शालेय वर्गांबाबत २ ऑक्टोबरनंतर निर्णय

0
285

>> मुख्यमंत्री ः १०, १२ वीच्या वर्गांना प्राधान्य

>> मुख्याध्यापक, पालक – शिक्षक संघांशी साधला संवाद

राज्यातील विद्यालयांचे वर्ग सुरू करण्याबाबत येत्या २ ऑक्टोबरनंतर एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. पालकांच्या संमतीने दहावी आणि बारावीच्या मुलांना शिक्षक विद्यालयात मार्गदर्शन करू शकतात. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विद्यालयाचे वर्ग सुरू करण्याबाबत २ ऑक्टोबरनंतर सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. मुलांच्या भवितव्याचा विचार करून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यास प्राधान्यक्रम दिला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्हिडिओ संवादाच्या माध्यमातून पत्रकारांशी बोलताना काल दिली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यातील विद्यालयाचे वर्ग, ऑनलाइन शिक्षण, नवीन शिक्षण धोरण आदी विषयांवर शाळा व्यवस्थापन, पालक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघटना व इतरांशी व्हिडिओ संवादाच्या माध्यमातून काल चर्चा केली.

राज्यातील सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांना कनेक्टिव्हिटीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे पालकांच्या संमतीने कनेक्टिव्हिटीची समस्या असलेल्या दहावी आणि बारावीच्या मुलांना शिक्षक विद्यालयात मार्गदर्शन करू शकतात.

शिक्षण खात्याकडून विद्यालयांचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत. विद्यालय व्यवस्थापनांना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून वर्ग सुरू करावे लागणार आहे. सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर्स यांचा वापर करावा लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील मोबाईल कनेक्टिव्हिटीची समस्या दूर करण्यासाठी मोबाईल टॉवर्स उभारण्यासाठी सादर केलेल्या अर्जावर महिनाअखेरपर्यंत टॉवर्स बांधकामासंबंधी आदेश जारी केले जाणार आहेत, असेही मुख्यमत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन शिक्षण धोरणावर सर्वच स्तरावर चर्चा होणे आवश्यक आहे. या नवीन शिक्षण धोरणाबाबत पालक, शिक्षक व इतरांनी आपल्या सूचना शिक्षण खात्याला सादर कराव्यात. राज्य सरकारकडून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना नवीन शिक्षण धोरणाबाबत सूचना सादर केल्या जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

विद्यालयांचे अनुदान, बालरथ कर्मचारी व इतर विषयावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. विद्यालयाचे वार्षिक अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

या व्हिडिओ संवादात शिक्षण सचिव नीला मोहनन, शिक्षण संचालक संतोष आमोणकर, नवीन शिक्षण धोरण अंमलबजावणी टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष, आमदार सुभाष शिरोडकर व इतरांनी सहभाग घेतला. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तूर्त विद्यालयाचे वर्ग सुरू करू नये, अशी सूचना अनेकांनी केली. काही जणांनी विद्यालयाचे प्रलंबित अनुदान, बालरथ आणि कर्मचार्‍याचा विषय मांडला. शिक्षण सचिव मोहनन यांनी केंद्र सरकारने विद्यालये सुरू करण्याबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेची माहिती दिली.