वेस्ट इंडीज ५ बाद २२३

0
101

वेस्ट इंडीज व बांगलादेश यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहुण्या विंडीजने पहिल्या दिवसअखेर ५ बाद २२३ अशी सन्मानजनक मजल मारली आहे. एनक्रुमा बोनर याच्या नाबाद अर्धशतकानंतरही बांगलादेशने विंडीजचे ठराविक अंतराने गडी बाद करत धावगतीवर लगाम घातला आहे.

विंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रेथवेट (४७) व जॉन कॅम्पबेल (३६) यांनी विंडीजला ६६ धावांची खणखणीत सलामी दिली. डावखुरा फिरकीपटू ताईजुलला ‘स्वीप’चा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कॅम्पबेल पायचीत झाला. नवोदित शेन मोसेले याच्या अपयशाची मालिका सुरूच राहिली. सलग तिसर्‍या डावात त्याला प्रभाव पाडता आला नाही. कामचलाऊ मध्यमगती गोलंदाज सौम्य सरकार याने स्थिरावलेल्या ब्रेथवेट (४७) याला स्पिपमध्ये शांतोकरवी झेलबाद करत बांगलादेशला मोठी विकेट मिळवून दिली.

विंडीजच्या पहिल्या कसोटीतील ऐतिहासिक विजयाचा प्रमुख शिल्पकार काईल मेयर्स (५) अपयशी ठरला. जर्मेन ब्लॅकवूड (२८) व बोनर (नाबाद ७४) यांनी पाचव्या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी करत बांगलादेशने मिळविलेली पकड काहीशी ढिली केली. जोशुआ दा सिल्वा बोनरची चांगली साथ देत आहे. या द्वयीने ४५ धावांची अविभक्त भागीदारी केली आहे. बांगलादेशकडून अबू जायेद याने ४६ धावांत २, ताईजुल इस्लाम याने ६४ धावांत २ व सरकारने ३० धावांत १ गडी बाद केला आहे.
वेस्ट इंडीजने या सामन्यासाठी संघात एकमेव बदल करताना अनुभवी किमार रोच याच्या जागी अल्झारी जोसेफ याचा समावेश केला. बांगलादेशने दुखापतग्रस्त शदमन इस्लाम व शाकिब अल हसन यांच्या जागी मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू सौम्य सरकार व स्पेशलिस्ट फलंदाज मोहम्मद मिथुन यांना संधी दिली. डावखुरा मध्यमगती गोलंदाज मुस्तफिझुर रेहमान याची जागा अबू जायेद याने घेतली.