पाकिस्तानने काही धडा  घेतल्याचे दिसत नाही : पर्रीकर

0
85

नववर्षाच्या पूर्वरात्रीदेखील पाकिस्तानने भारतीय ठाण्यांवर केलेेल्या गोळीबारासंदर्भात बोलताना ‘‘पाकिस्तानने काही धडा घेतलेला दिसत नाही’’ अशी टीका संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल केली. ‘‘आमच्या उत्तर सीमा दोन शेजारी राष्ट्रांनी वेढलेल्या आहेत, ज्यांचे आमच्याशी नीट पटत नसावे’’ असे पर्रीकर चीन व पाकिस्तानच्या संदर्भात उद्गारले. पाकिस्तानने काल नववर्षाच्या पूर्वरात्री सांबा सेक्टरमध्ये किमान पंधरा भारतीय ठाण्यांवर गोळीबार केला. त्याआधी करण्यात आलेल्या अशाच एका गोळीबारात एक भारतीय जवान मारला गेला होता. त्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या कारवाईत चौघे पाकिस्तानी सैनिक मारले गेले. त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. ‘‘भारतीय सेनेने दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर द्यावे’’ असे संरक्षणमंत्री श्री. पर्रीकर यांनी कालच म्हटले होते. बेंगलुरू येथे एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या पर्रीकर यांनी ते शहर हे बुद्धिमंतांचे शहर असल्याची प्रशंसा केली. आपले वैज्ञानिक अवकाश मोहिमांत सहभाग घेतात, परंतु पूजा करायलाही विसरत नाहीत, कारण ही आपली संस्कृती आहे आणि आम्हाला तिचा अभिमान आहे, असेही पर्रीकर उद्गारले. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांची पत्नी तेजस्विनी चालवीत असलेल्या ‘अदम्य चेतना’ या संस्थेच्या कार्यक्रमात ते काल सहभागी झाले, तेव्हा ते बोलत होते. दरम्यान, पाकिस्तानी सीमेपलीकडे पन्नास ते साठ दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे.