पणजीच्या प्रवेशद्वारावर साकारणार खारफुटीचे उद्यान

0
103

खारफुटीच्या झाडांचे संवर्धन व्हावे तसेच राजधानीत जैव पर्यटनाला चालना मिळावी यासाठी राजधानीत खारफुटीच्या झाडांचे उद्यान तयार करण्याचा विचार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने काल सांगितले. पणजी शहराच्या प्रवेशद्वाराजवळच कदंब पठारावर खारफुटीचे जंगल असलेल्या ठिकाणी हे उद्यान विकसित करण्यासंबंधीच्या प्रकल्पाचा अहवाल ‘मँग्रुव्ह सोसायटी ऑङ्ग इंडिया’ने राज्य सरकारला पाठवला असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालक ए. जी. उंटावाले यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी आम्ही खारफुटीचे उद्यान उभारू पाहत आहोत तेथे खारफुटीची झाडे मुबलक प्रमाणात आहेत. याच झाडांचा वापर करून तेथे पर्यटकांसाठी जैव पर्यटन स्थळ उभारण्याची आमची योजना आहे, असे उंटावले यांनी स्पष्ट केले. या उद्यानासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते जागृती करण्याचे काम सध्या करीत आहे. तसेच मँग्रुव्ह सोसायटी ऑङ्ग इंडियाने त्यासंबंधीचा जो अहवाल आम्हांला पाठवलेला आहे त्याचा अभ्यास राज्य सरकार करीत असल्याचे ते म्हणाले.
पणजी, मेरशी व सांताक्रुझ परिसर मिळून ५६ हेक्टर परिसरात हे उद्यान उभे राहणार आहे. तेथे असलेली मिठागरे व प्रस्तावित उद्यान परिसर यात पर्यटनांसाठी सायकल ट्रॅक, बोटिंग व निसर्ग फेरफटका अशी सोय करण्याचा सरकारचा मानस आहे.