श्रीपाद नाईक गंभीर जखमी; पत्नीचा दुर्दैवी अंत

0
119

गोकर्णला देवदर्शनासाठी जाताना अंकोल्याजवळ भीषण अपघात

>> श्रीपाद यांना रात्री गोमेकॉत आणले
>> डॉ. दीपक घुमे यांचाही अपघातात मृत्यू
>> वाहनचालक सूरज नाईक जखमी

केंद्रीय संरक्षण व आयुष राज्यमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या जीए ०७ जी २२४५ या नव्या कोर्‍या टोयोटा इनोव्हा क्रेटा वाहनाला काल सोमवारी रात्री कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात अंकोल्याजवळ हिल्लुर – होसकंबी येथे झालेल्या भीषण अपघातात श्री. नाईक यांच्या पत्नी सौ. विजया नाईक तसेच त्यांच्यासोबत असलेेले आरोग्य भारतीचे प्रचारक डॉ. दीपक घुमे हे जागीच ठार झाले, तर स्वतः श्रीपाद नाईक जबर जखमी झाले. वाहनातील साईकिरण पाटील हा सुरक्षा कर्मचारी तसेच वाहनचालक सूरज नाईक हाही या दुर्घटनेत जखमी झाला असल्याची माहिती अंकोला पोलिसांनी दिली. वाहनात एकूण पाचजण होते. श्रीपाद हे खासगी दौर्‍यावर गेले होते.

श्रीपाद नाईक यांच्यावर अंकोल्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी ताबडतोब खास रुग्णवाहिकेने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात आणण्यात आले. रात्री ठीक सव्वा अकरा वाजता ही रुग्णवाहिका गोमेकॉत पोहोचली, तेव्हा तेथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचेे सर्व प्रमुख नेते तसेच श्रीपादभाऊंचे चाहते व कुटुंबीय त्यांच्यासाठी ईश्वराची प्रार्थना करीत मोठ्या संख्येने हजर होते.
अपघाताविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे कुटुंबीयांसह कर्नाटकातील धार्मिक स्थळांवर देवदर्शनासाठी खासगी दौर्‍यावर गेले होते. काल सकाळी त्यांनी यल्लापूरजवळच्या गणपती मंदिरात सपत्नीक पूजाही केली होती. संध्याकाळी ते गोकर्णच्या दिशेने चालले होते. हुबळी – कारवार राष्ट्रीय महामार्ग ५२ वरून त्यांचे वाहन गोकर्णला भरधाव जात असता, खराब रस्त्यामुळे चालक सूरज नाईक याचा वाहनावरील ताबा सुटल्याने क्षणार्धात वाहन दोन तीन कोलांट्या घेत रस्ता सोडून शेजारच्या झाडीत कोसळले.
अपघात झाला तेव्हा गाडी भरधाव असल्याने क्षणभरातच गाडी थेट रस्त्याकडेच्या झाडांमध्ये घुसल्याने या अपघातात गाडीचा पूर्ण चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यावरून अपघाताची भीषणता लक्षात येत होती.
अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. जखमींना सर्वप्रथम अंकोल्याच्या आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर इजा झालेल्या सौ. विजया श्रीपाद नाईक यांचे वाटेतच निधन झाल्याचे इस्पितळातील डॉक्टरांनी जाहीर केले. स्वतः श्रीपाद यांना झालेल्या जखमांची तीव्रता लक्षात घेऊन ती उपचार सुविधा अंकोल्यात नसल्याने त्यांना तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी संपर्क साधून तशी व्यवस्था केली. अंकोल्याचे पोलीस अधीक्षक शिवप्रकाश देवराजू यांनी जातीने अपघातातील जखमींना सर्वतोपरी मदत मिळेल याची तजवीज केली.
अपघाताचे वृत्त काल रात्री वार्‍यासारखे गोव्यात पसरताच सर्वत्र श्रीपाद नाईक यांच्यासारख्या मनमिळावू, सज्जन नेत्यावर नियतीने घातलेल्या या घाल्याबद्दल तीव्र हळहळ व्यक्त होत होती.
श्रीपाद नाईक यांना झालेल्या अपघाताचे वृत्त कळताच देशभरातून त्यांच्यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना करणार्‍या संदेशांचा ट्वीटर व अन्य समाजमाध्यमांवर अक्षरशः पाऊस पडला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांच्या अपघाती निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपघाताचे वृत्त कळताच त्यांनी स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व श्रीपाद यांच्यावर सर्व प्रकारचे उपचार तातडीने व्हावेत यासाठी जातीने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.

विमानाने दिल्लीत नेण्याची सज्जता
संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनीही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून गरज भासल्यास श्रीपाद नाईक यांना खास विमानाने दिल्लीत हलविण्यासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे सज्जता ठेवण्यात येईल असे सूचित केले.

श्रीपाद यांची प्रकृती स्थिर ः मुख्यमंत्री
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. गोमेकॉमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत, आवश्यकता भासल्यास रात्री त्यांच्यावर काही किरकोळ शस्त्रक्रिया केल्या जातील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मध्यरात्री दिली.
सध्या तरी त्यांना उपचारार्थ नवी दिल्ली येथे नेण्याची गरज नाही असे मत गोमेकॉतील डॉक्टरांनी व्यक्त केले असून आवश्यकता भासल्यास त्यांना दिल्लीत हलवण्यासाठी एअर अँब्युलन्स पाठविण्याची व्यवस्था करण्याची ग्वाही केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे. पंतप्रधानांनीही पुन्हा फोन करून त्यांची विचारपूस केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सर्वतोपरी वैद्यकीय मदत
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला झालेल्या अपघाताचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. केंद्रीय मंत्री नाईक यांना आवश्यक वैद्यकीय उपचार देण्याची सूचना देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नाईक यांच्या पत्नी विजया यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

अपघाताचे वृत्त धक्कादायक
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना झालेला अपघात, त्यांच्या पत्नी विजया यांचे अपघातात झालेले निधन या घटनांनी धक्का बसला आहे. विजया नाईक ह्या कुटुंबीय आणि त्यांच्या हितचिंतकांच्या आधास्तंभ होत्या. मंत्री नाईक लवकर बरे होवोत असे ते म्हणाले – विरोधी पक्षनेते दिगंबर कामत