आंतरराष्ट्रीय हिंदी महासागर संशोधन मोहीम लवकरच

0
110

चालू २०१५ पासून आंतरराष्ट्रीय समुद्र संशोधन मोहिमेअंतर्गत हिंदी महासागराचा अभ्यास करणार असून २०१५-२०२० असा याचा कालावधी असणार आहे, अशी माहिती समुद्र विज्ञान संस्थेचे (एनआयओ) संचालक डॉ. एस. डब्ल्यू. नक्वी यांनी काल पत्रकारांना दिली.येथील राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेसह देशातील शंभर सागरी वैज्ञानिक, सागरी संशोधनासाठीची ६ जहाजे भारताच्या वतीने या मोहिमेवर पाठविण्यात येणार असल्याचे नक्वी यांनी सांगितले. १९६०-६५ दरम्यान अशा प्रकारची पहिली मोहीम झाली होती. त्यातूनच एनआयओ संस्थेचा जन्म झाला होता. आता ही दुसर्‍यांदा मोहीम सुरू होणार असून त्यात अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, इंग्लंडसह एकूण २० देशांचा सहभाग असणार आहे. या मोहिमेसाठी येणारा खर्च प्रत्येक देश वैयक्तिकरित्या उचलणार आहे. सागरी संशोधनासाठी बांगलादेशबरोबर पुढील पंधरा दिवसांत एक परस्पर सामंजस्य करार करण्यात येणार आहे. संस्थेचे वैज्ञानिक प्रत्यक्ष तेथे जाऊन सागरी संशोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारता शेजारच्या देशांमध्ये सागरी संशोधनाच्या बाबतीत विकास झालेला नाही. त्यासाठी श्रीलंका, म्यानमार, या देशांसोबतही करार करण्याची आवश्यकता आहे. बंगालच्या उपसागरातील संशोधनासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होणार असल्याचे डॉ. नक्वी यांनी यावेळी सांगितले.