वॉझनियाकी, थिएमची विजयी सलामी

0
116

>> नदालच्या सामन्यात पावसाचा अडथळा

>> स्टॅन वावरिंकाचा पराभव

आठव्या मानांकित डॉमनिक थिएम, सॅम क्वेरी यांनी पुरुष एकेरीतून तर कॅरोलिन वॉझनियाकी, पेट्रा क्विटोवा, कॅरोलिना प्लिस्कोवा यांनी महिला एकेरीतून फ्रेंच ओपन ग्रॅ्रंडस्लॅम स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. माजी विजेत्या स्टॅन वावरिंका याचा प्रवास मात्र पहिल्याच फेरीत आटोपला.

नदालने इटलीच्या सायमन बोलेली यांच्यातील सामना पावसामुळे थांबविण्यात आला. यावेळी नदाल ६-४, ६-३, ०-३ असा आघाडीवर होता. पुुरुष एकेरीत सातव्या मानांकित व जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएम याने बेलारुसच्या तेरिज इवाश्का याला ६-२, ६-४, ६-१ असे पराभूत करत दुसरी फेरी गाठली. दुसर्‍या फेरीत त्याचा सामना ग्रीसच्या स्टेफनोस त्सित्सिपास याच्याशी होणार आहे. फ्रेंच ओपनच्या माजी विजेत्या स्टॅन वावरिंका याला मात्र पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. ३ तास ३० मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत गुलेर्मो गार्सिया लोपेझ याने वावरिंका याला ६-२, ३-६, ४-६, ७-६, ६-३ असे हरविले. सध्या जागतिक क्रमवारीत तिसाव्या स्थानी असलेला वावरिंका या पराभवामुळे ‘टॉप २५०’ बाहेर फेकला जाणार आहे.

महिला एकेरीत आठव्या मानांकित पेट्रा क्विटोवाने एका सेटच्या पिछाडीनंतर व्हेरोनिका सेपेड रोईग हिला ३-६, ६-१, ७-५ अशी धूळ चारत दुसरी फेरी गाठली. झेक प्रजासत्ताकच्या क्विटोवाने पहिल्या सेटमध्ये तब्बल १७ टाळता येण्यासारख्या चुका केल्या. दोनवेळच्या विंबल्डन विजेत्या क्विटोवाने यानंतर स्वतःला सावरत नैसर्गिक आक्रमक खेळाच्या बळावर विजय साकारला. डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित कॅरोलिना वॉझनियाकी हिने पहिला सेट टायब्रेकरपर्यंत लांबल्यानंतर दुसरा सेट सहज जिंकत डॅनियल रोझ कॉलिन्स हिला ७-६, ६-१ असे हरवून दुसरी फेरी गाठली. सहावे मानांकन लाभलेल्या झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवा हिने टायब्रेकरपर्यंत लांबलेल्या पहिल्या सेटमध्ये ७-६ (६) असा विजय प्राप्त केल्यानंतर दुसरा सेट ६-४ असा जिंकत आपल्याच देशाच्या बार्बरा क्रेसिकोवाला हरविले.
भारताच्या युकी भांब्रीचा सामना तैवानच्या लू यीन सून याच्याविरुद्ध काल सोमवारी होणार होता. परंतु, लू याने माघार घेतल्याने युकी आज मंगळवारी बेल्जियमच्या रुबन बेमेलमन्स याच्याशी दोन हात करणार आहे.

मानांकित खेळाडूंचे निकाल ः पहिली फेरी ः पुरुष एकेरी ः नोवाक जोकोविच (२०) वि. वि. रॉगेरियो दुत्रा सिल्वा ६-३, ६-४, ६-४, रॉबर्टो बाटिस्टा आगुट (१३) वि. वि. डेनिस इस्तोमिन ६-२, ६-७, १-६, ६-४, ६-४, जाईल्स मुल्लर (२९) पराभूत वि. अर्नेस्ट गुलबिस ६-२, ४-६, ४-६, ३-६, सॅम क्वेरी (१२) वि. वि. फ्रान्सिस तियाफोये ६-१, ६-२, ७-६, दिएगो श्‍वाटर्‌‌झमन वि. वि. केल्विन हेमेरी ६-१, ६-३, ६-१, फिलिप कोहलश्रायबर (२२)पराभूत वि. बोर्ना कोरिक ३-६, ६-३, ३-६, ४-६, अल्बर्ट रामोस विनोलास (३१) वि. वि. मिखाईल कुकुशकिन ७-६, ६-४, ६-१, रिचर्ड गास्केट (२७) वि. वि. आंद्रेयास सेप्पी ६-०, ६-२, ६-२.

महिला एकेरी ः पहिली फेरी ः मॅडिसन कीज (१३) वि. वि. साचिया विकेरी ६-३, ६-३, नाओमी ओसाका (२१) वि. वि. सोफिया केनिन ६-२, ७-५, कार्ला सुआरेझ नवारो (२३) वि. वि. ऍना कोनयू ६-०, ६-१, दारिया कसातकिना (१४) वि. वि. काया कानेपी ६-४, ६-१, मिहाईला बुझारनेस्कू (३१) वि. वि. वानिया किंग ६-३, ६-३, अनास्तासिया सेवास्तोवा (२०) पराभूत वि. मारियाना डूक मरिनो ६-४, १-६, ३-६, कोको वांदेवेघे (१५) वि. वि. लॉरा सिगमंड ६-४, ६-४, माग्दालेना रिबरिकोवा (१९) वि. वि. लुकसिका खुमखूम ६-३, ६-०, क्रिस्टिना म्लेदेनोविच (२९) पराभूत वि. अँड्रिया पेटकोविच ६-७, २-६