व्यंकय्या नायडू एनडीएचे उमेदवार

0
58

>> उपराष्ट्रपतीपद निवडणूक

केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची सत्ताधारी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून काल निवड करण्यात आली. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उपराष्ट्रपतीपदासाठी येत्या ५ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. नायडू आपला उमेदवारी अर्ज आज सादर करणार आहेत. १८ पक्षांचा सहभाग असलेल्या विरोधी गटाने याआधीच आपला उमेदवार म्हणून गोपाळकृष्ण गांधी यांचे नाव जाहीर केले आहे.
व्यंकय्या नायडू यांच्यापाशी असलेला राजकीय अनुभव समृद्ध असा आहे. त्यांच्या निवडीचे एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी स्वागत केले आहे, अशी माहिती शहा यांनी यावेळी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १८ जुलै अशी आहे. एनडीएतर्फे व्यंकय्या नायडू यांच्या बरोबरच द्रौपदी मुरमू व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हेही उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत होते.

व्यंकय्या नायडू योग्य
उमेदवार ः पंतप्रधान
एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी मोदी यांनी नायडू हे उपराष्ट्रपती म्हणून यथायोग्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
नायडू यांच्यापाशी संसदीय कामकाजाचा गाढा अनुभव असल्याने ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला.