पेशावर ते लाहोर व्हाया पठाणकोट

0
103

– दत्ता भि. नाईक

२५ मार्च २०१६. विश्‍वातील सर्व पंथोपपंथाचे ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्ताच्या क्रूसी फिक्शनचा म्हणजे दुःखाचा दिवस पाळत होते. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे राजधानीचे शहर. प्रधानमंत्री नवाज शरीफ यांचे निवासस्थान असलेले हे सर्वांगसुंदर शहर. या शहरातील सर्वात लोकप्रिय असलेल्या पार्कमध्ये शहरातील ख्रिस्ती बांधव येशू ख्रिस्ताबद्दल श्रद्धा व्यक्त करण्याकरिता जमले होते. अशा या गर्दीच्या ठिकाणी बायबलला मानणारे म्हणजे किताबिया नागरिकांचा मोठा जमाव जमलेला असतानाच युसुफ नावाच्या एका आत्मघातकी युवकाने स्फोट घडवून आणला. या विस्फोटात ७२ जणांचा मृत्यू झाला. मरण पावलेल्यांमध्ये प्रामुख्याने महिला व मुले यांचा अंतर्भाव आहे. ही घटना हिंदूंच्या एकत्रीकरणाच्या वेळी झाली असती तर पाकिस्तान सरकार इतके अस्वस्थ झाले नसते.
मरण पावलेले ख्रिस्ती आहेत; इतकेच नव्हे तर धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्यांवर हल्ला झाल्यामुळे या प्रकारात लक्ष घालणे पाकिस्तान सरकारला क्रमप्राप्त होते. याशिवाय जगातील सर्व समृद्ध व बलवान राष्ट्रे ख्रिस्ती आहेत. त्यांच्याकडून मिळणार्‍या नादारीवरच पाकिस्तानचे अस्तित्व अवलंबून आहे. या सर्व कारणांमुळे प्रधानमंत्री नवाझ शरीफ तसेच लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन नागरी व सेनादलांच्या अधिकार्‍यांना ताबडतोब कारवाई सुरू करण्याचा आदेश दिला.
पठाणकोट हल्ल्याची चौकशी
चांगला दहशतवाद व वाईट दहशतवाद असा फरक करणार्‍या पाकिस्तानने ‘वाईट’ दहशतवादाविरुद्ध झर्ब-ए-अज्ब नावाने मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेमुळे देशात कार्यरत असलेले सर्व दहशतवादी गट अस्वस्थ आहेत, तर काही गट खवळून उठले आहेत.
२०१४ च्या डिसेंबरमध्ये पेशावर शहरातील लष्करी अधिकार्‍यांची मुले जिथे शिकतात अशा शाळेवर तहरिक-ए-तालिबानच्या अतिरेक्यांनी अचानक हल्ला केला. त्यात १४१ जण मृत्युमुखी पडले. यात १२६ लहान वयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे हत्यासत्र तसेच चालू राहिले व २०१६ च्या जानेवारी महिन्यात पेशावर येथे बाचाखान विश्‍वविद्यालयावर हल्ला करण्यात आला. यावेळेस तरुण विद्यार्थ्यांची कत्तल करण्यात आली.
वरील सर्व घटनांच्या मध्यंतरास २०१६ च्या जानेवारीमध्ये पठाणकोट येथील भारतीय लष्कराच्या हवाईतळावर जैश-ए-महंमदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेत पाकिस्तान सरकारचा हात नसल्याची पाक सरकारने साळसूद भूमिका घेतली. याशिवाय भारत सरकारच्या विनंतीनुसार चौकशी पथकही पाठवले. भारत सरकारच्या या भूमिकेमुळे प्रधानमंत्री मोदी यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले.
या चौकशी पथकाच्या शोधमोहिमेतून काहीतरी निघेल असे वाटत असतानाच पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी ‘पठाणकोट हल्ला हा भारत सरकारचाच बनाव आहे’ असे वृत्त प्रसिद्ध केले व शेवटी ७ एप्रिल रोजी पाकिस्तानचे भारतातील राजदूत अब्दुल बसित यांनी पत्रकार परिषद घेऊन या वृत्तपत्रांतील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केले. त्यांनी यापुढे भारत-पाक उच्चस्तरीय अधिकार्‍यांची होऊ घातलेली बैठकही रद्द होईल असे सूचित केले. या बैठकांची मालिका एवढ्यावरून थांबेल असे वाटत नसले तरीही पाक सरकारच्या वतीने भारत सरकारवर केलेला हा एक गंभीर आरोप आहे. २५ डिसेंबर २०१५ रोजी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी पाकिस्तानचे प्रधानमंत्री नवाझ शरीफ यांच्या लाहोर येथील निवासस्थानाला भेट दिली. त्यातून निर्माण झालेल्या सौहार्दपूर्ण वातावरणाला खेद देण्याकरिताच या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.
हॅडलीची साक्ष
डॅव्हिड कोलमन हॅडली हा लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी अमेरिकेत शिक्षा भोगत आहे. त्याची टाडा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्या. जी. ए. सानप यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा साक्ष घेतली. ८ फेब्रुवारी २०१६ रोजी साक्षीत दिलेल्या माहितीप्रमाणे, लष्कर-ए-तोयबा आयोजित मुंबईतील २६ ते २९ नोव्हेंबर २००८ मधील आतंकवादी हल्ल्यापूर्वी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये मुंबईतच हल्ला घडवून आणायची तयारी केली होती. मुंबईतील या आतंकवादी हल्ल्यात द. मुंबईतील विशेष महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले घडवून आणले होते.
या हॅडलीने स्वतःचे नाव बदलून दाऊद सईद गिलानी असे बदलून इस्लामचा स्वीकार केल्याने दहशतवादी गोटात त्याचे वजन वाढले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, मुंबईतील विस्फोटांमागे लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद तसेच त्याचा जवळचा सहकारी झाकीऊर रहमान यांचा प्रामुख्याने हात होता. पाकिस्तानी सेनादलातील व पाकची गुप्तहेर संघटना आय.एस.आय.साठी काम करणारे दोन अधिकारी मेजर इक्बाल तसेच मेजर अली यांची नावेही या घटनेच्या संदर्भात त्याने उघड केली. २००२ मध्ये काश्मीरमधील आतंकवाद्यांना शस्त्रे पुरवण्यासाठी धन पाठवता यावे म्हणून मादक द्रव्यांचा (ड्रग्स) व्यापार करणार्‍यांशी व्यवहार करताना त्याला पाक सरकारने पकडून शिक्षाही दिली होती अशी माहिती त्याने दिली. त्यानंतर हाफिज सईद आणि सजित मीर यांच्या संपर्कातून तो त्यांच्या गोटात सामील झाला व लष्कर-ए-तोयबाच्या तरुणांना ए.के. ४७ बंदुकांचा तसेच स्फोटकांचा वापर करण्याचे प्रशिक्षण देऊ लागला, हेही त्याने या साक्षीत मान्य केले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्याने उल्लेख केलेले हाफीज सईद आणि झाकीऊर रहमान हे पाकिस्तानमध्ये मुक्तपणे वावरत आहेत.
चीनचा नकाराधिकार
हा घटनाक्रम चालू असतानाच कुलभूषण जाधव याला पाक सरकारने अटक करून तो बलुचिस्तानमधील विभाजनवाद्यांना मदत करत होता व ‘रॉ’ या भारतीय गुप्तहेर संघटनेचा प्रतिनिधी आहे असे जगजाहीर केले आहे. कुलभूषण जाधव हा भारतीय नौदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेला अधिकारी आहे. नियमाप्रमाणे नव्वद दिवसांच्या आत त्याला भारतीय दूतावासापुढे हजर केले पाहिजे, परंतु पाकिस्तान या आंतरराष्ट्रीय कराराकडे दुर्लक्ष करत आहे असे लक्षात येते. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मानवाधिकारांचे सतत हनन चालते. तेथील लोकनेते नवाझ अकबर बुगनी यांना पाकिस्तानचे तत्कालीन लष्करी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी विषारी वायूचा वापर करून ठार मारले होते.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात चीनने भारताविरुद्ध नकाराधिकार वापरून २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील आतंकवादी हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचा कमांडर झकीऊर रहमान याला ताब्यात घेण्यासाठी युनो सुरक्षा मंडळासमोरील ठराव रोखून धरला व अगदी अलीकडे मौलाना मसूद अझर या आतंकवादी गटाच्या नेत्यावर युनोद्वारा कारवाई करावी या भारताच्या ठरावालाही चीनने रोखून धरले आहे.
आतापर्यंत रशियाने पाकिस्तानशी जवळिकीचे संबंध ठेवले नव्हते, परंतु रशियानेही पाकिस्तानला एफ-२६ ही लढाऊ विमाने देऊ केलेली आहेत. आतंकवाद्यांशी लढण्याच्या निमित्ताने अमेरिकाही पाकिस्तानच्या शस्त्रागारात भर घालीत असते हे अलाहिदा!
चीन-पाकची युद्धाची खुमखुमी
याच आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ऍश्टन कार्टर यांनी भारताला भेट दिली. या भेटीत अमेरिका-भारत संरक्षण क्षेत्रातील सहकार्याचे अनेक करार झाले. अमेरिकेशी भारताचे संरक्षण क्षेत्रात विशेष महत्त्वाचे करार आतापर्यंत झाले नव्हते. असे करार रशियाशी होत असत. परंतु अमेरिकेशी असलेल्या संबंधांनी आता वेगळेच वळण घेतलेले दिसते. आतंकवादाशी लढायचे असेल, चीनला रोखायचे असेल वा इस्लामिक स्टेटशी दोन हात करावयाचे असतील तर पाकिस्तान हा विश्‍वासार्ह सहकारी राहिलेला नाही हे अमेरिकी सरकारच्या लक्षात आलेले दिसते, किंवा अमेरिकेत वसतीला असलेल्या भारतीय मतदारांची मते आपल्या बाजूने खेचण्याकरिता असेल- अमेरिकेने हे मित्रत्वाचे धोरण अवलंबिलेले आहे.
चीनचा झिंझियांग – ग्वादर महामार्ग अमेरिकेच्या वर्चस्वाला छेद देणाराच असेल याची अमेरिकी सरकारला पूर्ण कल्पना असावी. शेहेचाळीस बिलियन डॉलर्सचा हा प्रकल्प केवळ मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्यासाठी नाही याची कुणालाही कल्पना येईल. पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये चीनने आपल्या सेनेची प्रचंड जमवाजमव केलेली आहे, ही माहिती आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या निरीक्षकांच्या लक्षात आलेली असेलच.
चीन व पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी जगजाहीर आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची एकपक्षीय हुकूमशाही आहे. देशाने प्रांताप्रांतांना बहाल केलेली स्वायत्तता नाममात्रच आहे. केंद्र सरकारसमोर निदर्शने करणार्‍यांवर रणगाडे चालवले जातात. पाकिस्तानमध्ये परिस्थिती काही चांगली आहे असे म्हणता येणार नाही. लोकप्रतिनिधींनी निवडून दिलेल्या सरकारवर लष्कराचा सतत वचक असतो. पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तझीर यांच्यावर इस्लामचा अपमान केल्याचा ठपका ठेवून मुमताज कदरी याने त्याची हत्या केली. मुमताज कदरीवर खुनाचा आरोप सिद्ध झाल्याने त्याला फाशीची शिक्षा देऊन त्याची कार्यवाहीही झाली. या मुमताज कदरीला पाक सरकारने हुतात्मा म्हणून घोषित करावे अशी मागणी सध्या पाकमध्ये केली जाते. २९ मार्च रोजी जवळजवळ पंचवीस हजार निदर्शक राजधानी इस्लामाबाद येथील संसद भवनाजवळ जमले होते. यावेळी जवळजवळ साडेसातशे जणांना अटक करण्यात आली. ही निदर्शने सुन्नी तहरिक व तहरिक-ई-लब्बैक या संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केली होती.
पाकमध्ये सरकार पुरस्कृत आतंकवाद चालूच असतो. पाकिस्तान आतंकवाद्यांचे दोन गट करते. त्यामुळे भारतविरोधी आतंकवाद्यांना मदत करायची, त्यांची प्रशिक्षण केंद्रे चालवायची, लोकशाहीचे नाटक करायचे व आपल्या शस्त्रागारामध्ये अण्वस्त्रे आहेत अशी धमकी द्यायची हाच पाकिस्तानचा खाक्या आहे. पेशावरहून उठलेले हे आतंकाचे मोहोळ लाहोरपर्यंत पोचले, परंतु ते व्हाया पठाणकोट असल्यामुळे हा प्रश्‍न आता पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्‍न असू शकत नाही. भारत-पाक सीमारेषेवर तर सतत गोळीबार चालू असतात. भारत-पाक सीमा ही जगातील चोवीस तास युद्धजन्य असलेली एकमेव सीमारेषा आहे. परंतु या समस्येवर सध्या तरी उत्तर दिसत नाही.