श्रीरामजन्म

0
15
  • मीना समुद्र

चैत्र शुद्ध नवमीला घर-मंदिरे असा सर्वत्र रामजन्मसोहळा मोठ्या जल्लोषात, उत्साहात, श्रद्धाभक्तीयुक्त अंतःकरणाने साजरा होईल. 30 मार्च रोजी अत्यंत आनंदात हा अतिशय पवित्र, शुभ दिवस गुढ्यातोरणे उभारून, सर्वत्र वृक्षवल्ली, फुला-पानांची सजावट करून, सडा-रांगोळ्या घालून रामजन्माचा पाळणा, रामकथा, रामनाम अशा स्वरूपात साजरा केला जाईल. रामनवमी निमित्त…

गीतरामायणाच्या प्रस्तावनेत कविवर्य बा. भ. बोरकर यांनी रवींद्रनाथ टागोर यांचे एक वाक्य उद्धृत केले आहे की, रामायण ही खरोखरीच भारताच्या मौलिक भावभावनांची भागीरथी आहे. तिच्याच पुण्यसलीलाने त्याच्या मनोभूमीची मशागत शतकानुशतके अखंड होत राहिली आहे.
राम आणि कृष्ण हे भारतीय भूमीतले महापुरुष भारतीय संस्कृतीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने ते दैवतपदाला पोचले आहेत. अशा या दोन अतिप्रिय दैवतांपैकी श्रीरामाचा जन्म आता अगदी जवळ येऊन ठेपला आहे. चैत्र शुद्ध नवमीला घर-मंदिरे असा सर्वत्र रामजन्मसोहळा मोठ्या जल्लोषात, उत्साहात, श्रद्धाभक्तीयुक्त अंतःकरणाने साजरा होईल. 30 मार्च रोजी अत्यंत आनंदात हा अतिशय पवित्र, शुभ दिवस गुढ्यातोरणे उभारून, सर्वत्र वृक्षवल्ली, फुला-पानांची सजावट करून, सडा-रांगोळ्या घालून रामजन्माचा पाळणा, रामकथा, रामनाम अशा स्वरूपात साजरा केला जाईल.

राज्य, रथ, हत्ती, घोडे, दास-दासी, भरभरून वाहणारी संपत्ती असूनही राजा दशरथाच्या घरी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तिन्ही राण्या आणि राजा स्वतः संततीविना उदास होता. ‘उगा का काळिज माझे उले पाहुनी वेलीवरची फुले’ अशी स्थिती कौशल्येप्रमाणेच सर्वांचीच झाली होती. त्यासाठी ‘पुत्रकामेष्टी’ यज्ञ अंग देशीचे ऋष्यशृंग यांच्या साहाय्याने केला आणि यज्ञवेदीतून साक्षात यज्ञपुरुष प्रकट झाला. त्याने राजा दशरथाच्या हाती पायसपात्र देऊन ‘राण्या करितिल पायसभक्षण, उदरी होईल वंशारोपण’ असा आश्वासक आशीर्वाद दिला. तो फळाला येऊन तिन्ही राण्या गर्भवती झाल्या आणि राम-लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न यांचा जन्म झाला.
चैत्रमासात सृष्टी वसंतागमाने प्रफुल्लित झालेली. नाना रंग, नाना परिमळांनी आसमंतात फेर धरलेला. आल्हादक वसंतवाऱ्याने मन शांतलेले. नाना फळांनी झाडे बहरलेली. पशुपक्षीही आनंदाने विहरत असलेले. अशा या सुरम्य- सुगंधी- शीतल वातावरणात माणसाचे मनही आनंदी, उत्सुकलेले. वर्षारंभाच्या गुढ्या घराघरांवर त्याची साक्ष देत असतानाच गुढीपाडव्यापासून नवव्या दिवशी भरदुपारी- सूर्य आकाशात माध्यान्ही तळपत असताना- श्रीरामजन्म होतो; आणि तो दरवर्षी नव्या उत्साहाने साजरा केला जातो. दुपारी बारा वाजता राममूर्ती फुलांनी सजवलेल्या पाळण्यात ठेवली जाते आणि पाळणा गायिला जातो-
जो जो जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना
निद्रा करी बाळा कुलभूषणा रामा लक्ष्मणा
बाळा जो जो रे…
कौशल्या राणी ज्ञानदोरीने पाळणा हलवते आहे. नामाचा जयजयकार करत स्वर्गातून पुष्पवृष्टी होत आहे. रत्नजडित पाळण्यात कुलदीपक- त्रिभुवननायक- विश्वव्यापक असे बालक पहुडले आहे आणि त्या तेजस्वी, दिव्य बालकावर जीव कुखंडी करून प्राण सोडावेत इतका हर्ष त्या माऊलीच्या काळजात दाटला आहे.

रघुवंशात वसिष्ठांचे स्थान अतिशय आदराचे. असे हे राजर्षी रामाचे जन्मजातक सांगतात- ‘हे बालक पुढे दुष्ट निशाचरांना मारून यज्ञयागाचे रक्षण करेल. नंतर सीतेच्या स्वयंवराला जाईल. शिवधनुर्भंगाचा कठीण पण जिंकून सुंदर जानकीशी विवाह करेल. रावण लज्जित होईल. पुढे सागरजलात शिळाही तरतील. त्यावरून वानरमेळ्यासहित लंकेला जाऊन रावणाचे समूळ उच्चाटण करून त्याला ठार मारेल. सच्छील बिभीषणाला राज्य देईल. देवही रावणाच्या त्रासापासून सुटका झाल्याने आनंदित होतील आणि त्रिभुवनही आनंदेल. असा हा राम भावाचा भुकेला आहे. तो भक्ताधीन आहे. विठ्ठलदासांनी हा पाळणा गायिला आहे असा उल्लेख या पाळण्याच्या शेवटी येतो (दास विठ्ठले गायिला).
रामजन्माचा हा पाळणा परंपरागत रीतीने घरोघरी बाळाच्या बारशाला आजही हमखास गायिला जातो. श्रीराम, रामचंद्र, राघव, रघुनाथ, सीताराम, रामप्रसाद, राजाराम, जयराम, गंगाराम अशा नामकरणाने रामाचे नाम मुखी येते म्हणून अशी नावे ठेवली जातात. ‘राम’ या शब्दातच केवढा आराम आहे. निद्रानाशाचा विकार असलेल्या बऱ्याच जणांना रामनामाने, रामरक्षास्तोत्राने शांत झोप लागते असा अनुभव आहे. राम नाम घेताच ती श्यामल शांतमूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते आणि अपूर्व शांतता मनाला लाभते, सुंदरता साक्षात होते. ‘रामनाम हे सोपे’, ‘मी राम तू राम’- म्हणजे दोघेही पवित्र. ‘पोटापुरते काम आणि अगत्य तो राम’, ‘राम गावा, राम द्यावा, राम जीवीचा विसावा’ असेही म्हटले जाते. ‘रामा तुझे कोमल नाम घेता, संतोष वाटे बहुसाळ चित्ता’ असे चित्ताकर्षक ते नाव आहे.

भारतीयांचे आवडते नाव ‘राम’ आहे. त्यामुळे तुकाराम, शांताराम, परशुराम, काशीराम, इच्छाराम अशा उपपदाप्रमाणेच ते रामतीर्थ, रामकृष्ण असेही सुरुवातीलाही येते. पूज्य सानेगुरुजी म्हणतात, ‘रामाला स्मरणे म्हणजे मंगलाला स्मरणे; समाजाच्या कल्याणाला स्मरणे.’ रामाने अहिल्या शापमुक्ती केली आणि शिळेसमान जडवत्‌‍ झालेली अहिल्या जिवंत, चैतन्यमय झाली. शबरीची उष्टी बोरेही त्याने भावभोळ्या भक्तीची भेट म्हणून प्रेमाने खाल्ली. कबीराचे शेले विणले. लोकानुरंजन केले. रामराज्य केले. शांतता- सुबत्ता- निश्चिंतता याची प्रस्थापना म्हणजे रामराज्य. असे रामराज्य या भूमीवर यावे अशी साऱ्यांचीच इच्छा. कर्तव्यकठोरतेने अनिष्ट आणि अरिष्ट निर्मूलन करणारा राम हा महादेव शिवशंकरालाही प्रिय आहे. म्हणून रामनाम हा अतिशय आवडता जागृतीचा मंत्र आहे. ‘श्रीराम जयराम जयजयराम’ म्हणावे, ‘रघुपतीराघव राजाराम पतीतपावन सीताराम’ असे गुणगान गावे, ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे’ असा मंत्र जपावा, ‘जयराम रामकृष्ण हरी’चा गजर करावा. ‘राम राम राम राम, सीताराम सीताराम’ म्हणत त्यातही शीतलता अनुभवावी. रामाचे भजन करावे आणि ‘सकळ मिथ्या होउनी जाते। हे रामभजने कळोनी येते’ ही समर्थ रामदासांची वाणी अनुभवावी. ‘बहु चांगले नाम या राघवाचे। अती साजिरे स्वल्प सोपे सुखाचे’ हा प्रत्यय घ्यावा. म्हणूनच ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा। सदा सर्वदा प्रीती रामी धरावी। करी रे मना भक्ती या राघवाची। पुढे अंतरी सोडी चिंता भवाची॥’ ‘मना सज्जना राघवीं वस्ती कीजे’, ‘नसे राम ते धाम सोडुनी द्यावे’, ‘सदा रामनामे वदे नित्य वाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा…’ अशी श्रीसमर्थ रामदासस्वामींनी मनाच्या श्लोकात सांगितलेली भक्तीची युक्ती अनुसरावी आणि जीवन कृतार्थ करावे. सर्वाभूती राम पाहावा, सर्वांनी राम आचरावा.