शहा, नड्डा यांना ७ फुटीर आमदार भेटले

0
10

>> पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीअभावी फुटीरांची निराशा; शहा, नड्डांसोबत पुढील रणनीतीबाबत चर्चा

कॉंग्रेसमधून फुटून भाजपात प्रवेश केलेल्या ८ आमदारांपैकी ७ आमदारांनी काल नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि खासदार विनय तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली हे आमदार नवी दिल्लीत दाखल झाले होते. मायकल लोबो हे परदेशात असल्याने ते यावेळी उपस्थित नव्हते. खरे तर, मुख्यमंत्री डॉ. सावंत हे या आमदारांची पंतप्रधानांसोबत बैठक घडवून आणण्यासाठीच त्यांना दिल्लीला घेऊन गेले होते; मात्र मोदींच्या व्यस्त कार्यक्रमामुळे दिवसभर वाट पाहूनही ही बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे शहा, नड्डांची भेट घडवून या आमदारांची बोळवण करण्यात आली.

पंतप्रधानांच्या फुटीर आमदारांसोबतच्या बैठकीसाठी सोमवारी सकाळची वेळ निश्‍चित करण्यात आली होती; मात्र नरेंद्र मोदी हे आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने ते गोव्यातून दिल्लीत गेलेल्या या आमदारांना भेटीसाठी वेळ देऊ शकले नाहीत.
या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सदर आमदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी भेट घडवून आणली. या बैठकीत राज्यातील नव्या राजकीय घडामोडींबरोबरच पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली. या भेटीनंतर रात्री सर्व नेत्यांनी दिल्लीहून गोव्याकडे प्रयाण केले.
कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांच्या भेटीसाठी पंतप्रधानांनी वेळ दिल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत हे भलतेच खूश होते. मात्र काल प्रत्यक्षात ही बैठक होऊच न शकल्याने त्यांच्यासह तानावडे, तेंडूलकर व अन्य फुटीर आमदारांच्या आनंदावरही विरजण पडले. पंतप्रधानांच्या भेटीचा योग आल्याने फुटीर आमदार आनंदात होते; मात्र ही भेट न झाल्याने त्यांचीही पुरती निराशा झाली.

नव्या फुटीरांच्याही पदरी निराशा
दिगंबर कामत यांच्यासह अन्य फुटीर आमदारांना पंतप्रधानांनी भेटीसाठी वेळ दिल्याने आश्‍चर्य व्यक्त होत होते; मात्र काल ही भेट झालीच नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. यापूर्वी बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये आले होते, त्यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली नव्हती. तसेच राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनाही पंतप्रधानांची भेट घेणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे जुन्यांप्रमाणे नव्या फुटीर आमदारांच्या पदरी निराशाच आल्याचे समोर आले.