शेतीतून स्थैर्याकडे!

0
200
  • डॉ. गौरिष करंजाळकर

(सहाय्यक प्राध्यापक, डॉन बॉस्को कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर, सुलकोणी)

अलीकडे प्रक्रिया उद्योगांना फार अग्रक्रम दिला जात असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना याची ओळख व्हावी असा शिक्षणसंस्थेचा मानस आहे. हा उपक्रम म्हणजे विद्यार्थिदशेकडून उद्योगजगताच्या पायथ्याकडे जाणारा साकव ठरू शकतो. अशा प्रक्रिया उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढीस लागावा म्हणून हा लेखनप्रपंच…

 

‘कृषिपदवी’ हा अभ्यासक्रम आठ सत्रांत विभागून, चार वर्षे असे भारतभर समीकरण आहे. बारावी सायन्स उत्तीर्ण होऊन विद्यार्थी कृषिक्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. यातील त्यांचे शेवटचे वर्ष म्हणजेच चौथे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या भविष्याच्या जडणघडणीला कारणीभूत ठरते. गोव्यातील डॉन बॉस्को कृषी महाविद्यालयातील चतुर्थवर्ष विद्यार्थ्यांचे आठवे सत्र नुकतेच संपते आहे. कृषिक्षेत्र म्हटले की प्रात्यक्षिके-अनुभव हाच शेतकी शिक्षणाचा कणा ठरतो. यातील शैक्षणिक वाटचालीचा उच्चांक बिंदू हे त्यांचे सातवे आणि आठवे सत्र. सातव्या सत्रात त्यांना विविध गावांत शेतकर्‍यांसमवेत राहून त्यातून शेतीपद्धती, शेतकर्‍यांचे अनुभव-मार्गदर्शन व आपल्याकडील तीन वर्षांचे कौशल्य अशी सांगड घालत विद्यार्जन करायचे असते. नंतर आठव्या सत्रात त्यांना प्रात्यक्षिकांवर आधारित विविध उपक्रम राबवायचे असतात. या सगळ्या प्रयत्नांतून त्यांना भविष्याच्या करिअर निवडीचा अंदाज बांधता येतो. आयसीएआर (इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च) म्हणजे कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविले जातात. ज्या-त्या राज्यातील निकड व उपलब्ध साधनांचा वापर करून अद्ययावत प्रणालीने- तज्ज्ञांच्या सहाय्याने- विद्यार्थी कृषिज्ञान आत्मसात करीत असतात. त्यातील अतिशय जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा एक उपक्रम म्हणजे फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग.

उपलब्ध असलेली व उत्पादित केलेली फळे व भाजीपाला ही प्रामुख्याने बाजारात विक्रीसाठी येतात. परंतु ती नाशिवंत असल्याने त्यांच्या व्यापारावर आपोआप बंधने येतात. शिवाय उत्पादित केलेला सगळा माल एकाचवेळी विकला जाऊ शकत नाही. केव्हा त्याला हमीभाव न मिळल्याने अतोनात नुकसान होते, तर कधी रहदारीतील अडथळे हानी पोचवीतात.

उत्पादित केलेला कच्चा माल टप्प्याटप्प्याने बाजारात येत असल्याने मूळ शेतकर्‍याला एकरकमी विक्रीचा फायदा होत नाही. अशा एक ना अनेक समस्यांचे निराकरण प्रक्रिया उद्योगाची दिशा दर्शविते. एका नाण्याच्या दोन बाजू असा हातखंडा वापरला तर उत्पादन ही एक बाजू आणि त्यावर प्रक्रिया ही दुसरी बाजू म्हणण्यास वाव मिळतो. म्हणजे मग फळ-भाजीपाला उत्पादनाचं आपलं नाणं कुठल्याही बाजारपेठेत- स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय असो- त्यात खणखणतच राहील.

अलीकडे प्रक्रिया उद्योगांना फार अग्रक्रम दिला जात असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना याची ओळख व्हावी असा शिक्षणसंस्थेचा मानस आहे. हा उपक्रम म्हणजे विद्यार्थिदशेकडून उद्योगजगताच्या पायथ्याकडे जाणारा साकव ठरू शकतो. अशा प्रक्रिया उद्योगांकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढीस लागावा असा आमचा शास्त्रशुद्ध हेतू आहे. प्रक्रिया उद्योगामुळे काढणीपश्‍चात होणारे नुकसान आपण बर्‍याच अंशी टाळू शकतो. कच्च्या मालापासून दर्जेदार विविधोपयोगी उत्पादने तयार करता येतात. नवनिर्मित उत्पादनांमुळे कच्च्या मालाचे ‘शेल्फ लाईफ’ वाढवता येते. वर्षभर त्यांची उपलब्धता सहज शक्य होते. उत्पादित मालाचे व्हॅल्यू ऍडिशन करून उद्योजकतेत आपण आपले स्थान निर्माण करू शकतो. अगदी लहानात लहान ते मोठ्या प्रक्रिया उद्योगांद्वारे तळागाळापासून उच्चपदस्थापर्यंत रोजगार निर्मितीची संधी निर्माण होऊ शकते. उत्पादन घेणारे शेतकरी, शेतीकामावर अवलंबून असणारे इतर कामकरी, मालाची ने-आण करणारी व्यवस्था, प्रक्रियेसंबंधी कामकाजात अंतर्र्भूत होणारे सर्व घटक, उत्पादित व्यंजनांची खरेदी-विक्री करणारे दलाल, अंतिम ग्राहक इ.च्या साखळीत येणार्‍या प्रत्येकालाच संधी मिळते.

आपण पाहतो, प्रक्रिया केलेल्या उत्पादनाला ग्राहकसुद्धा आकर्षक किमतीसह स्वीकारतात. एक साधं उदाहरण घेऊ. अतिशय उपयुक्त व दैनंदिन आहारात गरजेचे व्हिटॅमिन ‘सी’युक्त लिंबू. आपण रोजच जेवणात लिंबू वापरत नाही. कधीकधी ते उपलब्ध नाही झालं तरी त्याचे लोणचे आपण सहज वर्षभर वापरू शकतो. शिवाय त्याची पावडर, सिरप, ज्यूस अशा अनेकविध प्रकारे आपण त्याचा वापर करू शकतो. वेगवेगळ्या उद्योगात जसे रोगाणूरोधक, धुण्याचा सोडा, भांडी भासण्याचा साबण, अंगाचे साबण, सौंदर्यप्रसाधने आणि बर्‍याच निर्मितीत लिंबाचा वापर अनिवार्य असतो. गोव्यासारख्या ठिकाणी ‘कोकम’ हे तर स्वयंपाकातील फिश-करीचा अविभाज्य भाग. वर्षभर कोकमची फळे उपलब्ध होत असल्याने त्यांपासून सोलं, आगळ, सिरप, ज्यूस इ. टिकावू पदार्थ घरच्या घरीसुद्धा तयार करता येतात. कच्च्या कैरींपासून लोणचं, साट, तौर, कुंबोशी-आंबोशी, पन्हं, सिरप, आमचूर पावडर आणि बरंच काही आपल्या आवडीत मानाचं स्थान पटकावतात. प्रत्येकाच्या परसदारी ‘बिंबली’ मोठ्या तोर्‍यात डवरत असते. हातोहात काढून त्यांचं तिखट-आंबट-गोड चवीचं लोणचं दुपारच्या जेवणाची लज्जत वाढवतं. लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांना वडापाव-सामोसा यांसोबत टॉमेटो केचप- सॉस- हवाच असतो. बाजारात २०० ग्रा. वजनाचं टॉमेटो केचप २५-३० रुपये या दराने मिळते. तेच आपण ३० रु. किलो दराने १ किलो टॉमेटो सॉस- केचप- बनविले तर बाजाच्या निमपट किमतीमध्ये उत्कृष्ट दर्जाचे व हवे तेव्हा, हवे तेवढे तयार करू शकतो. पण हे सगळं कसं शक्य आहे? असा प्रश्‍न पडतो आणि त्यावर एकच लाखमोलाचं उत्तर म्हणजे ‘प्रक्रिया उद्योगाशी दोन हात करणे.’

स्थानिक स्तरावर प्रक्रिया उद्योगाचे छोटे-छोटे प्रकल्प उभारल्यास रोजगारनिर्मिती होऊन वाहतुकीच्या खर्चावर नियंत्रण आणता येते. परिणामी उत्पादकाला आपली पाळेमुळे उद्योग जगतात रोवण्यास मदत होऊ शकते. फळे-भाजीपाला यांचे उत्पादन घेऊन त्यांची खरेदी-विक्री प्रक्रिया करणे म्हणजे १०० टक्के प्रगती असे होत नाही, तर यांचे लेबलिंग, पॅकिंग, मार्केटिंग, ग्राहकांपर्यंतची विक्री इ. अंगेसुद्धा मोलाची आहेत.

फळे व भाजीपाला यांचे उत्पादन करण्यापासून ते ग्राहकांपर्यंत त्यांची उपयुक्तता पटवून देणे, उत्पादनाचे महत्त्व, नियोजन, मागणीनुसार निवडीला प्राधान्य, आर्थिक जडणघडण, शास्त्रशुद्ध प्रक्रिया, गुणवत्ता निकष, उत्पादनाचा टिकावूपणा, नफा-तोटा यांचे गणित, उत्पादनाची विक्री, लोकप्रियता अशा अनेक मूलभूत पैलूंची बाराखडी विद्यार्थ्यांकडून गिरवून घेण्याचा आमचा लहानगा प्रयत्न होता. यामध्ये श्री. शंभू गावकर माफक कुशलतेने विद्यार्थ्यांना सोबत करीत होते. या उपक्रमाद्वारे विविध उत्पादनांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी इतक्या उत्साहाने हाताळली की त्याबद्दल आपोआप चार ओळी मनापासून लिहाव्याशा वाटल्या. प्रकल्पाचा श्रीगणेशा कैरी लोणच्यापासून सुरू झाला आणि पुढे मिरची, बिंबली, लिंबू, मिक्स लोणचे, कुल्फी, कलिंगड ज्यूस, आवळा कॅन्डी, चिंचे-कॅन्डी, आलेपाक, सुंठवडी, ऑरेंज स्क्वॅश, काजू सिरप, कोकम सिरप, मिक्स फ्रूट जॅम इ. उत्पादने गुणवत्तेचे व टिकावूपणाचे निकष लक्षात घेऊन तयार करायला शिकले.

‘चढते-वाढते-वाढविते’ या उक्तीनुसार आमचे विद्यार्थी प्रक्रिया-प्रकल्पाची शिडी चढू लागले. प्रक्रिया राबविण्याआधी मार्केट सर्वे करून कोणत्या उत्पादनांची आवश्यकता आहे व आपल्याकडे काय उपलब्ध आहे याची शहानिशा केली. तद्नंतर प्रक्रिया उपक्रमाकडे सकारात्मक भावनेने, शिकण्याच्या जिज्ञासेने व आनंदाने सहभाग घेतला. येवढ्यावर न थांबता त्याचे लेबलिंग, पॅकिंग करून ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले. स्वतः त्याचे मार्केटिंग करून नफ्या-तोट्याचे विश्‍लेषण केले. त्यातील काही विद्यार्थ्यांचे अनुभव येथे थोडक्यात मांडत आहे.

 

करिश्मा पर्सेकर, साखळी ः या उपक्रमामुळे आम्हाला आंबा, मिरची, लिंबू, बिलंबी यांचे लोणचे बनविण्याची शास्त्रोक्त पद्धत शिकायला मिळाल्यामुळे घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने काय बदल करायला हवेत हे समजते. त्यांच्या टिकावूपणाचा समतोल चवीनं न बदलता कसा राखला जातो याचे विशेष कुतूहल वाटले.

 

संदेश गावकर (काणकोण) ः आतापर्यंतच्या शैक्षणिक प्रवासातील हा अनुभव संस्मरणीय राहील. पदार्थ केव्हाच न बनविलेला मी कधी लोणची, ज्यूस, सिरप, स्क्वॅश, कुल्फी बनवायला लागलो हे कळलंच नाही. प्रत्यक्षात काम करताना किती अडचणी येतात व त्यांना कुशलतेने कसे हाताळावे याची शिदोरी या प्रकल्पामुळे आमच्या पदरात पडली.

 

प्रीती वेळीप (पाडी) ः रेग्युलर थिअरी क्लासेसपेक्षा या उपक्रमांतर्गत आम्हाला जास्त माहिती मिळाली. सगळी प्रात्यक्षिके आम्ही स्वतः हाताळल्याने आमची आवड व आत्मविश्‍वास वृद्धिंगत झाला. करियरच्या दृष्टीने आम्हाला याची उद्योगजगतात पाऊल ठेवण्यास नक्कीच मदत होईल.

 

ब्रनिशा नायर (काणकोण) ः एखाद्या प्रकल्पाकडे जेव्हा उद्योग या नजरेतून पाहिले जाते तेव्हा त्यातील अडीअडचणी, नफा-तोटा यांचा ताळमेळ कसा असावा याचा अनुभव येऊन गेला.

 

कार्तिक वैद्य (काणकोण) ः विविध प्रकारची लोणची, कुल्फी, सॉस, जॅम, ज्यूस इ. स्वतः बनवायला शिकल्यामुळे आमची प्रक्रिया उद्योगाबरोबर ओळख झाली. उत्पादने व त्यावरील नफा कमविणे यांचे प्रात्यक्षिक मला स्वतःचा उद्योग उभारण्यात उपयोगी पडेल अशी खात्री आहे.

 

 

सुनिल गावकर (वाळपई) ः प्रक्रिया शिकण्याबरोबरच त्याचे लेबलिंग, मार्केटिंग किती आवश्यक आहे हे अनुभवायला मिळाले.

 

अक्षय सावंत (सत्तरी) ः उत्पादन प्रक्रियेत आर्थिक बाबींचा जवळून अभ्यास केल्यामुळे भविष्यात स्वतःचा उद्योग सुरू करावा, असा माझा हेतू आहे.

 

प्रतिभा मिसाळ (काले) ः उत्पादनाबरोबर त्याची विक्री, मार्केटिंग, त्याची प्रसिद्धी याबाबत खूप मार्गदर्शक अनुभव शिकायला मिळाले. शिवाय हा उपक्रम आम्ही टीमवर्कने केल्यामुळे संघटित होण्याचे जवळून अनुभवले.