संजीवनी साखर कारखान्यात २०१७ पासून कोट्यवधींचा घोटाळा

0
32

>> आमदार सुदिन ढवळीकर यांचा आरोप

धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्यात गेल्या २०१७ सालापासून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते व मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला. गेल्या दोन वर्षांत तब्बल १४ कोटी रु. चा घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ह्या घोटाळ्याची सीबीआयद्वारे चौकशी केली जावी, अशी मागणीही ढवळीकर यांनी काल एका पत्रकार परिषदेद्वारे बोलताना केली.

२०१७ सालापासून संजीवनी सहकारी साखर कारखान्यात अफरातफर व घोटाळे चालू आहेत. मागील तीन विधानसभा अधिवेशनात आपण त्यासंबंधी लक्षवेधी सूचना मांडल्या होत्या.
मात्र, त्या लक्षवेधी सूचनांवर सभगृहात चर्चा होऊ नये यासाठी कारस्थाने आखण्यात आल्याचा आरोपही ढवळीकर यांनी केला. गेल्या विधानसभा अधिवेशनात भूमिपुत्र विधेयकावरून गदारोळ माजल्याने कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे मागच्या वेळीही सदर लक्षवेधी सूचना चर्चेसाठी येऊ शकली नसल्याचे ढवळीकर म्हणाले.

ऊस कापणीत घोटाळा, चांगली साखर खराब ठरवून अत्यंत कमी दरात त्याचा लिलाव करणे आदी कित्येक घोटाळे कारखान्यात झालेले असून त्याला तत्कालीन नेते व संजीवनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ढवळीकर यांनी केला.

आपण जेव्हा सहकारखात्याचा मंत्री होतो तेव्हा ऊस उत्पादनांना ‘अच्छे दिन’ आले होते. ह्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी ढवळीकर यांनी केली आहे.