शव प्रदर्शन काळात राज्यात साधनसुविधांवरील ताणाची भीती

0
114

वाहतुकीची कोंडी, कचरा समस्येचाही धोका
सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शनानिमित्त येत्या २२ नोव्हेंबर ते ४ जानेवारी या काळात सुमारे ५० लाख भाविक गोव्यात दाखल होणार असून मोठ्या संख्येने येणार्‍या पर्यटकांमुळे राज्यातील साधनसुविधेवर प्रचंड ताण पडून वाहतूक व अन्य व्यवस्था खोळंबण्याची भीती निर्माण झाली आहे.२२ नोव्हेंबर ते ४ जानेवारी असे ४४ दिवस जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेव्हियर शव प्रदर्शन सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी गोवा सरकारने देश-विदेशात जाहिरातबाजी केलेली असून या पार्श्‍वभूमीवर या सोहळ्यासाठी ५० लाख भाविक राज्यात दाखल होणार असल्याची माहिती राज्य पर्यटन खात्यातील सूत्रांनी दिली.
साधनसुविधेवरील ताणाची भीती
या सुमारे दीड महिन्यांच्या काळात ५० लाख भाविक राज्यात दाखल झाल्यास राज्यातील साधनसुविधेवर व खास करून वाहतुकीवर प्रचंड ताण येण्याची भीती निर्माण झाली आहे.
गोव्याची एकूण लोकसंख्या १५ लाखांच्या आसपास आहे. यायाच अर्थ गोव्याची जेवढी लोकसंख्या आहे. त्याच्या तिप्पट लोक वरील काळात राज्यात दाखल होणार आहेत. तसे झाल्यास भारतातील कुठल्याही राज्यात दीड महिन्याच्या काळात जेवढे भाविक आतापर्यंत आलेले नाहीत तेवढे भाविक आकाराने अत्यंत लहान असलेल्या राज्यात दाखल होणार असल्याने ती गोव्यासाठी चिंतेची बाब ठरू शकते, असे वाहतूक खात्यातील एका सूत्राने सांगितले. त्याशिवाय नाताळ व नव्या वर्षानिमित्तही दरवर्षी लाखो भाविक गोव्यात येत असतात. यावर्षीही ते येणार असल्याने प्रत्यक्षात पर्यटकांची संख्या ५५ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गोव्यातील हजारो भाविकही रोज दर्शनासाठी जाणार असल्याने दर्शनासाठी जाणार्‍या लोकांचेही प्रचंड हाल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यटकांना गाईड्‌सची सुविधा
राज्यात येणार्‍या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यटन खाते व गोवा पर्यटन महामंडळाने त्यांच्या सोयीसाठी विशेष गाईड्‌सची सोय केली आहे. तसेच पर्यटकांना जुने गोवेची सहल करता यावी यासाठी विशेष ‘हॉप ऑन हॉप’ बसेस सुरू करण्यात येणार आहेत.
मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने येणार्‍या पर्यटकांमुळे वाहतुकीची कोंडी व कचरा समस्या या प्रमुख समस्यांबरोबरच अन्य कित्येक समस्या व प्रश्‍न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.