येत्या निवडणुकीतही भाजपचीच सत्ता

0
36

>> प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी व्यक्त केला विश्‍वास

>> प्रचाराचा आमोणे – साखळीतून आरंभ

भारतीय जनता पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजयी होणार असल्याचा विश्‍वास गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काल व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने विविध मतदारसंघांत आपले संपर्क दौरे सुरू केले असून त्याची सुरूवात काल मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातून करण्यात आली. त्यावेळी तानावडे बोलत होते.

प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी या राज्यव्यापी दौर्‍याचा आरंभ मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघातील आमोणे येथून केला. यावेळी स्थानिक आमदार या नात्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तसेच सरपंच सालिया गावस यांनी त्यांचे स्वागत केले.

पुढे बोलताना श्री. तानावडे यांनी, प्रत्येक घरात समृद्धी यावी यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे अनेक कल्याणकारी योजना सुरू आहेत. राज्यभरात जनतेकडून भाजपला उदंड पाठिंबा लाभत असल्याचे सांगितले.

पुढे तानावडे यांनी, मुख्यमंत्रीही येत्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या प्रचारासाठी राजकीय दौरा करणार आहेत, अशी माहिती दिली. तसेच एका पक्षाने मुख्यमंत्र्यांवर आरोप केले त्यावेळी साखळीतील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांवरील प्रेमाचे दर्शन घडवत त्या आरोपांचे खंडन केल्याचे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आता गती दिली जाणार आहे. पक्षातर्फे सर्व मतदारसंघांचे दौरे तसेच जनतेशी संपर्क व गाठीभेटी सुरू झाल्या असल्याचे सांगितले. राज्यात पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भाजपचे सरकार सत्तेवर येणार असून विविध कल्याणकारी योजना या बरोबरच मूलभूत, पायाभूत व मानवी विकासाला माझ्या सरकारने चालना दिली. अनेक संकटे असूनही त्यावर मात करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आता विधानसभेत जोरदार मुसंडी मारीत भाजपला सत्तेवर आरूढ करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कार्यरत राहावे असे आवाहन केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, भाजपने नेहमीच येथून प्रचाराची सुरूवात केली आहे. पूर्वाश्रमीच्या पाळी मतदारसंघातून भाजपच्या प्रचाराची सुरूवात केली जात असे. २०१२ च्या निवडणुकीसाठीचा प्रचारही येथूनच सुरू झाला होता असे सांगितले. प्रदेशाध्यक्ष तानावडे हे यंदा राज्यव्यापी दौरा करतील आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. सर्वांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भरगच्च कार्यक्रम
अध्यक्ष तानावडे यांनी काल दिवसभरात साखळी मतदारसंघाच्या दौर्‍यात लोकांशी संवाद साधला. राज्याच्या योजनांची माहिती दिली. तसेच पुन्हा एकदा भाजपला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

न्हावेली, साखळी, कुडणे, पाळी कोठंबी, वेळगे, सुर्ल, हरवळे आदी पंचायत विभागाचा दौरा, कोपरा बैठका आदी भरगच्च कार्यक्रम दिवसभर झाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप मंडळ समिती अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, दीपराज प्रभू, संतोष मळीक, कालिदास गावस, सरपंच, पंच भाजपचे बूथ समिती सदस्य व महिला आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी बूथ समिती तसेच मंडळ समिती यांच्याशी तानावडे यांनी संवाद साधला.