तिसर्‍या लाटेच्या मुकाबल्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत ः डॉ. बांदेकर

0
106

कोरोना महामारीची तिसरी लाट येत्या सप्टेंबर २०२१ मध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या लाटेत मुलांना जास्त बाधा होण्याची शक्यता आहे. या लाटेला तोंड देण्यासाठी सरकारला वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक साधनसुविधा व इतर अनेक सूचना करण्यात येणार असल्याची माहिती काल गोमेकॉचे डीन तथा तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ. शिवानंद बांदेकर यांनी समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

राज्याला कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने मोठा दणका दिल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी सरकारने आत्तापासून तयारीला सुरुवात केली आहे. कोरोना रोखण्यासाठी रणनीती तयार करण्यासाठी खास कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच डॉ. बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ व इतर डॉक्टरांचा समावेश आहे. या तज्ज्ञ समितीची पहिली बैठक बांबोळी येथे शनिवारी घेण्यात आली.

मुले बाधित होण्याच्या
टक्केवारीत वाढ

राज्यात मुलांमध्ये कोरोना महामारीचा फैलाव वाढत आहे. मागील वर्षी केवळ ७ ते ८ टक्के मुले बाधित झाल्याचे आढळून आले होते. तर, मागील तीन महिन्यांत मुले बाधित होण्याचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांवर पोहोचले आहे. आगामी काळात मुलांमधील कोरोनाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात कोरोना दुसर्‍या लाटेत ३३ अर्भकांना बाधा झाली आहे, असे समितीचे सदस्य डॉ. जगदीश काकोडकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत बाधित होणार्‍या मुलांवर योग्य उपचार करण्यासाठी तीन गटांत साधनसुविधा तयार करण्याची गरज आहे. मुलांवरील उपचारासाठी आयसीयू खाटा उपलब्ध करण्याची गरज आहे. तसेच, मुलांवर उपचार करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी एक खास इस्पितळाची व्यवस्था करण्याची गरज आहे. बाधित मुलांवर सरकारी आणि खासगी इस्पितळात उपचार करण्यासाठी एकच प्रोटोकॉल तयार करण्याची गरज आहे. राज्यात १८ वर्षाखालील सुमारे साडेचार ते पाच लाख मुलांचा समावेश आहे, असे यावेळी डॉ. काकोडकर यांनी सांगितले.
विद्यालये सुरू करण्याचा निर्णय विचार करून घेतला पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीत विद्यालये सुरू केली जाऊ शकत नाहीत, असे डॉ. बांदेकर म्हणाले.

मुक्यरमायकोसिसचा
आणखी एक रुग्ण

राज्यात म्युकरमायकोसिसचा (काळी बुरशी) आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. गोमेकॉमध्ये म्युकरमायकोसिसचा बाधा झालेले सहा रुग्ण सुरुवातीला आढळून आले होते. त्यातील एका रुग्णाचे निधन झाले. तर पाच जणांवर उपचार सुरू होते.

राज्यातील एका खासगी इस्पितळाने म्युकरमायकोसीसची बाधा झालेला एक रुग्ण गोमेकॉमध्ये उपचारासाठी पाठविला आहे. त्यामुळे गोमेकॉतील म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या आता ६ झाली आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत, अशी माहिती काल गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.