Home आयुष वंध्यत्वामध्ये मेध्य रसायन

वंध्यत्वामध्ये मेध्य रसायन

0
  • डॉ. मनाली महेश पवार

वंध्यत्वाचा परिणाम जोडप्याच्या शरीर व मनावर होत असतो. गर्भवती राहण्यासाठी संघर्ष करणे एवढेच आपल्या हाती आहे, असे काहींना वाटते. पण ती केवळ शारीरिक समस्या नाही; त्याचा मनावर फार मोठा भावनिक परिणाम कळत-नकळत होत असतो.

वंध्यत्वाचा परिणाम जोडप्याच्या शरीर व मनावर होत असतो. गर्भवती राहण्यासाठी संघर्ष करणे एवढेच आपल्या हाती आहे, असे काहींना वाटते. पण ती केवळ शारीरिक समस्या नाही; त्याचा मनावर फार मोठा भावनिक परिणाम कळत-नकळत असतो. वंध्यत्वामध्ये नैराश्य, चिंता, तणाव, आत्मसन्मानाची कमतरता, भावनिक त्रास अशा अनेक मानसिक आव्हानांना तोंड द्यावे लागते. आर्थिक ताण व अपयशाची सततची भीती यामुळे ही जोडपी नेहमी चिंतेत असतात.
गर्भधारणा होण्यास अडचण असल्यास अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते.

  • जोडपी सतत दुःखी असतात. प्रत्येक पाळीच्या वेळी पाणी आल्यावर दुःखी आणि निराश होतात.
  • आपल्याला मूल नाही व घरात इतर भावंडांना मुलं असल्यास सतत अपराधीपणा वाढतो.
  • सतत एकटेपणा जाणवतो.
  • राग-संतापसुद्धा वाढू शकतो.
  • मुले किंवा अपत्य नसल्यामुळे आपल्याला इतर कमी लेखत आहेत, ही भावना उत्पन्न होते.
  • गर्भवती होण्याचा प्रयत्न करताना हार्मोनल बदलांमुळे तीव्र मूड स्विंग होतो. चिंता आणि नैराश्याचा अनुभव येऊ शकतो. या सततच्या भावनिक ताणामुळे ऊर्जा कमी होते.

आयुर्वेदशास्त्राप्रमाणे शुक्रनिर्मिती व प्रवर्तनामध्ये शरीर व मनाला फार महत्त्व आहे. मग ते स्त्री-शुक्र असो वा पुरुष-शुक्र! म्हणूनच जर शरीर व मन यांचे बल योग्य असेल तरच शुक्रधातूचे जनन व प्रवर्तन उत्तम होते. कामतृप्ती होणे हा स्त्री-पुरुष संबंधातील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. तो शरीर व मनाला बल प्राप्त करून देतो. मनाला आल्हाद होणे हे प्रधानधातू म्हणजे शुक्र याचे प्रवर्तक आहे. त्यामुळे वृत्ती आनंदी हवी. बीजदुष्टी जे वंध्यत्वामध्ये महत्त्वाचे कारण आहे, ते मानसिक असमाधानामुळे होऊ शकते. म्हणून वंध्यत्वाची चिकित्सा करताना फक्त शारीरिक कारणांचा विचार न करता, मनालाही तेवढेच महत्त्व द्यावे. मन शुद्ध हवे. त्यासाठीच आयुर्वेदशास्त्रामध्ये वंधत्वाची चिकित्सा सांगताना मेध्य रसायनाचा उपयोग करण्यास सांगितले आहे.
रसादी सप्तधातूंच्या वर्धनासाठी ज्या उपक्रमांचा उपयोग केला जातो त्यांना ‘रसायन’ म्हणतात. रसायनाने शरीरधातूंची सुयोग्य निर्मिती व बलवर्धन होत असल्यानेच शरीरातील व्याधिक्षमत्व-व्याधिप्रतिकारशक्ती वाढते व त्यामुळे रोगनाशन घडते. त्याचप्रमाणे तारुण्य अधिक काळ टिकावे म्हणून करायची ही चिकित्सा आहे.

  • रसायनाने सप्तधातुवर्धन होते, म्हणजे शुक्राची वृद्धी आलीच. या शुक्रवृद्धीमुळेच मैथुनक्षमता अधिक वाढते.
  • रसायनाने केवळ शरीरबल वाढावे एवढीच अपेक्षा नसून, त्याबरोबर मनोबल वाढावे अशीही अपेक्षा असते. शरीरांतर्गत अग्नीची स्थिती प्राकृत राहण्यासाठी मनाची स्थितीही विचारात घ्यावी लागते. व्याधी-प्रतिकारशक्ती ही मनोबलावरही अवलंबून असते. आयुर्वेदीय शास्त्रकारांनी यासाठीच ‘आचार रसायन’ हा महत्त्वाचा उपक्रम सांगितला आहे. हे एक मानस रसायन आहे. धी, धृती, स्मृती, मेधा आदी बुद्धीच्या सर्व प्रकारांचे चांगल्या तऱ्हेने संवर्धन व्हावे, यासाठी मनावर कार्य करणारे ‘मेध्य रसायन’ वर्णिलेले आहे. वचा, जटामांसी, शंखपुष्पी, ब्राह्मी, घृत आदी अनेक द्रव्यांचा समावेश मेध्य रसायनामध्ये केला जातो. सुवर्ण हेही एक उत्कृष्ट मेध्य रसायन आहे.
  • मण्डुकपर्णी स्वरस, यष्टीमधू, गुडूचा स्वरस व मूळ, तसेच फळासहीत शंखपुष्पी कल्क ही चार प्रमुख मेध्य रसायन आहेत.
  • मण्डुकपर्णी स्वरस मधाबरोबर घ्यावे.
  • यष्टीमधू चूर्ण दुधाबरोबर घ्यावे.
  • गुडूची चूर्ण मधाबरोबर घ्यावे.
  • शंखपुष्पी कल्क हा दुधाबरोबर घ्यावे.
    मेध्य रसायन आयुष्य वाढविणारे, रोगनाशन करणारे, अग्नी-बल-वर्ण आणि स्वर वाढविणारे आणि विशेषतः ताण-तणाव कमी करून मनाला आनंद देणारे आहे.

मेध्य रसायन

  1. मण्डुकपर्णी ः हे एक महत्त्वाचे मेध्य द्रव्य आहे. या वनस्पतीची पाने शीतल, रेचक, कडू, तुरट आणि गोड असतात. ही काही ठिकाणी ब्राह्मी म्हणूनदेखील ओळखली जाते. याची पाने किंवा संपूर्ण भाग औषधी म्हणून वापरला जातो. मण्डुकपर्णीला तीव्र वास असतो आणि चव कडू असते. ताज्या औषधी वनस्पतींमध्ये लांब, पातळ, किंचित रसाळ, रेंगाळणारे देठ असतात, ज्याच्या खालच्या भागात गाठी असतात. त्यातून तंतुमय मुळे बाहेर पडतात.
    मण्डुकपर्णीचे फायदे
  • स्मरणशक्ती वाढवते. स्मृती, एकाग्रता यांमध्ये वाढ करते.
  • तणाव कमी करते.
  • त्वचेचा रंग सुधारून आणि डाग कमी करून त्वचा निरोगी करते.
  • त्वचेला प्रोत्साहन देण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • अँटी-ऑक्सिडंट म्हणूनही उपयोग केला जातो.
    वंधत्वाची चिकित्सा घेताना या वनस्पतीचा नक्की उपयोग करावा. मण्डुकपर्णी मूबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे शक्यतो त्याचा रस काढून मधासोबत घ्यावा.
  • वाळलेल्या मंडुकपर्णीची पाने गरम पाण्यात भिजवून चहाप्रमाणे घ्यावी.
  • या वनस्पतीची कॅप्सुल किंवा सप्लिमेंट स्वरूपात उपलब्ध आहे.
  1. यष्टिमधु ः जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात ही औषधी चघळली जाते. यालाच ज्येष्ठमध म्हणतात. ही औषधी चवीने गोड व स्निग्ध असते. या औषधाला जीवनीय म्हटले आहे. यष्टिमधु आवाज सुधारण्यास मदत करते.
  • यष्टिमधु चांगले कामोत्तेजक, वीर्य प्रमाण आणि गुणवत्ता वाढवते.
  • थकवा दूर करते, ऊर्जा प्रदान करते.
  • विषाणूंशी लढणाऱ्या रोगप्रतिकारक प्रणालीत हे प्रमुख रसायन आहे.
  • अर्धा कप कोमट दुधासह 2 ग्रॅम ज्येष्ठमध चूर्णाचे नियमित सेवन करावे. हे एक उत्कृष्ट मेंदू टॉनिक आणि पुनरुज्जीवनकारक मेध्य रसायन आहे.
  1. गुडूची किंवा गूळवेल
    ही हृदयाच्या आकाराची पाने असलेली वेल आहे. या वनस्पतीचे सत्त्व औषधी म्हणून वापरले जाते. गुळवेलच्या पानांचा स्वाद कडू आणि तिखट असतो. हे औषध तीनही दोषांना समस्थितीत आणते. गुळवेलचा उपयोग करताना त्याचे खोड वापरले जाते.
    कॅन्सर, ज्वर, त्रिदोष विकार, त्वचारोग, नेत्ररोग, पांडुरोग, प्रमेह, मूत्रविकार, अंग्रहणी, सर्दी-पडसे, हृदयविकार आदी विकारांवर गुळवेल एक उत्तम औषध आहे.
    गुडूची हे बल्यशक्ती सुधारणारे द्रव्य आहे. गुडूची वयस्थापक म्हणजे वृद्धत्वविरोधी, पुनरुज्जीवन करणारे व वृष्य म्हणजे कामोत्तेजक द्रव्य आहे.
  2. शंखपुष्पी
    शंखाच्या आकाराची फुले असणारी ही वनस्पती म्हणजे शंखपुष्पी. शंखपुष्पीपासून बनवलेले टॉनिक मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी, मानसिक थकवा दूर करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी वापरले जाते.
  • या वनस्पतीमुळे एकाग्रता वाढते आणि विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता वृद्धिंगत होते.
  • मनाचा थकवा दूर करण्यासाठी शंखपुष्पी हा एक चांगला उपाय आहे.
  • आजकाल झोप न येणे अगदी सामान्य आहे. शंखपुष्पी सेवन केल्याने मेंदूवरील ताण कमी होतो व शांत झोप लागते. याची दुधात मिसळून पावडर सेवन करावी.
    अशा प्रकारे मेध्य रसायनांचा वंधत्वामध्ये उपयोग करून शरीरबल, मानसिक बल, व्याधीप्रतिकारशक्ती, ताण-तणाव दूर करून वंधत्वावर मात करता येते.