-ः इतिहासाच्या पाऊलखुणा ः- किम जोंग उन यांचे अनुपस्थिती नाट्य

0
291
  • दत्ता भि. नाईक

‘किम जोंग उन बोेले आणि उत्तर कोरिया डोले’ अशी परिस्थिती असताना प्रसिद्धीच्या झोतात असलेले व्यक्तिमत्त्व अचानकपणे दृष्टीआड होणे ही साधी गोष्ट नव्हे, म्हणूनच ते कुठे असावे यासंबंधाने चर्चा सुरू झाली.

दि. २२ एप्रिलच्या राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व वर्तमानपत्रांच्या आंतरराष्ट्रीय बातम्या देणार्‍या पानावर एक महत्त्वपूर्ण व लक्ष वेधून घेणारी बातमी छापून आली, ती म्हणजे, उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन हे आजारी असल्याची व त्यामुळेच ते जनतेसमोर येत नसल्याचेही या बातमीत म्हटले होते. सध्या संपूर्ण जग कोरोनाग्रस्त बनल्यामुळे या अतिमहनीय व्यक्तीच्या संबंधी बातमीला प्रथम पृष्ठावर स्थान मिळू शकले नाही तरीही आंतरराष्ट्रीय घडामोडींवर या बातमीचा परिणाम होणार असल्यामुळे तर्कवितर्क करणार्‍यांना चांगलीच संधी चालून आली. ‘किम जोंग उन बोेले आणि उत्तर कोरिया डोले’ अशी परिस्थिती असताना प्रसिद्धीच्या झोतात असलेले व्यक्तिमत्त्व अचानकपणे दृष्टीआड होणे ही साधी गोष्ट नव्हे, म्हणूनच ते कुठे असावे यासंबंधाने चर्चा सुरू झाली. वय वर्षे ३६ असल्यामुळे हळहळ पण व्यक्त होऊ लागली.

डेमोक्रेटिक पिपल्स रिपब्लिक

द्वितीय महायुद्धाची वाटेकरी असलेली अमेरिका व पाश्‍चात्त्य राष्ट्रे एका बाजूला, तर सोव्हिएत रशिया दुसर्‍या बाजूला अशी युद्धाची लूट वाटून घेण्याची स्पर्धा सुरू झाली. पूर्व युरोपमधील जवळजवळ सर्व राष्ट्रे व पूर्व जर्मनी सोव्हिएत रशियाने व्यापली. पश्‍चिमेकडे जर्मन व पूर्वेकडे जपान असे दोन पराभूत शत्रू होते. जर्मनीमध्ये जसा प्रवेश केला तसा जपानमध्ये केल्यास हे प्रकरण अंगलट येणार हे दोन्ही गटांना माहीत होते. परंतु जपानने व्यापलेल्या कोरियावर ताबा मिळवण्यासाठी सोव्हिएत रशियाने आपली सेना पाठवली हे लक्षात येताच अमेरिकेनेही आपली सेना कोरियाच्या दक्षिण दिशेकडून घुसवण्यात यश मिळवले. द्वितीय महायुद्ध संपता संपताच तृतीय महायुद्ध सुरू होणार की काय? अशी युद्धाला कंटाळलेल्या शांतताप्रिय जनतेच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. अखंड कोरियाचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट १९४५ हा आहे. परंतु कोरियन युद्धामुळे युद्धग्रस्त देशाची १९४८ मध्ये फाळणी करण्यात आली व उत्तर व दक्षिण कोरिया नावाचे दोन देश अस्तित्वात आले. अमेरिकेच्या प्रभावाखाली दक्षिण कोरिया हा देश अस्तित्वात आला. सेऊल येथे राजधानी असलेल्या या देशात लोकशाही आहे. अमेरिकेचा वरदहस्त असूनही मध्यंतरी हा देश दिवाळखोर बनला होता. याचे नाव आहे कोरियन रिपब्लिक. प्यॉनगँग येथे राजधानी असलेल्या उत्तर कोरियामध्ये कोरियाच्या कम्युनिस्ट पक्षाचे राज्य आहे व देशाचे नाव आहे डेमोक्रेटिक पिपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे, कम्युनिस्ट पक्षाची एकपक्षीय हुकूमशाही असल्यामुळे जणू राजेशाहीच आहे. यामुळे डेमोक्रेटिक, पिपल्स आणि रिपल्बिक या तिन्ही संकल्पना देशाने पायदळी तुडवलेल्या आहेत.

१९४९ साली चीनमध्ये माओच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आली. त्यामुळे उत्तर कोरियाच्या राज्यकर्त्यांना अधिक बळगे मिळाले व १९५० मध्ये उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केले. पुन्हा एकदा सोव्हिएत रशिया व अमेरिका यांची सेनादले एकमेकांसमोर उभी ठाकली, परंतु सुदैवाने या युद्धाला व्हिएतनामसारखे स्वरूप प्राप्त झाले नाही.

चर्चचे तंतोतंत अनुकरण

दास कॅपिटल व कम्युनिस्ट मॅनिफेस्टो यांच्या ग्रंथप्रामाण्यवादाचा कम्युनिस्ट राजवटीवर इतका प्रभाव असतो की परिस्थितीनुसार बदल करवून घेण्यास ते तयार नसतात. त्यामुळे सामूहिक शेती, कम्यून, ब्रेनवॉशिंग यांसारखे प्रयोग सतत चालू असतात. सीमेवर तैनात केलेले सैनिक व कायदा व सुव्यवस्था ठीक राखण्यासाठी तयार केलेली पोलीस दले यांमध्ये अतिशय सूक्ष्म असा फरक दिसतो. त्यामुळे शत्रूच्या अंगावर चालून जाण्यासाठी बनवलेले रणगाडे नागरी वस्तीतील विरोधकांवर चालवले जातात. हे सर्व उत्तर कोरियामध्ये शिस्तबद्धपणे चालत आलेले आहे. देशात कम्युनिस्ट पक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा किम इल सुंग हे राष्ट्राध्यक्ष व पक्षाचे सर्वेसर्वा बनले होते. १९९४ मध्ये ते स्वर्गवासी झाले तेव्हा त्यांचे सुपुत्र किम जोंग इल यांनी सत्तासूत्रे हाती घेतली. २०११ साली त्यांची दहलोकीची यात्रा संपली तेव्हा त्यांचे सुपुत्र म्हणजे सध्याचे सर्वेसर्वा असलेले किम जोंग उन हे सत्ताधारी बनले. त्यांनीही पुढील तयारी म्हणून स्वतःच्या बहिणीला काही अधिकार दिल्याचे अलीकडचे वृत्त आहे.

कम्युनिस्ट पक्षाने धर्माला विरोध केला असला तरी पश्‍चिम आशियामधून निघालेल्या धर्माकडून बर्‍याच परंपरा सहजपणे घेतल्या. ग्रंथप्रामाण्याच्या ठिकाणी मार्स्क व एंजल्सचे साहित्य, पुनःप्रेषिताच्या ठिकाणी हीच दोन व्यक्तिमत्त्वे व एकमेव चर्चच्या ठिकाणी एकमेव पक्ष. इन्क्विझिशनची जागा ब्रेनवॉशिंगने घेतली. चर्चच्या नियमानुसार धार्मिक मिरवणूक (प्रोसेशन) निघाली की आजारी, गरोदर महिला व अतिशय लहान मुले सोडून सर्वजणांनी त्यात भाग घ्यावयाचा असतो. नागरिकत्व आणि चर्चचे सदस्यत्व या दोन गोष्टी समान असतात. जिथे जिथे कम्युनिस्ट पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली त्या-त्या देशात हेच नियम लावले गेले. चर्चचे स्थान जसे पक्षाने घेतले तसेच तथाकथित क्रांतीशी संबंधित दिवस साजरे करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीसाठी हेच नियम लावले व प्रोसेशनची जागा संचलनाने (मार्चिंग) घेतली. चर्च सैतानाची भीती घालत असते त्याच धर्तीवर कम्युनिस्ट लोकांच्या मनात अमेरिकेची भीती घालत असते.

सवाई हेकेखोर

कम्युनिस्ट पक्षाची राजवट किती चांगली आहे हे ठसवण्यासाठी प्रचंड प्रमाणात प्रचारसाहित्य जगभर वितरित करण्याची पद्धतही या मंडळीनी सुरू केली. पूर्वी सोव्हिएत रशियामधून ‘सोव्हिएत लँड’ नावाचे इंग्रजी व सोव्हित देश नावाचे मराठी साप्ताहिक निघत असे. याचा अर्थ देशातील प्रमुख भाषांमधूनही ही नियतकालिके निघत होती. उत्तर कोरियातील सत्ताधारीही हाच प्रकार चालवत होते. काही पत्रकारांना जवळ करून, त्यांना पार्ट्या देऊन आपलेसे करून घेण्याचे प्रकारही चालत असत. किम जोंग उन यांचे आजोबा किम उलसुंग हे प्रथमच सत्तेवर आले तेव्हा त्यांचा उत्साहही असा होता. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी सांगितलेला एक अनुभव पुढील प्रकारे आहे. ते या काळात पत्रकारितेत अतिशय नवीन होते. ते मराठी ब्लीट्‌समध्ये काम करत होते. त्यांच्या काही हुशार सहकार्‍यांनी दक्षिण मुंबईत एका ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. त्यामुळे उपस्थितांची तुफान गर्दी होती. या जमलेल्या गर्दीसमोर सुरुवातीलाच उत्तर कोरियाच्या मुंबईच्या दूतावासाच्या प्रमुखांचा व्यासपीठावर सत्कार केला. त्याला वाटले की ही संपूर्ण गर्दी उत्तर कोरियाच्या राज्यकर्त्यांच्या प्रेमाखातर जमलेली आहे. तेव्हापासून त्या कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या पत्रकारांना दूतावासातील कार्यक्रमांचे आमंत्रण मिळू लागले व त्यांना अतिमहनीय व्यक्तींचा दर्जा मिळाला व त्याबरोबर मराठी ब्लीट्‌सच्या कार्यालयात एक टेम्पो भरून प्रचारसाहित्य पाठवण्यात आले.

जनता भरडली गेली तरी चालेल, जगासमोर स्वतःचे आव्हान उभे करायचे हाही कम्युनिस्टांचा नियम किम जोंग उन याने पाळलेला आहे व प्रचंड अण्वस्त्रसाठा बाळगून आम्ही नुसता एक बटन दाबून जपान व अमेरिकेवर अण्वस्त्रांचा मारा करू शकतो अशी फुशारकीही तो वेळोवेळी मारत असतो. देशाला अण्वस्त्रधारी देशाच्या संघटनेत प्रवेश मिळावा म्हणून त्याचा खटाटोप असतो. केनेथ बे नावाच्या एका अमेरिकन पत्रकारावर देशातील सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून त्याला पंधरा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा देण्याचाही प्रकार २०१३ साली घडलेला आहे. हेकेखोर असलेल्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनाही उत्तर कोरियाचा प्रवास करून त्याच्याशी शिखरवार्ता करावयास भाग पाडणारा तो सवाई हेकेखोर असल्याचे त्याने जगाला दाखवून दिले आहे.

अफवांना ऊत

देश कोणताही असो, लेनिनपासून सुरू झालेली एक अखंड परंपरा अशी आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वेसर्वा किंवा सत्ताधारी यांचा चेहरा वर्तमानपत्रामधून रोज छापून आला पाहिजे. अलीकडे दूरदर्शन आल्यामुळे तर हे नेते कुठेतरी भेट देताना वा कार्यक्रमात सहभागी होताना दिसलेच पाहिजेत हे ओघानेच आले. किम जोंग उन हे आपल्या हसतमुख चेहर्‍याने देशातील विकासकामांवर देखरेख ठेवतात किंवा कुठेतरी लष्कराच्या एखाद्या तुकडीकडून मानवंदना स्वीकारतात असे दृश्य उत्तर कोरियाच्या दूरचित्रवाणीवर बघण्याची देशातील जनतेला तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींसंबंधाने सतत माहिती मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या निरीक्षक, अभ्यासक व पत्रकार यांना सवय झालेली असताना त्यांनी निरनिराळे तर्क लढवणे साहजिक होते.

ज्या पद्धतीने किम प्रसिद्धीच्या झोतापासून दूर गेले त्याकडे पाहता सगळीकडे गूढतेचे व संशयाचे धुके पसरले. अमित जैन या सिंगापूर येथे मुक्कामास असलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या पत्रकारानुसार २०११ साली ते स्वतः उ. कोरियामध्ये वार्तांकनासाठी गेले असता किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल हेही असेच अचानक दृष्टीआड झाले होते व दोन दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली गेली होती. किम यांना कोरोनाची बाधा झाली असावी, ते अत्यवस्थ असतील यापासून ते स्वर्गवासी झाले असतील इथपर्यंत अफवा पसरू लागल्या होत्या. १५ एप्रिल रोजी त्यांच्या आजोबांच्या जयंतीच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहिल्यामुळे निरनिराळ्या अफवांना ऊत येऊ लागला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी २१ एप्रिल रोजी फॉक्स न्यूज या अमेरिकन वृत्तपत्राला माहिती देताना म्हटले की, उत्तर कोरियातील घटनाक्रमावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. परंतु त्यांनी किम यांच्या आजारासंबंधाने कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला. चीन हा उत्तर कोरियाचा एकमेव मित्रदेश. चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी परिस्थिती गंभीर नसल्याचे व त्यांच्या सरकारचे घटनाक्रमावर लक्ष असल्याचे वृत्तसंस्थांना सांगितले. अखेरीस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किम जोंग उन यांचे एका खत उत्पादन कारखान्याचे उद्घाटन करताना दर्शन झाले आणि त्यांच्या मृत्यूसंबंधाने पसरलेल्या वार्तांना चाप बसला. यावरून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे, किम आजारी होते म्हणूनच त्यांना प्रसिद्धीच्या झोतापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यांचा थकलेला व तोंडाला मास्क लावलेला चेहरा जनतेला व जगाला दाखवणे परवडणारे नव्हते एवढाच निष्कर्ष निघू शकतो. किम यांचे अनुपस्थिती नाट्य बरेच गाजले असेच म्हणावे लागेल.