राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार

0
4

>> विरोधकांचा विधानसभेत गंभीर आरोप; चौकशीची मागणी; क्रीडामंत्र्यांनी आरोप फेटाळले

गोव्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी जो कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला, त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काल विरोधकांनी विधानसभेत केला; मात्र क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी हा आरोप फेटाळून लावला. काल प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार व्हेंझी व्हिएगस, वीरेश बोरकर, युरी आलेमाव व क्रूझ सिल्वा यांनी याविषयीचा प्रश्न विचारला होता.

यावेळी आरोप करताना आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी क्रीडा खात्याने राज्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा सपर्धांच्या आयोजनासाठी तब्बल 573 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला आणि एवढा निधी कशासाठी खर्च केला, ते स्पष्ट करण्याची मागणी केली. तसेच ह्या एकूण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोगाद्वारे चौकशी करण्याची मागणी केली; मात्र क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सगळे आरोप फेटाळून लावले. तसेच क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी 573 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप फेटाळून लावला. राज्यात क्रीडाविषयक साधनसुविधा उभारण्यासाठी 2014 सालापासून 573 कोटी रुपये खर्च केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. ह्या साधनसुविधांचा राज्यात झालेल्या ल्युसोफोनिया क्रीडा स्पर्धा व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांच्या आयोजनासाठी फायदा झाल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी व्हेंझी व्हिएगस, विजय सरदेसाई व युरी आलेमाव यानी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून क्रीडामंत्र्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. तसेच भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी सभागृहात केली.
विरोधकांनी गोविंद गावडे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून 2014 साली गोव्यात झालेल्या ल्युसोफोनिया क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात क्रीडाविषयक साधनसुविधा उभारण्याचे काम हाती घेतले होते, असे स्पष्ट केले. त्यावेळी फातोर्डा येथील नेहरू स्टेडिएमची दुरुस्ती व नूतनीकरण यावरच तब्बल 60 कोटी रुपये एवढा खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी युरी आलेमाव यांनी हस्तक्षेप करत, सरकारने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर नेहरू स्टेडिअमच्या साफसफाईसाठीच तब्बल 1 कोटी 60 लाख रुपये खर्च केले, असे सांगितले.

क्रूझ सिल्वा व वीरेश बोरकर यांनी क्रीडा स्पर्धांदरम्यान वाहतुकीचे व जेवणाचे कंत्राट परप्रांतीयांना दिल्याचे सांगून सरकारवर टीका केली. त्यावर उत्तर देताना गोविंद गावडे म्हणाले की, त्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या; पण त्या निविदात गोमंतकीयांना भाग घेतला नाही. 16 हजार लोकांना जेवण पुरवण्याची क्षमता नसल्याने गोव्यातील कुणीही निविदा पाठवली नसावी, असा दावा गावडे यांनी केला. वाहतुकीचे कंत्राट ज्यांना मिळाले होते, त्यांनी 200 गोमंतकीयांच्या टॅक्सी ह्या स्पर्धांच्या दरम्यान भाडेपट्टीवर घेतल्याचा खुलासा गावडे यांनी केला.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर 48 कोटींचा खर्च

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर क्रीडा खात्याने 48 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती गोविंद गावडे यांनी यावेळी दिली. खर्चाविषयी माहिती देताना उद्घाटन सोहळा व समारोप सोहळा यावर 23 कोटी खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच क्रीडा स्पर्धांचे प्रमोशन आणि अन्य खर्च मिळून 23 कोटी 41 लाख रुपये असे एकूण 48 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली.