शिक्षण, परीक्षा आणि बदलते प्रवाह

0
42
  • – प्रा. नागेश सु. सरदेसाई

३० एप्रिल हा या शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस असून येत्या ६०-७० दिवसांचा प्रत्यक्ष वर्गातला अनुभव गेल्या दोन वर्षांच्या ऑनलाईन शिक्षणामुळे आलेली मरगळ दूर करण्यासाठी अनुकूल ठरेल, असे मत पालक-शिक्षक तसेच समाजाच्या विविध घटकांनी व्यक्त केले आहे.

दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये मुलं परीक्षेची तयारी करतात. पण कोविड-१९ मुळे हे शालेय वर्षही फार कटकटीचे गेले. या वर्षीही मुलांना फार कमी दिवस प्रत्यक्षात शाळेत येण्याची संधी लाभली. कोविड महामारीमुळे गेली दोन शालेय वर्षे शिक्षणाचे खूपच मोठे नुकसान झाले. वास्तविक मुलांच्या आयुष्यात इयत्ता १० वी व १२ वी हे दोन महत्त्वाचे टप्पे असतात. आपला पुढचा प्रवास ठरवण्याच्या दृष्टीने चांगल्या वातावरणात परीक्षा देणे आवश्यक असते. मात्र सगळाच विचका होऊन गेला.

कोविड महामारीच्या काळात शिक्षण ऑनलाईन पद्धतीने चालू होते. या शिक्षणासंदर्भात इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही मोठी समस्या होती. यामुळे शहरी तसेच गावांमध्ये राहणार्‍या मुलांना फार त्रास सोसावा लागला. काही शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापनांनी योग्य साधने पुरविण्याबरोबरच ‘व्हायफाय’ सेवाही मुलांना उपलब्ध करून दिली होती; मात्र ज्या कुटुंबामधील मुलांना परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणे भाग पडले, त्या मुलांना गेले दोन शालेय अभ्यासक्रम सहपाठ्यांबरोबर संवाद साधायची संधी हुकली. जे नुकसान या पिढीचे झाले ते गेल्या शंभरहून अधिक काळाच्या इतिहासात घडले नव्हते.
आजच्या २१ व्या शतकात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा ही अटळ आहे. मुलांचे संगोपन तथा योग्य जडणघडण होण्यासाठी योग्य आणि पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण करून देणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर नीतिमूल्यांचे शिक्षण देऊन त्यांना आदर्श विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांचे, पालकांचे तथा समाजाचे कर्तव्य आहे. गणित, सामान्य विज्ञान तसेच परिसर अभ्यास हे विषय पुढे जाऊन मुलांना देशाचे आदर्श नागरिक घडविण्याच्या दृष्टीने मोलाचा वाटा वाटा उचलतात. त्या अनुषंगाने आजच्या कोविड महामारीच्या सावटात मुलांची मोठीच हानी झाली आहे.

शिक्षणाच्या प्रवासात ‘परीक्षा’ सातत्याने घेतल्या गेल्याने मुलांचा बौद्धिक विकास होतो, त्याचबरोबर पुढची वाटचाल ठरवली जाते. कोविड महामारीच्या काळात गेली दोन वर्षे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यावर भर होता. त्यात तिमाही, सहामाही आणि वार्षिक परीक्षांचा समावेश होता. परंतु गोवा तसेच विविध देशांतल्या शाळा मंडळांनी परीक्षा कोविडचे निर्बंध पाळून प्रत्यक्ष म्हणजे ऑफलाईन पद्धतीने घेतल्या. गोवा शालान्त मंडळाने तर २०२० साली १० वीची संपूर्ण परीक्षा कोविडच्या पहिल्या लाटेत चांगल्या पद्धतीने घेऊन सर्वांना दिलासाच दिला. कोविडच्या लाटेमुळे महाराष्ट्र तसेच कर्नाटक या शेजारील राज्यांत अडकून पडलेल्या मुलांसाठी खास सोय उपलब्ध करून गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने एक इतिहास घडवला. त्या राज्यांत परीक्षा केंद्रे निर्माण करून परीक्षा सुरळीत पद्धतीने घडवून आणण्यात मंडळाला यश आले. या गोष्टीसाठी सर्व शाळा व्यवस्थापने, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शालान्त मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत, तसेच आताचे अध्यक्ष आणि त्यावेळचे सचिव भगीरथ शेट्ये हे अभिनंदनास पात्र आहेत. या प्रयत्नात त्यांना शंभर टक्के यश प्राप्त झाले. याचे श्रेय गोव्याचे शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच शिक्षण खात्याचे संचालक आणि शिक्षण सचिव यांनाही जाते.

२०२१ चे शैक्षणिक वर्ष कोविडच्या दुसर्‍या लाटेला समर्पित झाले असे म्हटले तरी वावगे होणार नाही. या वर्षी दहावी, बारावी तसेच विद्यापीठ स्तरावरील परीक्षा घेणे अशक्य ठरल्याने मुलांच्या वार्षिक परीक्षेचे मूल्यमापन सत्र परीक्षा तसेच प्रोजेक्ट यांच्या गुणांवर ठरवण्याची पाळी आली. परंतु शालान्त मंडळाने ११ वी विज्ञान शाखा तसेच तंत्रनिकेतनच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी ‘सामान्य प्रवेश परीक्षा’ विज्ञान आणि गणित विषयांत घेऊन एक नावीन्यपूर्ण उपक्रम घडवून आणला. ३१ जुलै २०२१ रोजी जवळ जवळ ६००० मुलांनी ही परीक्षा दिली आणि त्या गुणांवर त्यांना त्या-त्या शाखांमध्ये प्रवेश देण्यात आला.
२०२१-२२ शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला कोविडच्या दुसर्‍या लाटेने छोट्याशा गोवा राज्यातसुद्धा धुमाकूळ घातला. तीन हजारांहून जास्त लोक कोविडच्या महामारीत मृत्युमुखी पडले. या पार्श्‍वभूमीवर शिक्षण प्रत्यक्षात सुरू करणे ही गोष्ट अशक्य होती. २०२१-२२ सत्राची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होऊन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. वेगवेगळ्या माध्यमांतून विचारविनिमय होऊन केंद्रीय स्तरावरील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच वेगवेगळ्या राज्यांची शिक्षण मंडळे एका निर्णयावर पोचली. शिक्षण हे आपल्या देशात समवर्ती असल्याने प्रत्येक राज्य आपल्या सोयी तसेच परिस्थिती अनुसरून परीक्षा कशा प्रकारे घ्याव्यात हे ठरवू लागले. दहावी आणि बारावीच्या मुलांच्या या शैक्षणिक वर्षात दोन वेळा परीक्षा घेण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय तसेच राज्य स्तरावर घेण्याचा निर्णय झाला. याला अनुसरून डिसेंबर तसेच एप्रिल २०२२ अशा तारखा निश्‍चित करण्यात आल्या. या गोष्टीवर सर्वसंमती होऊन शालेय शिक्षणाच्या परीक्षा प्रकारात एक मोठा बदल घडवण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम पन्नास टक्के प्रथम, तसेच निम्मा द्वितीय सत्रासाठी ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२० कोविड महामारीच्या काळात प्रसिद्ध झाले. त्यानुसार कौशल्य विकास तसेच मातृभाषांवर विशेष भर देण्यात आला आहे. शिक्षण मुलांकरिता आनंदमय होण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर विशेष प्रयत्न तसेच बदल घडवून आणणे ही काळाची गरज होती. याच अनुषंगाने परीक्षाप्रणालीमध्ये केलेला बदल या काळाला अनुसरून आणि पोषक असेल यात शंका नाही. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची दुसरी परीक्षा गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येईल. ५ एप्रिलपासून दुसरे सत्र सुरू होईल. १ मार्च ते २५ मार्च प्रात्यक्षिक परीक्षा ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षा प्रत्यक्षरीत्या सर्व कोविड निर्बंध पाळून घेण्यास मंडळ सज्ज आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या हल्लीच्या एका आदेशानुसार देशातल्या ऑनलाईन परीक्षांवर बंदी आणण्याचा निर्णय देण्यात आला. हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे असे शिक्षण क्षेत्रातल्या सर्व तज्ज्ञांचे मत आहे.

कोविड- १९ या महामारीच्या तिसर्‍या लाटेचे जर अवलोकन केले तर आपल्याला कळून येईल की, आता या महामारीचा प्रभाव कमी होत आहे. गोवा सरकारच्या शिक्षण खात्याच्या निर्णयानुसार १ ली ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा कोविड-१९ ची मार्गदर्शक तत्त्वे पाळून २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या आहेत. ३० एप्रिल हा या शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस असून येत्या ६०-७० दिवसांचा प्रत्यक्ष वर्गातला अनुभव गेल्या दोन वर्षांच्या ऑनलाईन शिक्षणामुळे आलेली मरगळ दूर करण्यासाठी अनुकूल ठरेल, असे मत पालक-शिक्षक तसेच समाजाच्या विविध घटकांनी व्यक्त केले आहे. मुलंसुद्धा एका नव्या मोकळ्या वातावरणात श्‍वास घेतील अशी अपेक्षा आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅनिटायझर तसेच मास्कचा उपयोग करणे फारच आवश्यक आहे. कारण कोविड- १९ ची लाट जरी कमी होत असली तरी सर्वांनी काळजी घेऊन दैनंदिन जीवन सारणे ही काळाची मोठी गरज आहे.