शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार

0
118

>> राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत उद्धव ठाकरेंची घोषणा

>> नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काल शिवसेनेने केली. मुंबईत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत स्वबळावर लढण्याचा ठराव टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आला. यावेळी उद्धव यांचे तरुण पुत्र व युवा सेनेचे नेते आदित्य यांनाही राजकीय बढती देत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नेतेपदी स्थान देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

२०१९ मध्ये लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होणार असून भाजपबरोबर युती करून महाराष्ट्रात व केंद्रात सत्तेची फळे चाखणार्‍या शिवसेनेचा वरील निर्णय भाजपसाठी धक्कादायक मानला जात आहे. वरळी येथील एनएसआयसीच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल झाली. या बैठकीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव मांडला. सदर ठरावाला कार्यकारिणीने तात्काळ मंजुरी दिली. शिवसेेनेचे सध्या १९ खासदार असून ६३ आमदार आहेत. २०१९च्या निवडणुकांमध्ये २५ खासदार आणि दीडशेपेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

उद्धव यांची मोदींवर टीका
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलताना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. छाती किती इंचाची आहे हा प्रश्‍न नसून त्यात किती शौर्य आहे हे महत्त्वाचे आहे असा टोला मारत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

आदित्य ठाकरे नवे नेते
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षांतर्गत काल मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी काल नियुक्ती करण्यात आली.