शाळांच्या परिसरात पोलीस सुरक्षेत वाढ

0
4

>> मुख्यमंत्री; शाळकरी मुलीच्या अपहरणाचे प्रकरण

चवाटो, केरी-सत्तरी येथे 27 जानेवारीला एका शाळकरी मुलीचे चारचाकी गाडीतून आलेल्या गुंडांनी अपहरण करण्याचा जो अयशस्वी प्रयत्न केला, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शाळा व विद्यालयांजवळील परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

राज्यातील शाळा विद्यालयांतील परिसरात आता पोलिसांना गस्त घालण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मोटारसायकल, पीसीआर वाहने तसेच प्रसंगी पायी चालत जाऊन सुद्धा गस्त घालण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आलेला असून, पोलिसांनी आपले काम सुरू केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काल आमदार दिव्या राणे यांच्या गोवा विधानसभेतील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
गस्तीवरील पोलिस व अधिकाऱ्यांना त्यांच्या जवळच्या परिसरातील विद्यालये, महाविद्यालये आदींना भेट देऊन त्यांच्या काही तक्रारी असतील, तर त्या ऐकून घेण्याची सूचना करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शाळा सुरू होण्याच्या वेळी तसेच सुटण्याच्या वेळी वाहतूक पोलिसांनाही लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. विद्यालयांना संबंधित पोलिस स्थानके व तेथील पोलीस अधिकारी यांचे फोन क्रमांक देण्याची सोय करण्यात आली आहे. 112 ही इमरजन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम दिवस-रात्र चालू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पिंक फोर्स देखील सुरक्षेसाठी तैनात

शैक्षणिक संस्थांमध्येही आवश्यक ती जागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात संशयास्पदरित्या कुणी फिरत असल्याचे आढळून आल्यास पोलिसाना कळवण्यास सांगितले आहे. सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची सूचनाही केली आहे. विद्यार्थिनी आणि शिक्षिका आदींना सुरक्षित वाटावे यासाठी महिला पोलिसांच्या पिंक फोर्स गाड्यांनाही विद्यालयांच्या परिसरात वेळोवेळी गस्त घालण्याची सूचना करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.