रिय शिष्य उद्धव दिसला की त्याला आठवण करून देत होते- ‘अनुदिन नवमी हे नित्य ध्यानी धरावी। लगबग करुनि हे कार्यसिद्धी करावी।’ आपल्यासाठी जीवनमुक्त होण्यासाठी नवमीचा हा संस्कार मानायला काय हरकत आहे?
पं. सातवळेकर हे एक अध्यात्मातले अधिकारी महानुभाव (अनुभवी व्यक्ती) होऊन गेले. त्यांच्या चिंतनाचा आधार घेऊन काहीसं मुक्तचिंतन करूया. ‘अष्टमी’ ही मधली तिथी असल्यानं त्या रात्री अर्धा चंद्र असतो. शुक्ल पक्षात अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत (पूर्ण चंद्रापर्यंत) आयुर्वेदातली काही औषधं चंद्रप्रकाशात ठेवली जातात. चंद्रप्रकाशाचा औषधी गुमधर्म आपल्याला कोजागरी पौर्णिमेच्या साजरीकरणातही प्रत्ययाला येतो. एवढंच नव्हे तर शक्य असेल तेव्हा उघड्या जागी (टेरेसवर) शक्यतो शरीराचा अधिक भाग चंद्रप्रकाशात उघडा ठेवणं आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचं आहे. याला ‘रोमाहार’ म्हणतात. रोम म्हणजे अंगावरचे केस. ते जेथून उगवतात त्याला रोमरंध्र (छिद्र) म्हणतात. त्यातून जसा घाम बाहेर येतो तसा सूर्य-चंद्राचा प्रकाश (किरण) आत जातो. सूर्यकिरणांमुळे शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व (व्हिटॅमिन डी) निर्माण होतं, तर चंद्रप्रकाशामुळे मन शांत व्हायला मदत होत असेल. कारण हा मनाचा स्वामी आहे. असो.

अष्टमीनंतर येणाऱ्या नवमीला ईश्वराला संपूर्ण समर्पण- शरणागतीचा संकल्प करायचा. आत्मनिवेदन भक्तीचा चिंतनाच्या पातळीवर अभ्यास करायचा.
दशमी-एकादशी-द्वादशी ः नंतर येणाऱ्या दशमीचा संस्कार असतो. ‘दश-शमी’ म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा) आणि पाच कर्मेंद्रिये (हात, पाय, जीभ (वाणी), मलमूत्र विसर्जन (उत्सर्जन) आणि जनेंद्रिय) अशा दशेंद्रियांची संयम-शांती. केवळ तृप्ती नव्हे तर निर्धारपूर्वक संयम. हा फार मोठा संस्कार आहे तनामनाच्या आरोग्यासाठी. यासाठी कमी खाणे, निराहार राहणे, उपवास करणे या गोष्टी पूरक ठरतात. हा तीन दिवसांच्या (दशमी-एकादशी-द्वादशी) एकादशी व्रताचा गाभा आहे. केवळ रूचिपालटासाठी उपास नाहीये. हल्ली तर ‘एकादशी- डायेटिंग थ्रू फास्टिंग’ अशा आशयाची पुस्तकं अनेक भाषांतून लिहिली जातात. असो.

दहा इंद्रियांना शांत करून (दश-शमी, दशमी) नंतर येणारी पवित्र तिथी म्हणजे एकादशी. शैव (शिवाच्या उपासकांची) एकादशी ही ‘स्मार्त’ एकादशी म्हणून, तर विष्णुभक्तांची (वैष्णवांची) एकादशी ‘भागवत’ एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी दहा इंद्रियांना अकरावं मन जोडून साजरी करायची असते एकादशी.
एकादशी तिथी ही सर्व तिथीत आध्यात्मिक उपासनेच्या दिशेनं गौरवशाली, पवित्र तिथी आहे. संतमंडळीत तर तिला मानाचं स्थान आहे. तुकोबांसारखा बंडखोर संतही आग्रहानं सांगतो- ‘व्रत करा एकादशी, गळा माळा तुळशी असो वा नसो.’ वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेपेक्षा एकादशी व्रताला महत्त्व आहे. प्रत्यक्षात हे दशमी-एकादशी-द्वादशी असं तीन दिवसांचं व्रत आहे.
इंद्रियांचं शमन करण्यासाठी दशमीला एकभुक्त राहणं म्हणजे एकदाच जेवण करणं, रात्री लंघन (काहीही न खाणं) किंवा फलाहार, दुग्धाहार असा अल्पाहार अपेक्षित असतो. हलक्या पोटानं रात्रभर नामगजर नि नामजागर करायचा असतो. एकादशीच्या दिवशी आहार नियंत्रण नि अखंड भजन-कीर्तन करणं. असं करणारी असंख्य मंडळी आहेत. दशमीला सुरू झालेल्या आहार नियमन आणि एकादशीच्या अखंड भजन-पूजन-नामसंकीर्तन या साऱ्याची सांगता द्वादशीला दुपारी सात्त्विक भोजन करून करायची असते. हे सारं विठ्ठलाला (किंवा ईश्वराला) अर्पण करायचं असतं. त्याच्याशी आध्यात्मिक लग्न लावायचं असतं म्हणजे उपासनेनं संलग्न व्हायचं असतं.

असंही सुचवलं जातं की दशमीला दशेंद्रियांच्या शमनानंतर एकादशीला त्याला मन जोडायचं. याद्वारा अकरा इंद्रियांवर संयम साधायचा असतो. ‘मना’लाही इंद्रिय मानलं जातं हा विशेष आहे. मग द्वादशीला याला ‘बुद्धी’ जोडायची नि एकादशी व्रताची सांगता करताना संकल्प करायचा की, या तीन तिथींचा संस्कार म्हणून मला मनःशांती-स्थिरबुद्धी-चित्तशुद्धी या त्रिवेणीचा लाभ होवो. ही एकूणच स्वभावपरिवर्तन, आत्मानुशासन (स्वयंशिस्त), व्यक्तिमत्त्व विकास यासाठी आपल्या संस्कृतीनं निर्माण केलेली सहज व्यवस्था आहे.

विचार करा, अशी संधी महिन्यातून दोनदा शुद्ध नि वद्य एकादशीला मिळते. म्हणजे एकूण सहा दिवस म्हणजे एक आठवडा आहार-विहारच नव्हे तर विचार-उच्चार-आचार यांद्वारे व्यक्तिमत्त्व विकासाची पर्वणी मिळू शकते. पण ‘केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहिजे।’ हेच सूत्र इथंही लागू पडतं.
जीवनसंस्कारांसंबंधी विचार करताना तिथीचे संस्कार हा एक पैलू समोर आला. त्यावर सुफल समृद्ध जीवनाच्या अंगानं सहचिंतन करत आपण द्वादशीपर्यंत पोहोचलो आहोत. उरलेल्या चार तिथींवर सहचिंतन पुढच्या वेळी.
संस्कार-संस्कृती-संस्कृत-सुसंस्कृत अशी ही परस्पर पूरक नि पोषक साखळी आहे. परदेशातील असंख्य मंडळींना याचं विलक्षण आकर्षण वाटू लागलंय. आपण भारतीयांनीही आपल्या मातृसंस्कृतीचा असा विचार नि डोळस स्वीकार करायला हवा, तर आणि तरच भारतीय जीवनप्रणाली विश्वविजयी बनेल. नि मुख्य म्हणजे यासाठी कोणत्याही हिंसक शस्त्रास्त्राची गरज पडणार नाही. ही खरी गौरवशाली आत्मसंस्कृती ठरेल. मानवजातीचं कल्याण करणारी.