शिकाऊ वाहन परवाना मिळवणे यापुढे होणार कठीण

0
9

>> 80 टक्के गुण मिळवावे लागणार; केंद्र सरकारचा नवा आदेश; लवकरच राज्यात अंमलबजावणी : गुदिन्हो

वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी परीक्षेत 80 टक्के गुण मिळवावे लागणार आहेत. केंद्र सरकारने शिकाऊ वाहन चालविण्याच्या परवाना परीक्षेत 80 टक्के गुण मिळविण्याचे बंधनकारक केले आहे. केंद्र सरकारने यासंबंधीचा आदेश जारी केला असून, या आदेशाची प्रत राज्य सरकारला पाठवून या नवीन आदेशाची कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. गोवा राज्यात या नवीन आदेशाची कार्यवाही लवकरच केली जाणार आहे. शिकाऊ वाहन परवाना प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने नवीन आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होऊ शकते, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल दिली.

वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना काही जण परीक्षा देऊन किंवा काही जण एजंट किंवा अन्य माध्यमातून वशिला लावून घेत असतात. आता, यापुढे शिकाऊ वाहन चालविण्यासाठी परवाना सहज मिळणे कठीण होणार आहे. कारण, वाहन चालविण्याचा परवान्यासाठी अर्ज करणाऱ्याला वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, वाहतूक नियम, सिग्नल, आदींचा अभ्यास करावा लागणार आहे. सध्या शिकाऊ वाहन चालविण्यासाठी परवाना मिळविण्यासाठी 60 टक्के गुण बंधनकारक आहेत.

गोवा राज्य सुरक्षा मंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या आदेशावर चर्चा करून अंमलबजावणीच्या कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी म्हटले आहे. गोव्यात अपघात वाढत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. चालकांमध्ये शिस्तीचा अभाव दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिकाऊ वाहन परवाना देण्यासाठी 80 टक्के गुण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गुदिन्हो यांनी सांगितले.

जनजागृतीनंतरच ई-चलन लागू

वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टमद्वारे ई-चलन देण्याबाबतची कार्यवाही नागरिकांमध्ये जागृती घडवून आणल्यानंतरच सुरू करण्यात येणार असल्याचे काल वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. त्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक ती वाहतूक चिन्हे बसवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
वाहतूक खात्याने गेल्या 4 मे रोजी एका जाहीर नोटीसीद्वारे पणजी व आसपासच्या 13 ठिकाणी जी इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवली आहे, त्याद्वारे वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांना 22 मेपासून ई-चलन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र, आता त्यासंबंधीचा खुलासा करताना गुदिन्हो म्हणाले की, ही पद्धत सुरू करण्यापूर्वी त्यासाठीच्या जाहिराती वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांद्वारे प्रसारित करण्यात येणार आहेत.
आयटीएमएस यंत्रणा पर्वरी, पणजी, दोनापावला, मेरशी येथील 13 ठिकाणी बसवण्यात आलेली आहे.