नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दिलासा

0
44

>> १७ सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई नाही

नाशिक येथे दाखल एफआयआर प्रकरणात पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच १७ सप्टेंबरपर्यंत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात दिली.

नारायण राणे यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल तिन्ही एफआयआरना आव्हान देणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. राणेंचे वकील ऍड. अनिकेत निकम यांनी यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यावर सुनावणी घेण्यात आली असता राणे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने याप्रकरणी पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला ठेवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी रत्नागिरीतील संगमेश्वर येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री त्यांना महाड न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

सेना-भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे
कोरोना निर्बंधामुळे सध्या जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतानाही महापौर जयश्री महाजन यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. भाजप कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी महापौर महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आंदोलन करणार्‍या भाजपच्या पदाधिकार्‍यांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे.