प्रतिष्ठा पणाला

0
90

दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान होत आहे. जवळजवळ एक कोटी ३३ लाख मतदार ६७३ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंदिस्त करणार आहेत. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा कस पुन्हा एकदा लागणार आहे. ज्या अरविंद केजरीवालांना ‘पळपुटा’, ‘अराजकतावादी’ म्हणून निकाली काढले होते, त्यांनी मोदी यांच्यापुढे परत एकदा आव्हान उभे केले आहे असे निवडणुकीचा एकूण रागरंग पाहता दिसते. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या सातपैकी सातही जागा जिंकून दिल्ली भगवी करण्यात यशस्वी ठरलेल्या मोदी लाटेचा प्रभाव पुन्हा एकदा आज आजमावला जाणार आहे. भाजपापाशी यावेळी केजरीवालांना थेट टक्कर देऊ शकणारा चेहरा नव्हता. त्यामुळे ऐनवेळी किरण बेदींना पक्षात घेऊन केजरीवालांना तुल्यबळ चेहरा समोर केला गेला आहे. हा जुगार पक्षाला कितपत मानवला वा किती भोवला हे आजच्या निवडणुकीचा निकाल सांगणार आहे. आम आदमी पक्षाने आजवर अनेक चुका केल्या. दिल्लीत हाती आलेल्या सत्तेवर अवघ्या ४९ दिवसांत लाथ मारण्याचा आततायीपणा करणार्‍या केजरीवाल यांना अजूनही दिल्लीच्या आम आदमींमध्ये लोकप्रियता आहे हे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या निवडणूक प्रचारामध्ये दिसून आले. भाजपाचा मध्यमवर्गीयांचा बालेकिल्लाही बळकट आहे. कॉंग्रेसने शीला दीक्षित यांना बाजूला काढून अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे या तिहेरी रणधुमाळीमध्ये बाजी कोण मारणार याबाबत साहजिकच उत्सुकता आहे. या निवडणुकीत अपयश आले तर ते मोदींचे नसेल असा बचावात्मक पवित्रा भाजपने आधीच घेऊन टाकला आहे आणि केजरीवाल यांनी तर या निवडणुकीत भाजप मतदानयंत्रांमध्येच घोळ निर्माण करील अशी ‘भीती’ व्यक्त करीत कमालच केली आहे. केजरीवाल यांचा निवडणूक प्रक्रियेवरच विश्वास नसेल, तर त्यांनी निवडणूक लढवूच नये. विजय झाला तर सारे आलबेल आणि पराभव झाला तर मात्र मतदानयंत्रांमध्ये गोलमाल होते म्हणणे ही एक राजकीय नेता म्हणून परिपक्व भूमिका म्हणता येणार नाही. केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची समस्या हीच आहे. मात्र, तरीही दिल्लीच्या सर्वसामान्य श्रमिकांमध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांविषयी, जनसामान्याभिमुख भूमिकेविषयी आस्था आहे. परंतु ती यावेळी मतांमध्ये कितपत परिवर्तीत होईल हे पाहावे लागेल, कारण एकदा पक्षाने हाती आलेली सत्ता धुडकावून टाकल्यानेच या फेरनिवडणुकीची वेळ येऊन ठेपली आहे हे जनता विसरलेली नाही. विशाल दादलानीने संगीतबद्ध केलेले ‘पाच साल केजरीवाल’ गीत मतदारांना किती भावते ते पाहावे लागेल. अर्थात, यावेळी केजरीवाल यांचे जवळचे अनेक सहकारी त्यांच्यापासून दुरावले आहेत. शाजिया इल्मी भाजपाच्या गोटात डेरेदाखल झाल्या आहेत. त्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मिळालेल्या दोन कोटीच्या देणगीचे गौडबंगाल क्षेपणास्राप्रमाणे येऊन आदळलेले आहे. दुसरीकडे, भाजपामध्ये किरण बेदी यांना आयत्यावेळी दिला गेलेला प्रवेश पक्षाच्या पारंपरिक मतदारांना कितपत मानवला हेही या निवडणुकीतून दिसेल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये चर्चवर हल्ले झाले. त्याच्या निषेधार्थ निदर्शनेही नुकतीच झाली. अल्पसंख्यकांमधील ही असुरक्षिततेची भावना मतदानयंत्रावर कितपत परिणाम करील हा भाजपासाठी चिंतेचा विषय आहे. खरे तर दिल्ली विधानसभा निवडणूक घेण्यात सरकारने वेळ लावला. राष्ट्रपती राजवटीखाली राहिलेल्या दिल्लीत काही महिन्यांपूर्वीच निवडणूक घेता आली असती आणि तसे झाले असते तर ते भाजपाच्या पथ्थ्यावर पडू शकले असते. कॉंग्रेससाठी तर ही अस्तित्वाचीच लढाई आहे. गेल्यावेळी तिसर्‍या स्थानी फेकल्या गेलेल्या कॉंग्रेसला अजय माकन पुन्हा सावरू शकतील की नाही हेही आजच्या निवडणुकीतून दिसेल. ही निवडणूक केवळ दिल्ली विधानसभेपुरती सीमित उरलेली नाही. विविध सर्वेक्षणे दाखवीत आहेत त्याप्रमाणे ती एकूणच देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार का, की पुन्हा गेल्यावेळच्या सारखीच त्रिशंकू स्थिती उद्भवणार? दिल्लीत काय होणार याकडे देशाचे लक्ष आहे हे मात्र खरे. नरेंद्र मोदी काय, केजरीवाल काय किंवा राहुल गांधी काय, या तिघांसाठीही ही लढाई प्रतिष्ठेची आहे हे निर्विवाद.