>> सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक झाल्याचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पंजाबमधील फिरोजपूर येथे विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी दाखल झाले. मात्र त्यांचा ताफा रस्त्यावरील उड्डाण पुलावर काही शेतकर्यांनी अडवल्यामुळे मोदी अचानक दौरा अर्धवट सोडून माघारी परतले. पाऊस आणि खराब हवामान यामुळे पंतप्रधानांनी फिरोजपूर दौरा रद्द केला असे सांगितले जात होते. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबत नेमकी माहिती देण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधान मोदी काल आपल्या नियोजित फिरोजपूर दौर्यासाठी रवाना झाले. बठिंडा येथे दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जाऊन अभिवादन करणार होते. तिथे हेलिकॉप्टरने जाण्याचे नियोजन होते. मात्र परिसरात पाऊस असल्याने साधारण वीस मिनिटे तिथे प्रतीक्षा केल्यानंतर ते दोन तासांच्या रस्तामार्गे हुसैनीवाला येथे निघाले. या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत लगेचच पंजाबच्या पोलीस महासंचालकांना अवगत करण्यात आले. पंतप्रधान हुसैनीवाला येथे जाण्यास निघाल्यानंतर शहीद स्मारकाच्या सुमारे ३० किलोमीटर अलीकडे काही निदर्शकांनी रस्ता रोखल्याचे आढळून आले. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही गंभीर चूक लक्षात घेत तातडीने तिथून बठिंडा येथे परतण्याचा निर्णय घेण्यात आला असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
पंतप्रधानांचा दौर्याचा संपूर्ण कार्यक्रम आणि प्रवासाचे नियोजन याबाबत आधीच पंजाब सरकारला माहिती देण्यात आली होती. त्यानुसार सुरक्षा व अन्य व्यवस्था होणे अपेक्षित होते. पंतप्रधान रस्तामार्गे जाणार हे निश्चित झाल्यावरही या मार्गावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था दिसून आली नाही. त्यामुळेच याबाबत पंजाब सरकारकडून अहवाल मागवण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळला
शेतकर्यांनी रस्ता रोखल्याचे माहीत असून पंजाब पोलिसांनी त्याबाबत एसपीजीला कल्पना दिली नाही. मात्र पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी आरोप फेटाळताना पंतप्रधानांनी आम्हाला कोणतीही कल्पना न देता अपल्या मार्गात बदल केला. त्यामुळे ही सुरक्षेतील चूक म्हणता येणार नाही, असे सांगितले.
पोलीस अधिकारी निलंबित
दरम्यान, या घटनेची पंजाब सरकारने गंभीर दखल घेतली असून फिरोजपूरच्या एसएसपीला निलंबित करण्यात आलं आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी, याघटनेबद्दल संताप व्यक्त करताना मी जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.