दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपची सज्जता

0
85

आम आदमी पक्षाने दिल्ली राज्य विधानसभेसाठी नव्याने निवडणुका घेण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना साकडे घातले असले तरी गेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपने सत्ता स्थापनेसाठी सज्जता ठेवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडून या अनुषंगाने निमंत्रण येण्याच्या प्रतीक्षेत भाजप असल्याचे या सूत्रांनी सांगितले. दिल्लीत सरकार स्थापनेसंदर्भात विचार विनिमयासाठी भाजप विधानमंडळाची बैठक उद्या बोलावण्यलात आल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबतही निर्णय घेण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी शनिवारी दिल्लीत सरकार घडविण्याविषयी सूचक भाष्य केले होते. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी या अनुषंगाने औपचारिक निमंत्रण दिण्यास भाजप दिल्लीत सरकार स्थापनेसाठी विचार करेल असे राजनाथ यांनी म्हटले होते. त्याआधी आम आदमी पक्षाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन दिल्लीत निवडणुका घेण्याची विनंती त्यांना केली होती.
सर्वाधिक संख्या बळ असलेला पक्ष म्हणून राज्यपाल जंग भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करणार असल्याचे वृत्त पसरल्यामुळे आम आदमी पक्षाने वरील मागणी केली होती. मात्र हा पर्याय घटनाविरोधी असल्याचा दावा ‘आप’ने केला होता. दरम्यान, कॉंग्रेसने भाजपच्या सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.