वेलिंगकरांविरोधातील आंदोलन स्थगित

0
5

>> 500 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

>> वेलिंगकरांच्या अटकपूर्व जामिनाविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणार

शनिवारी मडगाव शहरात प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात मोर्चा काढून नंतर संपूर्ण दिवस राष्ट्रीय महामार्ग-66वर ठाण मांडून महामार्ग वाहतुकीसाठी बंद पाडणाऱ्या सासष्टी तालुक्यातील ख्रिस्ती जनसमुदायाने काल रविवारी आपले आंदोलन मागे घेत महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सुभाष वेलिंगकर यांना अटक करण्याची मागणी केली आहे. सुभाष वेलिंगकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी पणजीतील सत्र न्यायालयात जो अर्ज दाखल केलेला आहे त्या प्रकरणी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात येईल, असेही आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले. या आंदोलनात आप, काँग्रेस या पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅपिड फायर फोर्सच्या तुकड्या आंदोलनस्थळी दाखल झाल्याने आंदोलकांची संख्या कमी झाली होती.

हिंदुत्ववादी नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी ख्रिस्ती धर्मीयांचे दैवत असलेल्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या अवशेषांची डीएनए चाचणी करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे वेलिंगकर यांच्या या वक्तव्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे स्पष्ट करत सासष्टी तालुक्यातील ख्रिस्ती जनसमुदायाने शनिवारी मडगावात मोर्चा आणून राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ केला होता. रविवारी सकाळी परत एकदा मडगाव शहरात जमून आंदोलनकर्त्यांनी पुन्हा रास्ता रोको केला होता. मात्र, तेथे मोठ्या संख्येने हजर असलेल्या पोलिसांनी त्यांना आंदोलन मागे घ्या अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर काल आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

हिंदू राष्ट्र अभियानचा वेलिंगकरांना पाठिंबा

हिंदू राष्ट्र अभियान या संस्थेच्या काल बोडगेश्वर मंदिराजवळ झालेल्या सभेत प्रा. सुभाष वेलिंगकर यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी वेलिंगकर यांच्या पाठिराख्यांनी देव बोडगेश्वराला गाऱ्हाणे घातले.

500 आंदोलकांवर गुन्हा

शनिवारी मडगाव येथे ख्रिस्ती जनसमुदायाने जे रास्ता रोको आंदोलन केले होते त्या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी ह्या आंदोलनाच्या एक नेत्या प्रतिमा कुतिन्हो व अन्य 500 आंदोलनकर्त्यांवर गुन्हा नोंदवला आहे. बेकायदेशीररीत्या जमाव करणे, रस्ता अडवणे व जनतेला अडथळा निर्माण करणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांविरुद्ध बळाचा वापर केला. तसेच मडगाव जुने मार्केट येथील सर्कलजवळ ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली, असे गुन्हे आरोपींवर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

डिचोली पोलिसांकडून वेलिंगकर यांना नोटीस

डिचोली पोलिसांनी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या पणजी येथील निवासस्थानावर आणखी एक नोटीस लावली असून त्यांना रविवारी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर हजर राहून तपासकामासाठी सहकार्य करण्याचा आदेश दिला होता. शनिवारी वेलिंगकर यांच्या निवासस्थानावर अशीच एक नोटीस लावून पोलिसांनी त्यांना आपणासमोर शरण येऊन तपासकामासाठी सहकार्य करण्याचा आदेश दिला होता. वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याविषयी काढलेल्या अनुद्गारानंतर ख्रिस्ती जनसमुदायाने मडगाव येथे आंदोलन सुरू केल्यानंतर सुभाष वेलिंगकर हे फरार झाल्याने पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानावर नोटिसा लावल्या असून त्यांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे.

पत्रकारावर पोलिसांचा लाठीहल्ला

मडगाव येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन चालू असताना तेथे वृत्तांकन करणारे छायापत्रकार संतोष मिरजकर (द गोवन एव्हरी डे) यांना पोलिसांनी लाठीने मारण्याची घटना घडली. त्या घटनेचा गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने निषेध केला आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला असता तेथे हजर असलेल्या एका पत्रकाराने लाठीहल्ल्याचे चित्रण केले होते. यावेळी पोलिसांनी दबाव आणून सदर पत्रकाराला या लाठीहल्ल्याच्या चित्रीकरणाची चित्रित केलेली फुटेज डिलिट करण्यास सांगितले. मिरजकर यांनी त्याला आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला लाठीने मारहाण केली. सदर पोलिसाला निलंबित करावे व त्यांची चौकशी करावी, अशी मागणी ‘गूज’ने केली आहे.

भाजपमुळे गोव्यात जातीय सलोखा धोक्यात : गांधी

गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य, गोव्यातील प्रेमळ लोक व त्यांचे आगळेवेगळे आदारातिथ्य यामुळे गोवा हा एक स्वर्गासारखा प्रदेश बनला आहे. मात्र, भाजपच्या राजवटीत गोव्यातील जातीय सलोखा धोक्यात आला आहे, असा आरोप काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्स या प्रसारमाध्यमावरून केला आहे.