वैज्ञानिक संशोधनाचा उपयोग सामान्यांसाठी व्हावा

0
104
पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन. सोबत डॉ. एस. डब्ल्यू. नक्वी. (छाया : रामनाथ पै रायकर)

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे उद्गार
वैज्ञानिकांनी संशोधनाचे कार्य केवळ कागदपत्रांपुरते किंवा संस्थेच्या संशोधन पत्रिकेपुरतेच मर्यादित न ठेवता सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी झाला पाहिजे. या देशात मैला उचलण्याचे काम माणूसच करतात. हा प्रकार किती दिवस चालणार, असा प्रश्‍न करून वैज्ञानिकांनी या दृष्टीकोनातूनही संशोधन करून त्याचा प्रत्यक्षात वापर करण्याच्या बाबतीत विचार करावा, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.समुद्रविषयक संशोधन हा संवेदनशील विषय आहे. देशाच्या भविष्यकाळातील गरजा पूर्ण करण्याची क्षमता समुद्रातील स्रोतांमध्ये आहे. नवनवीन औषधी तयार करण्यासाठी सागरी संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी या स्रोताचा योग्य पद्धतीने वापर व्हायला हवा. एनआयओच्या वैज्ञानिकांवर ही जबाबदारी आहे. शास्त्रज्ञांनी पारंपरिक पद्धती बाजूला ठेवून आधुनिक दृष्टीकोनातून खरी स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. भारत हे ज्ञानाचे भांडार आहे. या देशाला तसा इतिहास आहे. या ज्ञानाचा उपयोग करण्याची गरज व्यक्त करून हवामान बदलाचा परिणाम, जैव-विविधतेचे संरक्षण हे दोन मुद्दे सध्या प्रामुख्याने विचारात घेऊन विचारात घेऊन त्यावर काम सुरू आहे. हवामान बदलाचा मानव जातीवर होत असलेला परिणाम रोखण्यासाठी संशोधन करण्याची गरज डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयाला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सरकारतर्फे सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या ६७ वर्षांच्या काळात या देशाच्या खर्‍या समस्यांची कारणे शोधून त्यावर उपाय काढण्याच्या बाबतीत आपण मागे राहिलो. या समस्यांचे उच्चाटन करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरावे यावर संशोधन केले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्येही वैज्ञानिक दृष्टीकोन तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशाबाहेर असलेले भारतीय शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे वळवण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करत आहे. त्याचा भाग म्हणून रिसर्च स्कॉलर, रिसर्च फेलोशिप यात किमान ५०% वाढ करण्यात आल्याची माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. मेक इन इंडिया ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे. याच अनुषंगाने देशातील संशोधन सामान्य जनतेशी जोडण्यावर भर दिला जाणार आहे. देशातील समस्यांवर देशी संशोधनाद्वारेच प्रेरणा घेण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. सागरी संशोधन केंद्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी केंद्रीयमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून गोव्यात आले होते. पत्रकार परिषदेपूर्वी डॉ. हर्षवर्धन यांनी एनआयओच्या शास्त्रज्ञांसमोर बोलताना समुद्रातील स्रोतांचा उद्योग व्यवसायासाठी पर्यायाने मानवाच्या कल्याणासाठी संशोधन करण्याचा सल्ला दिला. पर्यटन, मच्छीमारी, समुद्र लाटांचा उर्जेसाठी वापर, जलचरांचे उत्पादन या विषयांवर संशोधन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशाला संशोधनाची प्राचीन परंपरा असल्याचेही ते म्हणाले.
सर्वांत मोठी दुर्बीण
भारताने अवकाशातील संशोधनासाठी १३०० कोटी रुपये खर्चून ३० मीटर लांबीची दुर्बीण तयार करण्याचे काम सुरू केले आहे. अमेरिकेसह इतर तीन ते चार देशांच्या मदतीने हे कार्य सुरू आहे. हा मोठा प्रकल्प असल्याने २०२३ मध्ये तो पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल पत्रकारांना दिली.