‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’

0
0

>> शरद पवार यांच्या पक्षाला मिळाले नवे नाव; चिन्हासाठी प्रतीक्षा करावी लागणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाला दिल्याचा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय देताना शरद पवार गटाला नवे नाव आणि चिन्ह निवडण्यासाठी बुधवारी दुपारी 4 पर्यंतची वेळ दिली होती. शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला 3 नावे सुचवली होती. त्यानंतर आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. शरद पवार गट हा वटवृक्ष या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबद्दलचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या वर्षी जुलै महिन्यात फूट पडली होती. अजित पवार हे काही आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले होते, तेव्हापासून दोन्ही गटांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. यासंदर्भात दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्ह आपलाच असल्याचा दावा याचिकेतून केला होता. दोन्ही गटांनी या संदर्भातील पुरावे देखील दिले होते.

या वादावर निवडणूक आयोगाने 6 महिन्यांत 10 वेळा सुनावणी घेतली आणि काल 6 फेब्रुवारी रोजी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला होता. काल निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नाव दिल्याने आगामी राज्यसभा निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नव्या पक्षाला हे नाव वापरता येईल.
शरद पवार गटाने नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला दिलेल्या पर्यायामध्ये शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदराव पवार ही तीन नावे दिली होती.