मडगाव नगराध्यक्षांविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल

0
8

>> १५ नगरसेवकांच्या सह्या; नगरपालिका प्रशासनाकडे ठरावाची प्रत सादर

मडगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष घन:श्याम शिरोडकर यांच्याविरुद्ध काल भाजप समर्थक १५ नगरसेवकांनी अविश्‍वास ठराव दाखल केला असून, या नगरसेवकांनी काल पणजी येथे नगरपालिका प्रशासनाचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांच्याकडे अविश्‍वास ठरावाची प्रत सादर केली.

यावेळी उपनगराध्यक्ष दीपाली सावळ यांच्यासह महेश आमोणकर, श्‍वेता लोटलीकर, कामिल बार्रेटो व सगुण नाईक हे चार नगरसेवक उपस्थित होते. या ठरावावर भाजप समर्थक १५ नगरसेवकांनी सह्या केल्या आहेत.

गेल्या शुक्रवारी मडगाव नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत घन:श्याम शिरोडकर यांनी भाजप गटाचे उमेदवार दामोदर शिरोडकर यांचा १५ विरुद्ध १० मतांनी पराभव केल्याने राज्यभर खळबळ माजली होती.

भाजप समर्थक नगरसेवकांनी दामोदर शिरोडकर यांनाच मत द्यावे, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व दिगंबर कामत यांनी निवडणुकीच्या एक दिवसअगोदर त्यांच्यासोबत बैठक घेऊन तशी सूचना केली होती; मात्र तरीही भाजपच्या काही नगरसेवकांनी विरोधी गटाचे उमेदवार घन:श्याम शिरोडकर यांना मत दिल्याने त्यांचा विजय झाला होता. यानंतर भाजप आणि कामत हे आपल्या समर्थक नगरसेवकांवर दबाण आणून घन:श्याम शिरोडकर यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव आणण्यास भाग पाडतील हे सर्वश्रुत होते आणि काल तसेच घडले. भाजप समर्थक १५ नगरसेवकांनी घन:श्याम शिरोडकर यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव नगरपालिका प्रशासनाचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांच्याकडे सुपूर्द केला.

मडगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व १५ नगरसेवकांना बोलावून त्यांचा कडक शब्दांत समाचार घेतला. दुसर्‍याच दिवशी अविश्‍वास ठराव आणण्याचे ठरले. २५ सदस्यांच्या मडगाव पालिकेत आमदार दिगंबर कामत यांच्या मडगाव मॉडेलचे ७ व भाजपचे ८ मिळून १५ नगरसेवक आहेत. या अविश्‍वास ठरावावर १५ सदस्यांनी सह्या केल्या. आता पंधराही नगरसेवक संघटित असल्याचे सांगत आहेत. मात्र नगराध्यक्षपदासाठी आणखी चारजण इच्छुक आहेत.

आपल्याविरोधात अविश्‍वास ठराव आणल्याचे समजले आहे; परंतु अधिकृतपणे कोणतीच माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही. त्या अविश्‍वाच्या ठरावावर काय आरोप केले आहेत, ते पाहावे लागेल. त्याला आपण उत्तर देईन. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने आपण सह्या केल्या, असे काही नगरसेवकांकडून समजले आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष घन:श्याम शिरोडकर यांनी दिली.