वेश्या व्यवसायासाठी आता बंद फ्लॅटस्‌चा वापर

0
114

पर्यटनाच्या नावांखाली राज्यात मोठ्याप्रमाणात वेश्या व्यवसाय सुरू असून अशा बाबतीत हॉटेलवर पोलीस धाडी घालीत असल्याने या क्षेत्रातील काही दलालांनी वेगवेगळ्या भागात बंद असलेल्या फ्लॅटस्‌चे वेश्याव्यवसायांच्या अड्ड्यांमध्ये रुपांतर करण्याचे प्रकार सुरू केले आहेत. त्यामुळे कारवाई करणेही अडचणीचे होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार वेळोवेळी हे अड्डेही बदलण्यात येतात. त्यावर पाळत ठेवणेही अडचणीचे होते.
गोव्यात रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवून बाहेरील तरुणीना येथे आणून या व्यवसायात गोवण्याचे प्रकार चालू आहेत. राज्यातील काही मसाज पार्लर, स्पा याचा याच कामासाठी वापर केला जातो. काही काळापूर्वी पोलिसांनी या प्रकाराविरुध्द धाडसत्र सुरू केले होते. त्यामुळे काही भागातील अड्डे बंद ठेवण्यात आले होते, आता या प्रकारांना पुन्हा उत आल्याचे वृत्त आहे. राज्यातील ‘अर्ज’ ही संस्था या प्रकाराविरुध्द जनजागृती करण्याचे काम करीत आहे, त्यांच्या मते गोव्यात सध्या वेश्या व्यवसायाचे प्रमाण बरेच वाढले आहे.
नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गृह खात्याने दिलेल्या एका प्रश्‍नावरील लेखी माहितीनुसार गेल्या ४ वर्षांच्या काळात १०३ एवढ्या गुन्ह्यांची नोंदणी झाली होती त्यात ७८ टक्के उत्तर गोव्याच्या किनारी भागातील आहेत.
बायणा वेश्यावस्ती उद्ध्वस्त केल्यानंतर हा व्यवसाय राज्यात सर्वत्र पसरला. नेपाळ, बांगलादेश, इशान्येकडील मुलींचीच त्यात अधिक संख्या असते, असे अर्जचे अध्यक्ष अरुण पांडे यांचे म्हणणे आहे.