श्रीलंकेचा ९३ धावांनी दारुण पराभव

0
86
India's Lokesh Rahul plays a shot during the first T20 cricet match between India and Sri Lanka at the Barabati Stadium in Cuttack on December 20, 2017. / AFP PHOTO / Dibyangshu SARKAR / ----IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE----- / GETTYOUT

भारताने काल बुधवारी श्रीलंकेवर ९३ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विजयासाठी १८१ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ८७ धावांत संपला. धावांचा विचार करता टी-२० मधील भारताचा हा सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वी भारताने इंग्लंडविरुद्ध २३ सप्टेंबर २०१२ रोजी इंग्लंडवर ९० धावांनी मात करत आपला सर्वांत मोठा विजय नोंदविला होता.
भारताने विजयासाठी दिलेल्या १८१ धावांचा पाठलाग करताना लंकेची सुरुवात खराब झाली. पुनरागमन करणार्‍या उनाडकटने डिकवेलाला १३ धावांवर बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर लंकेची धावसंख्या ३९ असताना थरंगा चहलच्या गोलंदाजीवर २३ धावा करून बाद झाला. थरंगा बाद झाल्यानंतर लंकेच्या फलंदाजांनी मैदानावर फक्त हजेरी लावण्याचे काम केले. त्यामुळे लंकेचा संपूर्ण संघ ८७ धावांवर बाद झाला. मैदानावर दव पडत असताही लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि ‘चायनामन’ कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली. चहलने ४ षटकांमध्ये २३ धावा देत ४ बळी घेतले, कुलदीप यादवने ४ षटकांमध्ये फक्त १८ धावा देत २ फलंदाजांना माघारी पाठवले. या दोघांव्यतिरिक्त पंड्याने ३, उनाडकटने १ बळी घेतला.

तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि राहुलने भारताला ३८ धावांची सलामी दिली. रोहित शर्मा १७ धावा करून मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर राहुल आणि श्रेयस अय्यरने आक्रमकता व बचाव याचा सुरेख मेळ साधताना धावगती मंदावणार नाही याची दक्षता घेतली.
या दरम्यान राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. श्रेयस अय्यर प्रदीपच्या गोलंदाजीवर २४ धावा करून बाद झाला. पंधराव्या षटकात राहुल परतला त्यावेळी केवळ ११२ धावा फलकावर लागल्या होत्या. त्यामुळे मोठी धावसंख्या रचण्यासाठी धोनी व मनीष पांडे यांच्यावर भारताची जबाबदारी होती. एकवेळ १६०चा आकडा कठीण वाटत असताना धोनी आणि पांडेने तडाखेबाज फटकेबाजी करत भारताला १८० धावांचा डोंगर उभारून दिला. धोनीने शेवटपर्यंत नाबाद राहात २२ चेंडूंत ३९, तर पांडेने १८ चेंडूंत नाबाद ३२ धावा केल्या.

धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. चमीरा गो. मॅथ्यूज १७, लोकेश राहुल त्रि. गो. परेरा ६१, श्रेयस अय्यर झे. डिकवेला गो. प्रदीप २४, महेंद्रसिंग धोनी नाबाद ३९, मनीष पांडे नाबाद ३२, अवांतर ७, एकूण २० षटकांत ३ बाद १८०
गोलंदाजी ः विश्‍वा फर्नांडो २-०-१६-०, अकिला धनंजया ४-०-३०-०, दुष्मंथ चमीरा ३-०-३८-०, अँजेलो मॅथ्यूज ३-०-१९-१, थिसारा परेरा ४-०-३७-१, नुवान प्रदीप ४-०-३८-१
श्रीलंका ः निरोशन डिकवेला झे. राहुल गो. उनाडकट १३, उपुल थरंगा झे. धोनी गो. चहल २३, कुशल परेरा झे. धोनी गो. कुलदीप १९, अँजेलो मॅथ्यूज झे. व गो. चहल १, असेला गुणरत्ने यष्टिचीत धोनी गो. चहल ४, दासुन शनका झे. पंड्या गो. कुलदीप १, थिसारा परेरा यष्टिचीत धोनी गो. चहल ३, अकिला धनंजया झे. व गो. पंड्या ७, दुष्मंथ चमीरा झे. राहुल गो. पंड्या १२, विश्‍वा फर्नांडो झे. उनाडकट गो. पंड्या २, नुवान प्रदीप नाबाद ०, अवांतर २, एकूण १६ षटकांत सर्वबाद ८७
गोलंदाजी ः हार्दिक पंड्या ४-०-२९-३, जयदेव उनाडकट २-०-७-१, युजवेंद्र चहल ४-०-२३-४, जसप्रीत बुमराह २-०-१०-०, कुलदीप यादव ४-०-१८-२