संकेश्वरजवळ भीषण अपघात : गोव्याचे ४ ठार

0
102

>> अक्कलकोटला निघालेल्या कुटुंबांवर काळाचा घाला

गोव्याहून अक्कलकोटकडे निघालेल्या जीए ०७ के ०४२० या मारुती अर्टिगा कारने पुणे – बेंगळुरू महामार्गावर कणगल्यानजीकच्या म्हसोबा – हिटणी नाक्यावर एमएच – १४ – पीएम – ५१५७ क्रमांकाच्या कँटर ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने काल शनिवारी सकाळी ७.१० वाजता झालेल्या भीषण अपघातात सौ. मत्स्यगंधा धनंजय नार्वेकर (३५), त्यांचे पती धनंजय शाबा नार्वेकर (४२), गिरीश गुरुदास साळगावकर (४५) व संतोष सगूण नाईक (३८) या चौघांचा बळी गेला, तर नार्वेकर दांपत्याची अर्चना ही छोटी मुलगी आश्‍चर्यकारकरित्या बचावली. तिच्यासह जखमी सगुण अनंत नाईक (७०), त्यांची पत्नी सुनंदा सगूण नाईक (६५), मुलगा संदीप सगुण नाईक (२७) या चौघांवर बेळगावच्या केएलई इस्पितळात उपचार सुरू आहेत, अशी माहिती संकेश्वर पोलीस स्थानकाचे हवालदार तावरे यांनी ‘नवप्रभा’ ला दिली.

कारमध्ये एकूण आठजण होते व शनिवारी पहाटे अक्कलकोटला जाण्यासाठी पणजीहून निघाले होते. नार्वेकर कुटुंब हे मूळचे घाडीवाडा – आमोणे (डिचोली) येथील असून त्यांचे पणजीत सरकारी वसाहतीत वास्तव्य होते. धनंजय नार्वेकर हे आमोण्यातील भाजपचे खंदे कार्यकर्ते लक्ष्मण नार्वेकर यांचे बंधू होत. बोक द व्हाक येथील नाईक कुटुंबियांसह धनंजय यांनी अक्कलकोट यात्रेचा बेत आखला होता. शनिवार – रविवार सुटी असल्याने शनिवारी भल्या पहाटे नार्वेकर कुुटुंब मारुती अर्टिगा कारने कोल्हापूरच्या दिशेने निघाले. सकाळी ७.१० वाजता पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर म्हसोबा – हिटणी नाक्यावर एका कँटर ट्रकला या भरधाव कारची मागून धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कार ४० फूट फरफटत कँटरसोबत गेली. चालक गिरीष यांच्यासह मागील सिटवर बसलेल्या मत्सगंधा व संतोष हे दोघे जागीच ठार झाले तर चालकाशेजारी बसलेले धनंजय यांच्यासह मागील सिटवर बसलेले सगूण, सुनंदा, संदीप व अर्चनासह चौघेही गंभीर अवस्थेत गाडीतच अडकून पडले. या अपघाताची भीषणता एवढी होती की गंभीर जखमी कोणीही बोलण्याच्या स्थितीत नसल्याने मृत व जखमींची ओळख पटविण्यासाठी बराच उशीर लागला.
दरम्यान, अपघात घडताच मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांसह महामार्गावरून जाणार्‍या काही वाहनधारकांनी वाहने थांबवून घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती काही नागरिकांनी संकेश्‍वर पोलीस स्थानकासह पुंजलॉईडच्या भरारी पथकाला दिली. माहिती मिळताच हुक्केरीचे सीपीआय संदीप मुरगोड, संकेश्‍वरचे फौजदार कुमार हित्तलमनी, सहाय्यक फौजदार अमीनभाई, हवालदार प्रकाश बनहट्टी आदी तातडीने घटनास्थळी पोचले. काही वेळातच भरारी पथकाचे निरीक्षक अण्णापा खराडे, शरीफ करोली दाखल झाले. या सर्वांनी नागरिकांच्या मदतीने कारमधील मृत व जखमींना बाहेर काढून १०८ वाहनाच्या मदतीने संकेश्‍वर सरकारी रुग्णालयात हलविले. जखमींना नंतर पुढील उपचारासाठी केएलई इस्पितळात नेण्यात आले आहेत.
मत्स्यगंधा धनंजय नार्वेकर (३३) या गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान महामंडळामध्ये आवक – जावक लिपिक म्हणून सेवेत होत्या, तर त्यांचे पती धनंजय नार्वेकर हे मजूर खात्याच्या कर्मचारी विमा विभागात सेवेत होते. अपघातात कारचालक गिरीश साळगावकर जागीच ठार झाला आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे ते भाचे असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर साळगावकर हे नगरसेवक सुरेश भोपटे यांच्यासह दुपारी १ च्या सुमारास संकेश्‍वरला पोचले. सर्व मृतदेह शवचिकित्सेसाठी संकेश्वरच्या सरकारी इस्पितळात हलवण्यात आले. तेथून ते गोव्याकडे रवाना करण्यात आले आहेत. आज रविवारी दुपारी बारा वाजता आमोणे – खारवाडा येथील स्मशानभूमीत नार्वेकर दांपत्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात संकेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रवींद्र गडादे, मंडळ पोलीस निरीक्षक संदीप मुरगोड, निरीक्षक कुमार हित्तमलानी यांनी दुर्घटनास्थळाला भेट दिली. सगुण नाईक यांनी फिर्याद नोंदविली. संकेश्वर पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मैत्री आणि शेवटही दवाखान्यातच…
अपघातातील मृत मत्स्यगंधा व सुनंदा या दोघी मैत्रिणी असून त्यांनी बरीच वर्षे एकत्रित नोकरी केली होती. मत्स्यगंधा यांनी पती धनंजय यांना आपण सुनंदा यांच्यासह अक्कलकोटला देवदर्शनाला जावून येऊ, असा आग्रह धरला. त्यानुसार हे सर्वजण देवदर्शनाला निघाले. दर्शनाच्या निम्म्या टप्प्यावरच काळाने झडप घालून सुनंदा यांची खास मैत्रिण मत्स्यगंधा यांना काळाने हिरावून नेल्याने या दोघीत असणारी घनिष्ट मैत्री या घटनेने मिटली आहे. जखमी झालेल्या सुनंदाला ज्या वाहनातून उपचारासाठी आणले जात होते, त्याच वाहनातून मत्स्यगंधा यांचा मृतदेह आणला गेला. त्यामुळे या दोघींच्या मैत्रीची अखेर दवाखान्यातच झाल्याची चर्चा घटनास्थळी नातेवाईकांत सुरू होती.

आमोणा गावावर शोककळा

घाडीवाडा-आमोणा येथील धनंजय शाबा नार्वेकर (४२) व त्याची पत्नी मत्स्यगंधा धनंजय नार्वेकर (३५) यांच्या निधनाची वार्ता आमोणा गावात पसरताच सारा गाव शोकसागरात बुडाला आहे. या अपघातात त्यांची पाच वर्षांची मुलगी अर्चना धनंजय नार्वेकर ही सुदैवाने बचावली असून तीच्यावर उपचार सुरू आहेत. सदर नार्वेकर कुटुंब हे पाटो येथील सरकारी क्वार्टसमध्ये राहत होते. दोघेही सरकारी नोकरीला होते. देवकार्यासाठी व सणावाराला ते आमोण्याला येत असत. दोघेही सुस्वभावी व मनमिळावू होते. हल्लीच फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आपल्या मुलीचा पाचवा वाढदिवस साजरा केला होता. नार्वेकर यांना तीन भाऊ असून दोन विवाहित आहेत तर ७० वर्षांची आई असून मुलगा व सूनेच्या मृत्यूने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रात्रौ उशीरा दोघांचेही मृतदेह गोव्यात आणण्यात येणार आहेत. आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी नार्वेकर दापत्यांच्या अपघाती मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

त्या अकरानंतर पुन्हा चौघेजण…
विशेष म्हणजे महामार्गावरील हिटणी क्रॉस किलर स्पॉट म्हणून गणला जात असून वारंवार येथे अपघात होत असतात. आतापर्यंत या क्रॉसवर झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत अनेकांचे बळी गेले आहेत. दसरा सणाच्या काळात ट्रॅक्स अपघातात अंकली येथील ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची आजही आठवण ताजी असताना पुन्हा शनिवारच्या या घटनेत चौघांचे प्राण गेल्याने हा क्रॉस पुन्हा चर्चेत आला आहे.

अपघाताचे कारण अस्पष्ट
अपघातातील मृत व जखमी सर्वजण पणजी येथून अक्कलकोट येथे निघाले होते. हे सर्वजण पणजीतून पहाटे ४ वा. निघाले असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. अपघातातील जखमींची अवस्था गंभीर असल्याने अपघाताचे नेमके कारण कोणते असावे याबाबतचे ठोस असे कारण पोलिसांना समजलेले नाही. त्यामुळे चक्क पोलिसांनाच या घटनेचे ङ्गिर्याददार व्हावे लागले.