संरक्षणसिद्धतेचा ‘अग्नि’

0
482

– हेमंत महाजन
देशाच्या युद्धक्षमतेच्या दृष्टीने तीन महत्त्वाच्या घटना नुकत्याच घडल्या. अमेरिकेशी केलेल्या एका महत्त्वपूर्ण संरक्षण करारामुळे आपण अमेरिकेच्या मदतीने चार शस्त्रे भारतात तयार करणार आहोत. दहशतवादी कारवाईच्या विरोधात करता येणार्‍या रावेन नामक यूएव्ही हे आता भारतामध्ये तयार होणार आहे. तसेच आपल्याकडे असणार्‍या सी-१३० या हर्क्युलस विमानामध्ये आता टेहाळणी करण्याकरिता अद्ययावत तंत्रज्ञान बसवण्यात येणार आहे. याशिवाय न्युक्लियर बायलॉजिकल किंवा केमिकल लढाई झाल्यास त्यावेळी सैनिकांचा बचाव होण्यासाठी ङ्गायदेशीर ठरतील अशा प्रकारचे कपडे अमेरिकेच्या मदतीने भारतात तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय अमेरिका आपल्याला एक नवीन प्रकारचे विमानवाहू जहाज तयार करण्यासाठी मदत करणार आहे, तसेच भारतात सध्या बनवल्या जाणार्‍या पाणबुड्यांबाबत संशोधन करण्यासाठी आणि या पाणबुड्यांच्या निर्मितीमध्ये सहकार्य करण्याबाबत आपण जपानची मदत घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. अमेरिकन आणि जपानी तंत्रज्ञान वापरून आपला शस्त्रास्त्रांचा दर्जा अधिक उच्च प्रतीचा बनवता येणे शक्य होणार आहे. अलीकडेच आपण स्वदेशी बनावटीच्या अण्वसस्त्रवाहू आंतर खंडीय (खपींशी उेपींळपशपींरश्र इरश्रश्रळीींळल चळीीळश्रश(खउइच)) अग्नी-५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अग्नी-५ हे क्षेपणास्त्र पाच हजार किलामीटर लांब पल्ल्याचे आहे. या क्षेपणास्रामुळे चीनपर्यंतची सर्व लक्ष्ये आता भारताच्या टप्प्यात आलेली आहेत. अग्नी-५ ची उंची १७ मीटर आणि वजन ५० टन आहे. क्षेपणास्त्राचे दोन भाग असतात. पहिले वॉरहेड आणि दुसरे वॉरहेडला घेऊन जाणारे वाहन. स्ङ्गोट होणारा जो भाग आहे, त्याचे वजन १.५ टन एवढे आहे. वॉरहेडमध्ये अणुबॉम्बही बसवता येते. याचा पल्ला पाच हजार किलोमीटर असल्यामुळे पूर्ण चीन आशिया आणि युरोप खंडातला बहुतेक भाग आणि आङ्ग्रिकाही आपल्या क्षेपणास्त्राच्या पल्ल्यामध्ये आलेला आहे. या क्षेपणास्त्राचा वेग हा आवाजाच्या २४ पटीने जास्त आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी घेताना टाट्रा ट्रकवरुन कनिस्टर पद्धतीने ते आकाशात ङ्गेकण्यात आले. टाट्रा ट्रकवरून हे ङ्गायर करता येत असल्यामुळे हे क्षेपणास्त्र हालचाल करण्यास, ने-आण करण्यास सोपे आहे. यामुळे या क्षेपणास्त्राची जागा बदलता येते. यामुळे देशाच्या कोणत्याही भागात ते नेता येऊ शकते. अग्नी-५ हे भारताचे सर्वांत पहिले अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे.(आयसीबीएम) या क्षेपणास्राच्या यशस्वी चाचणीमुळे क्षेपणास्त्र युद्धामध्ये भारताने अतिशय महत्त्वाचा पल्ला गाठलेला आहे. याबाबत आपल्या शास्त्रज्ञांचे नक्कीच कौतुक केले पाहिजे.
आज भारत-चीन किंवा भारत-पाकिस्तान असे युद्ध झाले तर ते तीन प्रकारे होऊ शकते. पहिला म्हणजे दहशतवाद्यांशी घुसखोरी करून किंवा भारताच्या आत असणार्‍या अनेक प्रकारच्या बंडखोरांना मदत करून भारतामध्ये कारवाया करणे. सध्या चीन पाकिस्तानच्या मदतीने काश्मीरमध्ये अशा प्रकारच्या हालचाली करत आहे आणि मध्य भारतामध्ये पसरलेल्या माओवाद्यांना आर्थिक आणि शस्त्रास्त्रांची मदत करत आहे. याविरुद्धचा लढा आपण लवकर जिंकणे आवश्यक आहे; मात्र त्यासाठी वेगळ्या प्रकारची शस्त्रे आणि लष्करी डावपेचांची गरज आहे.
दुसरा प्रकार हा पारंपरिक युद्धाचा आहे. अशा प्रकारचे युद्ध भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९४७, १९६५, १९७१ आणि १९९९ साली झाले होते. १९६२ साली चीनशी युद्ध झाले होते. ही पारंपरिक युद्धे होती. ती सीमेवर झाली. यामध्ये भारताचे सैन्य चीन किंवा पाकिस्तानच्या सैन्याशी लढले. भारताचे हवाई दल आणि नौदल हे चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाशी लढले. तज्ज्ञांच्या मते, २०२० ते २०२५ मध्ये भारताचे सीमावादामुळे चीनशी युद्ध होऊ शकते. पण या युद्धासाठी आपली पूर्ण तयारी झाली आहे का ? सध्या आपली शस्त्रे जुनाट आहेत. दारुगोळा कमी आहे आणि सीमेवर रस्ते आणि रेल्वे लाईनची कमतरता आहे. मोदी सरकारने यावर अनेक पावले उचलायला सुरुवात केली आहे. पण याकरिता १५० दशलक्ष डॉलरहून जास्त खर्च होऊ शकतो. पारंपरिक युद्ध जिंकण्यासाठी आपल्यामध्ये सध्या असणार्‍या त्रुटी आगामी १० ते १५ वर्षांमध्ये पूर्णपणे दूर होऊ शकतात. पारंपरिक युद्धामध्ये वापरण्यासाठी आपल्याकडे पृथ्वी, ब्रम्होस आणि अग्नी-१ आणि २ अशी काही क्षेपणास्त्रे आहेत. याशिवाय त्रिशूल आणि नाग ही क्षेपणास्त्रे भारताच्या लष्करामध्ये सामील होणार आहेत. पारंपारिक युद्धासाठीची तयारी लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.
क्षेपणास्त्र आणि अणुयुद्धाचा धोकाही आहे. या प्रकारचे युद्ध केव्हा होईल याचा अंदाज बांधणे महाकठीण आहे. १९४५ नंतर अणुबॉम्बचा वापर जगात कोठेही झाला नाही. तरीही पाकिस्तान आणि चीनकडून वेळोवेळी मिळणार्‍या धमक्यांमुळे आपल्याला अणुयुद्धाकरिता आणि क्षेपणास्त्र युद्धाकरिता तयार राहणे महत्त्वाचे आहे. अणुबॉम्ब टाकण्याकरिता दोन गोष्टींची गरज असते. एक म्हणजे अणुबॉम्ब आणि दुसरे म्हणजे त्याला घेऊन जाणारे वाहन (कॅरिअर). आकाशातून अणुबॉम्ब टाकण्यासाठी आपल्या हवाईदलात सुखाई आणि मिराज अशी विमाने सध्या आहेत. आजमितीला ती पुरेशी आहेत. मात्र पाणबुडीतून अणुबॉम्ब टाकण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही. ती येण्यासाठी आणखी १०-१५ वर्षे लागू शकतात. जमिनीवरुन क्षेपणास्त्रांचा मारा करण्यासाठी आपल्याकडे पृथ्वी आणि अग्नी हे दोन क्षेपणास्त्र आहेत. पृथ्वी क्षेपणास्त्राचा पल्ला १०० ते ७५० किलोमीटर आहे. सध्या हे क्षेपणास्र भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहे. मात्र चीनवर हल्ला करण्याकरिता आपल्याला अग्नी-५ सारख्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची गरज आहे. म्हणूनच या क्षेपणास्राची नुकतीच झालेली चाचणी ही अतिशय महत्त्वाची आहे.
आजघडीला पाकिस्तानमध्ये १०० ते १२० अणुबॉम्ब असावेत, असा अंदाज आहे. याशिवाय त्यांच्याकडे शाहीद आणि घोरी ही चीन आणि उत्तर कोरियाच्या मदतीने तयार केलेली क्षेपणास्त्रे आहेत. शाहीद २ चा पल्ला हा २५०० किलोमीटरच्या आणि घोरी २ चा पल्ला हा १८०० किलोमीटरच्या आसपास आहे. यामुळे मध्य भारतापर्यंतचे लक्ष्य ही पाकिस्तानी क्षेपणास्त्राच्या पल्ल्यामध्ये आहेत. सध्या पारंपरिक युद्धात वापरण्यासाठी पाकिस्तान नासिर नावाचे ६० किलोमीटर पल्ल्याचे एक क्षेपणास्त्र तयार करत आहे. दुसरीकडे, चीनबाबत बोलायचे तर त्यांच्याकडे अणुबॉम्बची संख्या ही प्रचंड आहे. एका अंदाजानुसार ही संख्या २५० च्या आसपास असावी. चीनकडे विमानातून, जमिनीवरून, पाणबुडीतून, समुद्रातून मारा करता येणारी क्षेपणास्त्रे आणि त्यासाठीची आवश्यक अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे. अणुबॉम्बच्या लढाईमध्ये याला ट्रायेड असे म्हटले जाते. शक्तीशाली देशांकडे जमिनीवरुन, पाण्यामधून आणि आकाशातून ङ्गायर करण्याची क्षमता असते. अशा प्रकारची सर्व क्षमता चीनकडे आहे. भारतात आजही पाण्यातून अणुबॉम्ब, क्षेपणास्त्रे यांचा मारा करण्याची क्षमता नाही. भारताकडे असणारे अणुबॉम्ब ङ्गायर करण्यासाठी वाहने पृथ्वी १,२ (३५० किमी) अग्नी १,२ ही २००० किलोमीटरपर्यंत जातात आणि अग्नी ३ हे ३००० किमीपर्यंत जाते. ती भारतीय सैन्यात सामील आहेत. मागील वर्षी चाचणी घेण्यात आलेल्या अग्नी ४ चा टप्पा ४००० किलोमीटर इतका आहे. मात्र ते भारतीय सैन्यात येण्यास आणखी २-३ वर्षे लागू शकतात. अग्नी ५ साठी शस्त्र म्हणून सैन्यात येण्याकरिता अजून सुद्धा ५-७ वर्षे लागू शकतात.
थोडक्यात, आज आपल्याकडे जी क्षेपणास्त्रे आहेत त्याच्या मदतीने आपण पाकिस्तानशी युद्ध करण्याकरिता पूर्णपणे सक्षम आहोत. मात्र चीनशी अणुयुद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी क्षेपणास्त्रे नाहीत. अग्नी-५ च्या परीक्षणामुळे ही गरज आता मोठ्या प्रमाणात पूर्ण होण्याची शक्यता आहे. अग्नी ४ आणि अग्नी ५ यांच्या उर्वरित चाचण्या लवकरात लवकर पूर्ण करून ही क्षेपणास्त्रे भारतीय सैन्यात दाखल होणे आवश्यक आहे. एका अंदाजाप्रमाणे आपल्याला किमान २५ ते ४० अग्नी क्षेपणास्त्रांची गरज असू शकते.
आपल्या देशाकडे अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्र असणे ही संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब झाली, पण त्यांचा वापर करण्याची मानसिकता असणे ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी आपल्या राष्ट्रीय स्तरावर असलेल्या नेतृत्वाला हे क्षेपणास्त्र कुठे केव्हा आणि कधी वापरायचे या युद्धशास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून क्षेपणास्त्रांचा वापर करण्याबाबतच्या धमक्या देऊन आपल्यावर अनेकदा दबाव आणला जात असतो. म्हणूनच अशा प्रकारच्या तीनही युद्धाची माहिती ही आपल्या नेतृत्वाला असणे गरजेचे आहे. भारतीय सैन्य अशा लढाईकरिता नेहमीच तयार असतेच. पण आपले राजकीय नेतृत्व अशा प्रकारची लढाई झाली तर तयार असणे हे महत्त्वाचे असते. यासाठी युद्धशास्राचे नियम आणि संकेत यांचे अवलोकन करून अचूक वेळी इच्छाशक्ती दाखवणे आवश्यक असते.