शिक्षकांचे ५ सप्टेंबरपूर्वी लसीकरण करण्यास प्राधान्य द्या

0
37

>> केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचे राज्यांना आवाहन

येत्या ५ सप्टेंबरपूर्वी सर्व शालेय शिक्षकांचे लसीकरण व्हावे या दृष्टीने प्रयत्न करा असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख माडंवीय यांनी केले आहे. या महिन्यात राज्यांना दोन कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे डोस उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे निर्देश मंत्री मांडवीय यांनी काल बुधवारी दिले.

या महिन्यात प्रत्येक राज्याला ठराविक लसीचा ठराविक पुरवठा करण्यात येईल. याशिवाय २ कोटींपेक्षा अधिक डोस जास्तीचे पुरवण्यात येणार आहेत. ५ सप्टेंबर रोजी साजर्‍या होणार्‍या शिक्षक दिनापूर्वी सर्व शालेय शिक्षकांच्या लसीकरणास प्राधान्य द्यावे असे मांडवीय यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
गेल्या वर्षी कोरनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रथम मार्च २०२० मध्ये देशवपी लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्या अगोदर काही दिवस देशातील विद्यालये बंद करण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली होती. अनेक राज्यांनी शाळा अंशतः पुन्हा सुरू करण्यास सुरुवात केली असतानाच एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शाळा पुन्हा पूर्णपणे बंद करण्यात आल्या. गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून शाळा-महाविद्यालये ऑनलाइन सुरू आहेत.

सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. बाधितांच्या संखअयेतही झपाट्याने घट होत आहे. केरळ वगळता इतर राज्यांमध्ये परिस्थिती सामान्य झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यांनी शाळा पुन्हा उघडण्यास परवानगी दिली आहे. शाळा सुरू होत असल्या तरी लसीअभावी अनेक शिक्षकांचे लसीकरण रखडले आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी तिसर्‍या लाटेचा इशारा दिलेला आहे, त्यातच कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असलेल्या भागात सरकारने शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मुले आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.