Home बातम्या श्रीनिवास धेंपो यांना ‘विद्याधिराज’ पुरस्कार जाहीर

श्रीनिवास धेंपो यांना ‘विद्याधिराज’ पुरस्कार जाहीर

0

श्रीमद्‌‍ विद्याधिशतीर्थ स्वामींच्या हस्ते 20 मार्चला होणार वितरण; जीवोत्तम, पुरुषोत्तम पुरस्कारही जाहीर

पर्तगाळी येथील श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठातर्फे गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षी देण्यात येणारा ‘विद्याधिराज पुरस्कार’ यंदा धेंपो उद्योगसमूहाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मठ समितीचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास धेंपो यांना जाहीर झाला आहे. 20 मार्च रोजी पर्तगाळी मठात होणाऱ्या भव्य समारंभात मठाधिपती प. पू. श्रीमद्‌‍ विद्याधिशतीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते श्रीनिवास धेंपो यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, पर्तगाळच्या प्राचीन वटवृक्षाची प्रतिमा आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय जीवोत्तम पुरस्कार आणि पुरुषोत्तम पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत.
बंगळुरू येथील अमरनाथ कामत, मुंबई येथील श्रीनिवास सावळा भट आणि काणकोणचे अनिल पै यांना यंदाचा ‘जीवोत्तम’ पुरस्कार जाहीर झाला आहे. गोकर्ण येथील वेदमूर्ती श्रीधर भट यांना ‘पुरुषोत्तम’ पुरस्काराने श्रीमद्‌‍ विद्याधिशतीर्थ स्वामी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

पर्तगाळी मठाने नुकताच सार्ध पंचशताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना आशियातील सर्वात उंच अशी 77 फूट उंचीची प्रभू श्री रामांची प्रतिमा मठ प्राकारात उभारली आहे. या प्रतिमेचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याशिवाय थीम पार्क, वैदिक पाठशाळा, परिषदग्रह, इंदिराकांत सभागृह, मठाचा जीर्णोद्धार, वीरविठ्ठल मंदिराची उभारणी, निवासी खोल्या, अध्यापक वर्गासाठी निवासी संकुल, प्रशस्त वाहनतळ, अद्ययावत भोजन कक्षाची उभारणी केली आहे. या सर्व कार्यांची दखल पुरस्कार निवडीवेळी घेण्यात आली. याच कालावधीत अखंड राम नाम जप, अखंड भजनी सप्ताह, दिग्विजय रथ यात्रा हे उपक्रम मठानुयायांनी राबविले. त्याची दखल घेऊन तीन मठानुयायांना ‘जीवोत्तम’ पुरस्कार, तर एका समाजबांधवाला ‘पुरुषोत्तम’ पुरस्कार जाहीर झाला आहे.