शक्तीपूजेचा महिमा

0
45

योगसाधना – ५३७
योगमार्ग – राजयोग
अंतरंग योग – १२२

  • डॉ. सीताकांत घाणेकर

दुर्बल लोकांच्या चांगल्या गोष्टीही काळाच्या पोटात नष्ट होऊन जातात. जगातील चिरंतन नैतिक मूल्ये योग्यरीत्या टिकवायची असतील तर तशा सज्जनांनी संगठीत शक्तीने त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे.

समग्र विश्‍वांत विविध तर्‍हेच्या, स्वभावाच्या व्यक्ती आहेत. म्हणूनच म्हणतात – ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. व्यक्तीप्रमाणे त्याचा गंड वेगवेगळा असतो – अहंगंड, न्यूनगंड, भयगंड. काही व्यक्तींकडे थोडे धन असले, विद्या असली अथवा सत्ता असली की लगेच त्यांचा अहंगंड बळावतो. त्यातील काही जण या सर्व शक्ती स्वार्थापोटी वापरतात. अशा समयी त्यांना सत्य-असत्य; चांगले- वाईट; नैतिक-अनैतिक; कल्याणकारी-अकल्याणकारी सर्वांचा विसर पडतो.
सर्व जगाच्या इतिहासाकडे नजर फिरवली की अशा अनेक व्यक्ती दृष्टिक्षेपात येतात – अगदी पुरातन काळ ते हल्लीपर्यंत – रावण, धृतराष्ट्र, दुर्योधन, शकुनी, जरासंध, कालयवन, औरंगजेब, हिटलर… असे अनेक. त्यांचा नाश करण्यासाठी तितकीच शक्तिमान व्यक्ती जन्मास येते. कधी कधी तर भगवंत स्वतः अवताररूपात प्रकट होतात व आश्‍वासन देऊन जातात की जेव्हा जेव्हा संस्कृती व मानवतेवर संकटे येतील तेव्हा तेव्हा मी जन्म घेईन.
त्याचवेळी या तिन्ही शक्ती असलेले इतरदेखील आहेत. पण त्यांची सद्बुद्धी जागृत असते. ते अजरामर होतात- राम, कृष्ण, बुद्ध, महाराणा प्रताप, छ. शिवाजी, संभाजी, झांशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर.. हेदेखील अनेक.

त्याचबरोबर न्यूनगंड असणार्‍या व्यक्ती असतात. त्यांना स्वतःबद्दल आत्मविश्‍वास नसतो. त्याचबरोबर भयगंड असला तर विचारायलाच नको. थोडे जरी दुःख, अपयश आले की ते काहीही करण्यास कचरतात.
अशा व्यक्तीसाठी गरज असते ती तेजाची, तेजोपासनेची. तोच विचार आपण करीत आहोत. सूर्य ही तेजाची देवता. त्या भास्कराची उपासना करण्यासाठी आपण तेजाचे महत्त्व समजायला हवे. सूर्य तेजस्वी आहे. तो सृष्टीला व त्यातील प्रत्येक घटकाला ऊर्जा, ऊब, प्रकाश, शक्ती देतो.

अनेकवेळा सूर्य चकाकतो पण मध्येच ढग येतात. सूर्याचा प्रकाश कमी होतो. त्यावेळी सूर्य लपतो. पण आपल्याला माहीत असतं की काही काळानंतर काळे ढग निघून जातील. तसाच तेजस्वी माणूस संकटात खचून जात नाही. निराश होत नाही. अशा व्यक्तीची अस्मिता जागृत असते. तो म्हणतो- * मीदेखील कुणीतरी आहे. * कुणाचातरी आहे. * मी कोणीतरी बनू शकतो. * मी काहीही करू शकतो. त्यामुळे तो सतत कार्यरत राहतो. आळशी बनत नाही.
आज न्यूनगंडामुळे व विश्‍वातील अनेक संकटांमुळे मानव दुबळा, हीन, दीन, लाचार, बिचारा, बापुडा होतो. अशी निस्तेज झालेली व्यक्ती भगवंतालादेखील आवडत नाही. भगवान श्रीकृष्णाने तर गीतेत अनेक ठिकाणी मानवाला आश्‍वासने दिलेली आहेत….

  • सर्वस्य चाहं हृदिसन्निविष्टो
  • ममै वांशो जीवलोके
  • योगक्षेमं वाहाम्यहम्
    भगवंतावर दृढ श्रद्धा व स्वतःवर आत्मविश्‍वास ठेवून समस्यांना सामोरे जाण्याचे शिक्षण तेजोपासना म्हणजे सूर्योपासना देते.
    त्याचबरोबर तेजोमय व्यक्ती दुसर्‍याला हीन दीन मानत नाही. काहीजण दुसर्‍याला थोडी जरी मदत केली तर अनेकवेळा त्यांना अपशब्द ऐकवतात. अशा व्यक्तीने सूर्योपासना शिकायला हवी. जीवनात भेदभाव ठेवू नये. सूर्य आपल्या सर्व तर्‍हेच्या शक्ती सर्व विश्‍वांत सर्वांना देतो. तो कसलाही भेद करत नाही- राष्ट्र, वंश, वर्ण, लिंग, शिक्षण, स्थिती, परिस्थिती, संस्कार… सर्वांना समानतेने वागवतो.
    पंचायतन पूजेतील सूर्य ही चौथी देवता. गणपती- शिव- हरी. आता पाचवी देवता म्हणजे अंबा – शक्ती.
  • अंबा – या मातेची पूजा शक्तीपूजनाचे महत्त्व व रहस्य समजावते. सर्व भक्तांनी, कर्मयोग्यांनी शक्तीचे महत्त्व समजायला हवे. त्यांनी शक्तीची उपेक्षा, निर्भत्सना करू नये.
    पू. पांडुरंगशास्त्री या संदर्भात म्हणतात – ‘‘कितीतरी चांगल्या गोष्टी शक्तीच्या अभावामुळे जगातून नष्ट झालेल्या दिसतात. पुराणात खूप वेळा असुर देवावर विजयी झालेले आहेत. त्यांत देवांचा शक्तीउपासनेत असलेला प्रमादच कारणीभूत ठरतो. निष्क्रिय सत्य क्रियाशील असत्यासमोर टिकत नाही. ही गोष्ट सत्‌च्या उपासकांनी विसरता कामा नये. क्रियाशील असत्याला जिंकण्यासाठी सत्याग्रही क्रियाशील बनले पाहिजे आणि सत्याच्या उपासकांनी शक्ती प्राप्त करण्यासाठी साधना केली पाहिजे- हे निर्विवाद सत्य आहे. महर्षी व्यासांनीही पांडवांना त्यांच्या वनवास काळात शक्तीपूजेचा महिमा समजावून शक्तीच्या प्राप्तीसाठी तपश्‍चर्या करण्याचा आदेश दिला होता.
  • प्रकर्षतंत्रा हि रणे जयश्री.
    दुर्बल लोकांच्या चांगल्या गोष्टीही काळाच्या पोटात नष्ट होऊन जातात. जगातील चिरंतन नैतिक मूल्ये योग्यरीत्या टिकवायची असतील तर तशा सज्जनांनी संगठीत शक्तीने त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे.
    भारतीय संस्कृतीमध्ये शक्तीची उपासना म्हणजे दुर्गेची उपासना. ज्या देवींनी असुरांचा नाश केला, पण फक्त कर्मकांडं करून उपयोगाचे नाही तर त्या दिशेने साधना हवी. आज ही साधना फक्त पूजा-अर्चा, आरती, नैवेद्य, भजन- यातच अडकली आहे.
    इतिहासात यासंबंधात अनेक उदाहरणे आहेत…
  • पांडवांना महर्षी व्यासांबरोबर श्रीकृष्णानेदेखील अर्जुनाला भगवान शंकराकडून पाशुपतास्त्र व इंद्राकडून ब्रह्मास्त्र आणायला पाठवले होते. कारण गुरू द्रोणांनी ही अस्त्रे आपला पुत्र अश्‍वत्थाम्याला शिकवली होती- प्रिय शिष्य अर्जुनाला नाही. ही गोष्ट श्रीकृष्णाला ज्ञात होती.
  • छ. शिवाजी महाराजांसमोर शक्तिमान औरंगजेब होता. महाराजांना तर मराठी साम्राज्य स्थापन करायचे होते. तेेेेे फक्त जगदंबेची पूजा व उपासना करायला बसले नाहीत तर त्यांनी मावळ्यांना लढाईचे शिक्षण दिले. त्यांची समर्थ माता- जिजाबाईनीसुद्धा महिलांना तसे शिक्षण दिले होते.
    दुर्भाग्याने हे तत्त्वज्ञान बहुतेकजण आत्मसात करत नाहीत. म्हणून ज्यावेळी दुष्ट परकीय आक्रमक महम्मद घोरी सोमनाथ मंदिर उध्वस्त करायला निघाला तेव्हा म्हणे भक्तजन व इतर जनता ब्राह्मणांबरोबर कर्मकांड करीत होते. त्यावेळी घोरीच्या सैनिकांनी मंदिर उध्वस्त केलेच पण हजारो माणसांना कापून काढले.
    आजसुद्धा जेव्हा भारताचे शेजारी देश आक्रमण करतात तेव्हा आपण त्यांना शांतीचा पाठ शिकवत होतो. पांढरी कबुतरे उडवत होतो.
    एक गोष्ट चांगली घडली की आजच्या राज्यकर्त्याला याचे ज्ञान व जाणीव आहे. त्यामुळे आज प्रखर प्रतिकार केला जातो- मग सीमेवर आक्रमण असो अथवा देशातील आतंकवाद असो.
    आपल्या संस्कृतीप्रमाणे देव शक्तिमान आहेतच पण शक्तीची रूपे देवतांचीच जास्त आहेत. त्याशिवाय देवींची विविध रूपे आहेत. म्हणून एक स्तोत्र म्हटले जाते..
  • नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः|
    नमः प्रकृत्यै भद्राय नियताः प्रणताः स्म ताम् ॥
    ह्या पहिल्या श्‍लोकानंतर वेगवेगळ्या स्वरूपात रुपे येतात.
  • या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता
    नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
    पुढच्या प्रत्येक श्‍लोकात रूपे अशी…
  • बुद्धीरुपेण, * क्षुधारुपेण, *शक्तिरुपेण, * शक्तिरूपेण, * तृष्णारुपेण,
  • शान्ती रुपेण, * श्रद्धा रुपेण,*कान्तिरुपेण, *लक्ष्मीरुपेण, * वृत्तीरुपेण,
  • स्मतिरुपेण, * दयारुपेण, * तुष्टिरुपेण.
    भारतात महिलांबद्दल फार आदर होता. म्हणून शास्त्रकार म्हणत असत-
  • यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमते देवताः|
    पण कालांतराने हा संस्कार नाश पावला. नारीला फक्त – चूल आणि मूल सांभाळणारी, भोगदासी मानू लागले. अपवाद अवश्य आहेत. त्यामुळे उच्च संस्कृती लोप पावू लागली. मातृशक्तीची पूजा कमी झाली.
    मधल्या इतिहासकाळात विविध क्षेत्रांत अनेक महिला आपल्या कर्तृत्वामुळे समाजासमोर अवश्य आल्या-
  • गार्गी, मैत्रेयी, अरुंधती, अनसूया, मदालसा, मीराबाई, मुक्ताई..
  • जीजामाता, ताराराणी, लक्ष्मीबाई, राणी चेन्नमा, राणी अहिल्याबाई, सावित्रीबाई… अशी मोजकीच नावे डोळ्यासमोर येतात.
    एक आनंदाची गोष्ट म्हणजे इतिहास कूस बदलतो. नारीला व समाजाला नारीशक्तीची जाणीव होत आहे. अनेक क्षेत्रात ती प्रावीण्य दाखवते आहे.
  • राजकारण, * समाजकारण, * मिलिटरी, * कला, * खेळ, * साहित्य,
  • संगीत, * नाटक * वैद्यकीय * तत्त्वज्ञान * अध्यात्म
    म्हणूनच ‘‘बेटी बचाव बेटी पढाव’’ हा नारा ऐकायला मिळतो.
    योगसाधकांना या शक्तीची जाणीव नक्कीच आहे. ते या दिशेने नक्कीच सहकार्य करतील.